राशिभविष्य ८ ते १४ डिसेंबर पर्यंत 
 
सुख घटवणारा प्रतियोग 
 
आगामी ग्रहयोग : गिरीष कुलकर्णी 
 
फलज्योतिषात शुक्र हा विवाहाचा आणि वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जातो. जन्म कुंडलीतील शुक्र आणि सप्तम स्थान यांच्या संयोगाने वैवाहिक जीवनाचा अंदाज घेता येतो. शुक्रासोबत जे ग्रह योग करत असतात त्या प्रमाणे शुक्राच्या परिणामकारकतेत फरक पडतो. शुक्राच्या बाबतीत मंगळ आणि हर्षल यांचे प्रतियोग, केंद्रयोग किंवा षडाष्टक योग या सारखे अशुभ योग  विपरीत परिणाम देतात. शुक्र आणि मंगळ यांचा प्रतियोग हा वैवाहिक जीवनात अवास्तव अपेक्षा निर्माण करून असमाधानी ठेवणारा असतो. वैवाहिक जोडीदाराची योग्य साथ न मिळाल्याने अपेक्षाभंगाचे दुःख वाट्याला येते. 
 
स्त्रियांच्या पत्रिकेत पती-पत्नीत अनुरूपता नसल्याने कौटुंबिक जीवनात आपत्ती येतात किंवा वितुष्ट येऊ शकते. शुक्र-मंगळ अशुभ योगात संयमाचा भाग कमीच असल्याने भावनिक घुसमट होऊन प्रकृतीवर देखील अनिष्ट परिणाम होऊ शकतो. उधळेपणा आणि चैनी रहाणीमान असल्याने आर्थिक बेशिस्त देखील अशा योगात प्रामुख्याने दिसून येते. येत्या दि. १२ रोजी शुक्र आणि मंगळ यांचा प्रतियोग कर्क आणि मकर या राशीतून होत आहे.कर्केतील निर्बली मंगळ शनीच्या मकर राशीतील शुक्राच्या प्रतियोगात आल्याने वैवाहिक जीवनातील भावनिक अपेक्षाभंग होण्याची शक्यता वाढली आहे. प्रेम प्रकरण आणि त्याच बरोबर वैवाहिक जीवनात प्रश्नांकित निष्ठेसारख्या विपरीत घटना घडण्याची शक्यता देखील वाढली आहे. 
 
सप्ताहात मिथुन, कर्क, धनु आणि मकर या राशींच्या वैवाहिक जीवनात एखादी खळबळ करणारी घटना घडू शकते तर वृषभ, कन्या आणि मीन या राशींसाठी प्रेम प्रकरणासारखी घटना घडू शकते. इतर राशींना मंगळ शुक्र प्रतियोगाची अतितीव्र फलिते अनुभवास येण्याची शक्यता नाही.
 
मेष -कला आणि करमणुकीचा आनंद 
 
 प्रदीर्घ मेहनतीने आणि सचोटीने नोकरीत प्रगती साध्य कराल. नवनव्या जबाबदार्‍या स्वीकारत राहाल. कर्तृत्वासोबतच शिस्तीचा महत्वाचा वाटा तुमच्या यशप्राप्तीत राहील. बौद्धिक क्षेत्रातील तुमचे स्थान बळकट असले तरी काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शकयता आहे. तातडीचे निर्णय आणि उतावळेपणा नुकसानकारक ठरू शकतो. उत्तरार्ध आर्थिक स्थैर्य देणारा आणि कुटुंब सुखाचा आनंद देणारा आहे. सप्ताहाच्या शेवटी कला आणि करमणुकीचा आनंद घ्याल.
 
वृषभ -मान आणि प्रतिष्ठा वाढेल
 
नोकरदारांची व्यग्रता वाढेल. हितशत्रूंचे अडथळे वाढण्याची शक्यता आहे. परिश्रम आणि प्रयत्न वाढवावे लागतील. तृतीय स्थानातील मंगळ तुम्हाला आवश्यक ऊर्जेचा पुरवठा करणारा आणि कृतीशीलतेची प्रेरणा देणारा आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांची योग्य दाखल घेतली जाईल. मान आणि प्रतिष्ठा वाढेल.   मात्र लहरीपणामुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होणार नाही याची खबरदारी घ्या. काही जण पर्यटनाचे बेत आखतील. उत्तरार्धातील कौटुंबिक गैरसमज सामंजस्याने सोडवायचा प्रयत्न करा.  
 
