E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
तेजस्वी क्रांतिकारक - राजेंद्र लाहिरी
Wrutuja pandharpure
27 Jun 2025
गाऊ त्यांना आरती, शिरीष चिटणीस
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या ’57 चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात म्हटले आहे... ‘ठराविक नियमांनी आजपर्यंत कोणत्याही क्रांतीचे कधीच नियमन झालेले नाही. क्रांती म्हणजे घड्याळ्याप्रमाणे चालणारे बिनचूक यंत्र थोडेच आहे! क्रांतीच्या खुणेचा असा शब्द एकच असतो, आणि तो म्हणजे थांबू नका! किंवा ’सारखे पुढे रेटा!’
केव्हा केव्हा अगदी नवीन आणि अनपेक्षित अशा गोष्टी भर क्रांतीमध्ये उद्भूत होतात; तरीही कोणीही थांबता कामा नये. त्या अनपेक्षित परिस्थितीवर स्वार होऊन सारखे पुढे दौडत राहिले पाहिजे. ज्याला या क्रांतिपक्षाच्या पाठीवर आरूढ होऊन आपले ध्येय गाठावयाचे असेल, त्याने आपले आसन त्या पक्षाच्या पाठीवर बळकट टिकविण्याची दक्षता घेतली पाहिजे. पहिल्या महायुद्धातील ’गदर’च्या विफलतेवर व असहयोगाच्या गुंगीवर स्वार होऊन भारतीय क्रांतिकारकांनी 1923 मध्ये शचींद्रनाथ संन्याल व योगेशचंद्र चटर्जी यांच्या नेतृत्वाखाली ’हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ म्हणजेच ’भारतीय प्रजातंत्र’ या नावाने क्रांतीचे अग्निकुंड पुन्हा नव्या जोमाने चेतविण्यास प्रारंभ केला. या संस्थेची नवी घटना तयार केली. कामकरी व शेतकर्यांना अधिकार देऊन शोषणहीन राज्यपद्धतीचा या घटनेत पुरस्कार करण्यात आला होता. या संघटनेच्या शाखा उत्तर भारतातील प्रत्येक प्रांतातून काढण्याचा प्रयत्न झाला होता.
संयुक्त प्रांताच्या शाखेचे पं. रामप्रसाद बिस्मिल, सुरेशचंद्र भट्टाचार्य, विष्णू शराबा दुबलिस आणि राजेंद्र लाहिरी प्रमुख होते. राजेंद्र लाहिरी हे संयुक्त प्रांतातील क्रांतिकारकांत श्रेष्ठ संघटक म्हणून प्रसिद्ध होते. काकोरी कटाच्या प्रकरणात त्यांना 17 डिसेंबर 1927 रोजी गोंडा येथील कारागृहात फाशी देण्यात आले. वास्तविक काकोरी कट प्रकरणात पं. रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशनसिंह, अशफाक उल्ला खान यांच्याबरोबरच 19 डिसेंबर 1927 रोजी राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात येणार होते. या प्रकरणात 7 एप्रिल 1927 रोजी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ठरलेल्या 19 डिसेंबर 1927 रोजी राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्याऐवजी 2 दिवस आधी म्हणजे 17 डिसेंबर 1927 रोजी गोंडा तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. इंग्रज शासनास अशी भीती होती की, राजेंद्रनाथ लाहिरी यांचे साथीदार तुरुंग फोडून त्यांना सोडवतील, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. राजेंद्रनाथ लाहिरी यांनी देशासाठी हसत हसत फाशी स्वीकारली. फाशीच्या वेळी ते जेलरला म्हणाले... ’जेलरसाहब, मैं मर नही रहा. एक स्वाधीन भारत में दोबारा जन्म लूंगा’ भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाचे योगदान म्हणून स्वातंत्र्यसेनानी राजेंद्र लाहिरी यांची ऐतिहासिक नोंद आहे.
