उद्योगपतीची अलिशान मोटार दिल्लीत दुकानाला धडकली   

कर्मचार्‍यांसह सहा जखमी

 
नवी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या सीव्हिल लाइन्समधील एका कचोरीच्या दुकानाला अलिशान मोटारीने नुकतीच दुपारी धडक दिली. त्यामुळे कर्मचार्‍यांसह सहा जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.पोलिस उपायुक्त एम. के. मीना यांनी सांगितले की,  राजपूर रस्त्यावर फतेहचंद कचोरी दुकान आहे..पराग मैनी, असे अपघातग्रस्त मोटारीच्या चालकाचे नाव असून तो उद्योगपती आहे. नोएडातील सेक्टर ७९ चा तो रहिवासी आहे. त्याला घटनास्थळी पकडले असून मोटारही जप्त केली. 
 
अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एक पांढरी अलिशान मोटार मागे घेताना प्रथम दुकानाला धडकली आणि नंतर हवेत उडाली होती. यानंतर ती भिंतीला धडकली. उद्योगपती मैनी पत्नीसह कचोरी खरेदीसाठी आला होता. तेव्हा मोटार मागे नेताना त्याने क्लच दाबण्याऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला आणि मोटार थेट दुकानात घुसली. कचोरीसाठी अतिशय प्रसिद्ध असलेले दुकान आहे. तेथे नेहमीच गर्दी असते. परंतु अपघातावेळी गर्दी नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांनी सांगितले. विविध कलमांखाली मैनी याच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 
 

Related Articles