मिथुन -हौसमौजेकडे कल राहील
 
देवधर्म, धर्मकृत्ये, कुळाचार यांचे श्रद्धापूर्वक पालन कराल. आपल्या भूमिकेत डोळसपणा ऐवजी कर्मठपणा येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कारणाने होण्यार्‍या दैनंदिन खर्चात वाढ होईल. व्यर्थ आणि भावनिक खरेदी मात्र टाळायला हवी. बुधवारी आणि गुरुवारी हौसमौज करण्याकडे कल राहील. राहणीमान उंचावण्यासाठी विशिष्ट वस्तूंची खरेदी कराल. उत्तरार्धात व्यसनी मंडळींनी आपले व्यसन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. सप्ताहाच्या शेवटी स्वतःच्या श्रीमंतीच्या प्रदर्शनाने काही नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
 
कर्क -धाडसी कृती टाळा.
 
अष्टमातील शनी आणि  राशीतील मंगळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य नाजूक आणि दोलायमान ठेवेल. उत्साहाच्या भरात कोणतीही अविचारी किंवा अतिरिक्त धाडसाची कृती करणे टाळा. प्रसंगी तुम्हाला निराश करणार्‍या किंवा अपयश देणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. पत्नीची हौस आणि  मागण्या पुरविण्यासाठी विशेष कष्ट घ्याल. मित्र मैत्रिणींसोबत वादविवादाचे विषय टाळलेले बरे अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट सुख प्राप्तीची अपेक्षापूर्ती करणारा आहे.
 
सिंह -आनंद प्रसंगांतून उत्साह 
 
कौटुंबिक जीवनात काही शुभ घडामोडी घडतील. आनंद प्रसंग उत्साह वाढवतील. पत्नीची तुमच्या उपक्रमांना योग्य साथ लाभेल. उतावळेपणाने केलेल्या गोष्टी पूर्णत्वाला जाणे कठीण आहे. डोळे आणि पायाच्या आरोग्याची  काळजी घ्या. नकारात्मक विचारांमधून त्वरित बाहेर पडू शकलात तर कर्तृत्वाची प्रेरणा टिकून राहील. सरकारी कामे किंवा कोर्टाची कामे मंदगतीने चालतील. वाढत्या सुखाच्या हव्यासातून अविचारी खरेदी होण्याची शक्यता आहे. सप्ताहांती नोकरदारांना अनपेक्षित समस्यांचा सामना करावा लागेल.
 
कन्या -मोठ्या खरेदीची शक्यता 
 
व्यावसायिक आघाडीवर इच्छापूर्तीचे प्रसंग येतील. पराकोटीच्या निष्ठेने स्वीकारलेल्या आव्हानांची पूर्तता कराल. आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचे नवे उच्चांक प्रस्थापित कराल. कला आणि साहित्य क्षेत्रात विशेष गती लाभेल.वास्तू समस्या मार्गी लागतील. विविध क्षेत्रात यशदायक प्रसंग येतील. ऐहिक जीवन सुखाच्या क्षणांनी पुरेपूर भरलेले राहील. सुखवृद्धी करणार्‍या वस्तूंची मनसोक्त खरेदी करण्याचा योग आहे. तरुणांना प्रेमात यश लाभेल. सप्ताहांती दागिने, वाहन अशा मोठ्या खरेदीची शक्यता आहे.
 
तूळ - बळकट आर्थिक परिस्थिती  
 
योग्य संगत लाभल्यास तुमच्या कर्तृत्वाला प्रेरणा लाभेल. संततीच्या विविध उपक्रमांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता भासेल. नोकरदारांना अधिकार प्राप्ती झाली तरी  हट्टी पणाने गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनात आर्थिक परिस्थिती बळकट आणि स्थिर राहील. हव्यासापोटी अकारण आणि अवाजवी खरेदी होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी कलाकारांना प्रसिद्धी लाभेल. स्वतःचा आहार विहार याकडे विशेष लक्ष द्या.
 