राष्ट्रप्रेमाचे बाळकडू
बंगालमध्ये (आजचा बांगलादेश) पबना जिल्ह्यातील मोहनपुर गावामध्ये 29 जून 1901 रोजी राजेंद्र लाहिरी यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव क्षिति मोहन लाहिरी, तर आईचे नाव बसंतकुमारी. या बंगाली कुटुंबाची मोठी मालमत्ता होती. वडील क्रांतिकारी क्षिति मोहन लाहिरी आणि मोठे भाऊ बंगालमधील अनुशासन समितीमध्ये कार्यरत होते. अनुशीलन समितीच्या गुप्त बैठकींना ते हजर राहत. या समितीसाठी योगदान देत असल्याबद्दल कैद भोगत होते. लहानपणापासूनच घरातील क्रांतीचे पोषक वातावरण त्यांना मिळाले. राष्ट्रप्रेमाचे बाळकडू घेत आणि क्रांतीची बीजे मनात उचंबळून येत असतानाच राजेंद्र लाहिरी यांना वाराणसी येथे मामाच्या घरी शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. पुढील शिक्षणासाठी राजेंद्र लाहिरी बनारस येथील काशी विश्व हिंदू विद्यालयामध्ये इतिहास या विषयात एम. ए. करीत होते. याच ठिकाणी त्यांची शचींद्रनाथ संन्याल यांच्याशी मैत्री झाली. या मैत्रीमुळे लहानपणापासूनच असलेली मनातील क्रांतिज्योत प्रफुल्लित होऊन त्यांना हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेशी स्वतःला जोडून घेता आले. अर्थशास्त्र व इतिहास याचे शिक्षण घेत असतानाच ते काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचे सचिव आणि बंगाल साहित्य परिषदेचे मानद सचिव होते. शचींद्रनाथ संन्याल यांनी राजेंद्र लाहिरी या युवकाच्या धगधगत्या देशप्रेमाची ओढ ओळखली होती. त्यांना विश्वास होता की, राजेंद्र भारत देशासाठी असे काहीतरी करतील की, इतिहास त्यांची ओळख कायम ठेवेल. काशी येथून प्रकाशित होणार्या ’बंग वाणी’ या वृत्तपत्राचे संपादन कार्य शचींद्रनाथ यांनी राजेंद्र लाहिरी यांच्यावर सोपविले होते. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये त्यांच्या भेटी निरनिराळ्या क्रांतिकारकांशी झाल्या. काशी येथील हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख म्हणून काम करीत असताना त्यांनी चारू, जवाहर, जुगल किशोर अशी वेगवेगळी नावे वापरून ही संघटना तरुणांच्या सहयोगाने भरभक्कम केली. क्रांतिकारकांनी आपले विचार लिहिले पाहिजेत, असे त्यांना सतत वाटत असे. ते आपले विचार बेधडक लिहीत आणि मांडीत असत.
आंदोलनाचा ज्वालामुखी
जानेवारी 1925 मध्ये ’हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’च्या वतीने ’रिव्हॉल्यूशनरी’ या नावाचे पत्रक संपूर्ण हिंदुस्थानभर एके दिवशी वाटण्यात आले. या पत्रकाखाली ’बलराज’ अशी स्वाक्षरी होती. त्याचे खरे लेखक राजेंद्र लाहिरी यांचे गुरु शरदचंद्र संन्याल हे होते. या पत्रकाच्या सूत्रबद्ध प्रचाराने इंग्रज राजसत्तेला कल्पना येऊन त्यांची झोप उडाली. असहकार आंदोलनाच्या प्रारंभानंतर क्रांतिकारक आंदोलनाचा ज्वालामुखी कायमचा थंड पडला, अशी त्यांची कल्पना होती. या पत्रकात असे म्हटले होते की, ’वर्तमान सोव्हिएट रशिया व प्राचीन भारतीय मंत्र द्रष्टे या दोघांपासूनही आम्ही आमच्या कार्याची प्रेरणा घेतली असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा आमचा कृतनिश्चय आहे. राज्यसत्तेने सूक्ष्मपणे शोध घेऊन शचींद्रनाथ संन्याल यांनी हे पत्र रासबिहारी बोस यांस जपानमध्ये पाठवले होते, ते पत्र मध्येच पकडले गेले आणि त्यांना अटक करण्यात आली. खटला भरण्यात येऊन त्यांना दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली. योगेश चटर्जी यांनाही पकडण्यात आले. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचा नुसती जहाल पत्रके काढणे एवढेच उद्दिष्ट नव्हते, तर ज्वलजहाल कृत्ये करणे आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी फंड गोळा करून शस्त्रसंग्रहाचे कार्य आरंभ करणे हा उद्देश होता. त्यासाठी आवश्यक तो धनसंचय मिळविण्यासाठी दरवडे घालणे हा एकच मार्ग उपलब्ध होता.
