‘केसरी’मध्ये अग्रलेख -’टिळक सुटले, पुढे काय?’   

स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड
 
14-नोव्हेंबर-1916 (मंगळवार) : आजच्या दिवशी ’केसरी’मध्ये प्रसिद्ध अग्रलेख - ’टिळक सुटले, पुढे काय?’ हा अग्रलेख लोकमान्य टिळकांची राजद्रोहाच्या तिसर्‍या खटल्यातून मुंबई उच्च न्यायालयात जामीनकीच्या पाशातून न्यायमूर्ती बॅचलर आणि न्यायमूर्ती शहा यांनी निर्दोष सोडल्यानंतरचा आहे.
 
राजद्रोहाच्या तिसर्‍या खटल्यात लोकमान्य टिळकांनी आपले वकीलपत्र बॅ. जिना यांना दिले होते. त्यांच्या मदतीला बॅप्टिस्टा होते. ’राजद्रोह’ या शब्दाच्या अर्थाचा कीस निघाला होता. बॅ. जिना यांनी खटल्याचे काम आपल्या नेहमीच्या तडफेने चालविले होते. अखेर हायकोर्टाने निकाल देऊन लोकमान्यांना निर्दोष ठरविले आणि जामीन रद्द केला. बॅ. जिना यांनी लोकमान्यांशी हस्तांदोलन करून त्यांचे अभिनंदन केले. लोकांनी सर्वत्र आनंद प्रदर्शित केला. ताबडतोब लोकमान्यांनी ’केसरी’साठी अग्रलेख लिहिला. त्याचा मथळा होता टिळक सुटले. पुढे काय? पुढे काय? हा एकच ध्यास त्यांना लागला होता. न्यायमूर्ती शहा यांच्या निकालात लोकमान्य टिळकांना दोषमुक्त तर करण्यात आलेच; पण न्यायमूर्ती बॅचलर यांच्या निकालापेक्षा त्यांचा निकाल अधिक व्यापक व उदारबुद्धीचा होता.
 
खटल्यातून सुटका झाल्यानंतर आजच्या दिवशी लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या लेखात त्यांनी उच्च न्यायालयाने न्याय बाजू उचलून धरल्याबद्दल न्यायालयाची प्रशंसा केली. कार्यकारी संस्था व न्यायव्यवस्था यांच्यात सत्तेचे विभाजन केलेले असावे आणि जुलमी नोकरशाहीचे अत्याचार थोपवण्याचे काम न्यायव्ययस्थेने करावे, असे टिळकांनी या लेखात नमूद केले आहे. नोकरशाहीवर टीका करणे म्हणजे राजद्रोह नाही आणि अप्रीती म्हणजे प्रीतीचा अभाव नव्हे, हे उच्च न्यायालयाच्या निकालाने सिद्ध केले आहे, असे टिळक म्हणाले. आपली आता सुटका झाली असली, तरी जल्लोषाच्या भरात संघर्ष करणे सोडू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. ’टिळक किंवा मिसेस बेसंटबाई तुमच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत तुमच्या सोबत नसतील. तुम्ही स्वतःच्या सर्व क्षमता वापरून स्वराज्याचा प्रश्न ब्रिटिश संसदेसमोर आणण्याचा प्रयत्न करायला हवा. हा व्यक्तींचा प्रश्न नाही, तर राष्ट्राचा प्रश्न आहे. तारा करणे किंवा मिठाई वाटणे पुरेसे नाही. प्रत्येकाने आता होमरूल लीगचे किंवा स्वराज्य संघाचे सदस्य व्हायला हवे.’
 
या लेखामधून आणि इतर कृती व घोषणांमधूनही टिळकांनी कायद्याबद्दल जो दृष्टिकोन व्यक्त केला, तो नेमस्तांहून भिन्न होता. नेमस्तांनी उक्ती व कृती यापैकी कोणत्याही स्तरावर कायद्याची मर्यादा ओलांडली नाही, मग कायदा अन्याय्य असला, तरी त्यांचे पालन करण्यावर त्यांचा कटाक्ष होता.
 

Related Articles