वृश्चिक -कुटुंब सुख लाभेल
 
कुटुंबातील ज्येेष्ठ आणि वृद्ध मंडळींच्या आरोग्याची विशेष खबरदारी घ्यावी लागेल.  कौटुंबिक वातावरण ताणतणावातून गढूळ राहील. वादविवादाचे प्रसंग टाळले तर मनःशांती टिकून राहील. एखद्या प्रतिष्ठेच्या उपक्रमात अपयशाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन टिकवून ठेवावे लागेल. भोगवादी वृत्ती वाढेल. करमणूक आणि ऐष आराम याचा आनंद घेण्याकडे कल राहील. उत्तरार्धात पती पत्नींनी आपापसातील गैरसमज टाळणे आवश्यक आहे.सप्ताहांती कुटुंब सुख लाभेल.
 
धनु - उद्दिष्टपूर्तीसाठी परिश्रमांची गरज
 
नोकरदार मंडळी कर्तव्य दक्ष राहतील. परिश्रमाने उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करतील. अष्टम स्थानातील मंगळ आर्थिक आणि कौटुंबिक आघाडीवर अस्थिरता निर्माण करणारा आहे. काही जणांना उदरपीडा सतावण्याची शक्यता आहे. चैन आणि मौजमजेसाठी अवास्तव खर्च होऊ शकतो. सततच्या द्विधा मानसिक स्थितीमुळे योग्य निर्णय घेणे कठीण जाईल. स्वतःच्या आहाराविहाराबाबत दक्षता बाळगण्याची जरूर आहे. उत्तरार्धात नाती जपा तर सप्ताहाच्या शेवटी संसारिक खरेदी आनंद दायक होईल.
 
मकर - सौंदर्य प्रसाधनांवर अति खर्च शक्य
 
कुटुंबातील सदस्यांचे आपसातील गैरसमज वाढणार नाहीत याची खबरदारी घ्या. विशेषतः पती-पत्नीत वादविवाद होण्याची शक्यता आहे.  अंतर्मनाचे संकेत तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. बुद्धिचातुर्याच्या प्रभावाने नोकरीत लक्षणीय यश प्राप्ती होईल. शुक्र-मंगळ हव्यास वाढवणारे आणि  अनावश्यक खरेदी करवणारे आहेत. महिलांचा सौंदर्य प्रसाधनांवर अतिरेकी खर्च होऊ शकतो. उत्तरार्धात नोकरदारांना वरिष्ठ आणि इतर अधिकारी वर्गाची मदत होईल. सप्ताहांती संततीसुख लाभेल.
 
कुंभ - स्पर्धेत स्थान अव्वल राहील 
 
स्वतःच्या आरोग्याची योग्यकाळजी घेतली तर सप्ताहाचा प्रारंभ उत्साहपूर्ण राहील. तुमच्या व्यावसायिक उपक्रमात हितचिंतकांचे सहाय्य लाभेल तर विरोधक निष्प्रभ ठरतील. कोणत्याही स्पर्धेतील तुमचे स्थान अव्वल राहील. साहित्य, अर्थ किंवा बँका अशा क्षेत्रात तुमच्या बौद्धिक क्षमतेचा प्रभाव दिसून येईल. भौतिक सुखांचा आनंद घ्याल. उत्तरार्धात बुद्धी चातुर्याने कौटुंबिक प्रसंग हाताळावे लागतील. उत्तरार्धातील साधी राहणी तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवेल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक करमणुकीचा आनंद घ्याल.
 
मीन -अनपेक्षितपणे प्रवासयोग 
 
राशीच्या व्यय स्थानातील चंद्र-शनी युती नैराश्याचे प्रसंग आणण्याची शक्यता आहे. काही  घटना अर्थ चिंता वाढवतील. अनावश्यक खर्च वाढणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्या. संततीचे उपक्रम देखील खर्चिक ठरण्याची शक्याता आहे. शेअरबाजारात काम करणार्‍यांनी सावध पवित्रा घ्यावा. तरुणाई प्रेमाच्या आकर्षणात वहावत जाण्याची शक्यता आहे. काही जणांना अनपेक्षितपणे प्रवासयोग संभवतो तर काही जणांना शेजार्‍यांचा त्रास संभवतो. सप्ताहांती प्रेमातील एकनिष्ठता सिद्ध करावी लागेल.