‘आप’ नेते संजय सिंग यांना जामीन   

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंग यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात जामीन मंजूर केला.संजय सिंग यांना जामीन मंजूर करण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात सांगितले. त्यावर, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती पी.बी. रवाळे यांच्या पीठाने त्यांना जामीन मंजूर केला.
 
गेल्या सहा महिन्यांपासून संजय सिंह तिहारच्या कारागृहात बंद होते. त्यांची राज्यसभेवर नुकतीच बिनविरोध निवड झाली होती.संजय सिंग यांना अजूनही तुरुंगात ठेवण्याची गरज आहे का? असे न्यायालयाने ईडीला विचारले होते. त्यावर, ईडीने कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे न्यायालयाने सिंग यांना जामीन मंजूर केला.
 
लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना याच प्रकरणात अटक झाली असतानाच आठच दिवसांत सिंग यांना जामीन मिळाला आहे. एकीकडे, मंत्री आणि ‘आप’ नेत्या आतिशी यांनी भाजपकडून धमक्या मिळत असून भविष्यात काही ‘आप’ नेत्यांना अटक होऊ शकते, अशी भीती वर्तविली असतानाच सिंग तुरूंगाबाहेर पडले आहेत.
 
२०२१-२२ च्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सत्येंद्र जैन यांनादेखील ईडीने अटक केली आहे. ते सध्या तिहारच्या कारागृहात आहेत. भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनादेखील ईडीने याच प्रकरणात अटक केली आहे.
 
संजय सिंग यांच्या जामीन अर्जावर ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू न्यायालयात हजर होते. सिंग यांना जामीन मंजूर करण्यास कोणताही आक्षेप नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. 
 
सिंग यांना गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी ईडीने अटक केली होती. सिंग यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.या प्रकरणात केंद्रीय गुप्तचर विभागानेदेखील (सीबीआय) एफआयआर दाखल केला आहे. ईडी आणि सीबीआयकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे.
 

सत्यमेव जयते...!

 
आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. देशातील लोकशाहीसाठी हा मोठा दिवस असल्याचे सांगतानाच आपने ‘सत्यमेव जयते’ असेही म्हटले आहे. हा आनंदाचा आणि आशेचा क्षण आहे, असे दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी संजय सिंग यांच्या जामिनाचे स्वागत करतानाच दोन वर्षांपासून आप नेत्यांना बनावट प्रकरणांमध्ये लक्ष्य करून अटक केली जात असल्याचे सांगितले. ईडीला आतापर्यंत अटकेशिवाय कोणताही पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही. ईडीने अनेक ठिकाणी छापे घातले. मात्र, एक पैसाही ईडीला सापडला नाही, असेही त्या म्हणाल्या.
 

Related Articles