असोसिएशनच्या नेत्यांना यावेळी एका जहाजावरून गुप्त मार्गाने बराच शस्त्रसंग्रह मिळण्यासारखा होता; पण यासाठी कित्येक सहस्र रुपयांची जरूरी होती. प्रथम राजेंद्र लाहिरी यांसह पदाधिकार्यांनी आपल्या घरातून जेवढा पैसा उपलब्ध करता येईल तेवढा केला; पण सार्याच निष्कांचनांजवळ निघणार काय विशेष? अशा कामाविषयी सहानुभूती असणार्या लोकांकडून निधी गोळा करण्याचाही प्रयत्न झाला; मात्र त्याला फारसे यश आले नाही. शेवटची शस्त्रे खरेदी करण्याची संधी जाऊ नये म्हणून रायबरेली जिल्ह्यातील सराय महेश नावाच्या गावात राजनैतिक दरोडाही घालण्यात आला. तरीही नड भागली नाही.
पैशाच्या उपलब्धतेसाठी पं. रामप्रसाद बिस्मिल यांनी सरकारी पोस्ट ऑफिसच्या रेल्वेतून नेण्यात येणारा खजिना काकोरी स्टेशनजवळ साखळी ओढून लुटण्याचा ठराव समितीपुढे मांडला. सरकारी पैशाच्या पिशव्या पळविण्यासाठी पं. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, शचीन्द्रनाथ बक्षी, मुकुंदीलाल, मन्मथनाथ गुप्त, मुरारी शर्मा, बनवारीलाल व चंद्रशेखर आझाद यांनी जबाबदारी स्वीकारली.
9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी ट्रेनमध्ये बसून हा खजिना लुटण्यात आला. राजेद्र लाहिरी यांनी साखळी ओढून गाडी थांबवली. याप्रसंगी एका पॅसेंजरची तो पळून जात असताना गोळी मारून हत्या करण्यात आली. मन्मथनाथ गुप्त याच्याकडून अनवधानाने गोळी झाडली गेली. केवळ दहा मिनिटांत तिजोरी फोडून पैसे पिशव्यात भरून क्रांतिकारक शेजारच्या दाट झाडीत पळून गेले. सावधपणे लखनौ शहरात क्रांतिकारकांनी या दरोड्यात मिळालेल्या पाच सहस्र रुपयांसह प्रवेश केला. या पैशाचा उपयोग क्रांतिकारकांना शस्त्रसंग्रह करण्यासाठी झाला, ब्रिटिश शासन हादरले. भारतभर या साहसी दरोड्याची चर्चा होऊन क्रांतिकारकांचा जयजयकार करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांची वेगवेगळ्या ठिकाणी हिंदुस्थानभर एकी होऊन लढा तीव्र होण्यास वेग आला.
क्रांतिकारकांची धरपकड
पं. रामप्रसाद बिस्मिल यांनी राजेंद्र लाहिरी यांना बॉम्ब बनविण्याच्या शिक्षणासाठी कोलकाता येथे पाठविले. 1925 मध्ये कोलकाताजवळील दक्षिणेश्वर येथे हा बॉम्बचा कारखाना होता. बॉम्ब बनविण्याची तयारी चालू असतानाच एका सदस्याच्या निष्काळजीपणामुळे एक बॉम्ब फुटला आणि मोठा आवाज निर्माण झाल्याने पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. राजेंद्र लाहिरी यांसह अनेक तरुणांना पकडण्यात आले. राजेंद्र लाहिरी यांना या खटल्यात 10 वर्षांची शिक्षा झाली. अपील केल्यामुळे ती 5 वर्षे करण्यात आली. याच काळात काकोरी रेल्वे दरोडा कट प्रकरणाने ब्रिटिश राजसत्तेला जणू गदागदा हलवून जागे केल्याने दमनचक्रे अतिशय वेगाने फिरून एकंदर चाळीस व्यक्तींना पकडण्यात आले. आरोपींपैकी चंद्रशेखर आझाद शेवटपर्यंत सापडले नाहीत. या अटकेनंतर राजेंद्र लाहिरी यांचा या कटामध्ये समावेश होता हे लक्षात आल्याने त्यांनाही या प्रकरणात गोवण्यात आले.
अटक झालेल्यांपैकी कोणीही स्वार्थी नसल्याचे सर्वांना माहीत असल्याने या सर्वांबद्दल सामान्य जनतेच्या मनात या साहसी व शूर देशभक्त यांच्याविषयी उत्कट आत्मीयता होती. स्वयंस्फूर्त श्रद्धेने निधी जमवून त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था लोकांनी केली. या सर्वांच्या बाजूने न्यायालयात पं. गोविंदवल्लभ पंत, बी. के. चौधरी, मोहनलाल सक्सेना व चंद्रभान गुप्त हे गुप्तपणे काम चालवीत होते.7 एप्रिल 1925 रोजी या खटल्याचा निर्णय होऊन चारजणांना फाशी देत बाकीच्यांना इतर शिक्षा सुनावण्यात आली. राजेंद्र लाहिरी आणि इतर तिघांच्या फाशीने स्वातंत्र्यलढा शमण्याऐवजी तीव्र झाला. वयाच्या 26 व्या वर्षी फाशी होऊनही त्यांचे विचार आणि स्वातंत्र्याची भावना तरुणांना स्फूर्तीदायी ठरली. जेलर त्यांना असे म्हणाले, ‘पूजापाठ ठीक आहे; पण व्यायाम कशाला? तुम्हाला तर फाशी होणार आहे. त्यावर राजेंद्र लाहिरी म्हणाले, ‘मला दुसरा जन्म मिळताना चांगले तगडे शरीर मिळावे म्हणून मी कसरत करतो, ज्यायोगे तुमच्या सत्तेविरुद्ध पुन्हा मला लढता येईल.’उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी 17 डिसेंबरला शासकीय, तसेच सामाजिक कार्यक्रम केले जाऊन स्वातंत्र्यसेनानी राजेंद्र लाहिरी यांच्या स्मृती जपल्या जातात. हा दिवस लाहिरी दिवस म्हणून साजरा केला जातो. राजेंद्रनाथ लाहिरी हे एक तेजस्वी, लक्षवेधी आणि बुद्धिमान क्रांतिकारक होते.
Related
Articles
चार एकर जमीन हडपण्याचा प्रकार उघड
22 Jul 2025
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही
19 Jul 2025
पंतप्रधान मोदींकडून लोकमान्यांना अभिवादन
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
भूपेश बघेल यांच्या मुलास अटक
19 Jul 2025
अमरनाथ यात्रेसाठी साडेतीन हजार यात्रेकरू रवाना
25 Jul 2025
चार एकर जमीन हडपण्याचा प्रकार उघड
22 Jul 2025
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही
19 Jul 2025
पंतप्रधान मोदींकडून लोकमान्यांना अभिवादन
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
भूपेश बघेल यांच्या मुलास अटक
19 Jul 2025
अमरनाथ यात्रेसाठी साडेतीन हजार यात्रेकरू रवाना
25 Jul 2025
चार एकर जमीन हडपण्याचा प्रकार उघड
22 Jul 2025
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही
19 Jul 2025
पंतप्रधान मोदींकडून लोकमान्यांना अभिवादन
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
भूपेश बघेल यांच्या मुलास अटक
19 Jul 2025
अमरनाथ यात्रेसाठी साडेतीन हजार यात्रेकरू रवाना
25 Jul 2025
चार एकर जमीन हडपण्याचा प्रकार उघड
22 Jul 2025
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही
19 Jul 2025
पंतप्रधान मोदींकडून लोकमान्यांना अभिवादन
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
भूपेश बघेल यांच्या मुलास अटक
19 Jul 2025
अमरनाथ यात्रेसाठी साडेतीन हजार यात्रेकरू रवाना
25 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)