काँग्रेसकडून आणखी १७ उमेदवार जाहीर   

वाय.एस. शर्मिला, तारिक अन्वर यांचा समावेश

 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर, महमद जावेद, वाय.एस. शर्मिला आदींचा समावेश आहे.आंध्र प्रदेशाच्या काँग्रेस अध्यक्षा वाय. एस. शर्मिला यांना पक्षाने कडप्पा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तसेच, पक्षाने आंध्र प्रदेशातील काकीनाडामधून माजी केंद्रीय मंत्री एम.एम. पल्लम राजू यांना उमेदवारी दिली आहे. महमद जावेद आणि अन्वर यांना बिहारच्या किशनगंज आणि कटिहारमधून पक्षाने निवडणूक आखाड्यात उतरविले आहे.
 
काँग्रेसने काल ओडिशातील ८, आंध्र प्रदेशातील ५, बिहारमधील ३ आणि पश्चिम बंगालमधील एक असे एकूण १७ उमेदवार जाहीर केले. काँग्रेसने आतापर्यंत ११ याद्यांमधून २२८ उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, अमेठी आणि रायबरेलीचा उमेदवार पक्षाने अद्याप जाहीर केलेला नाही.बिहारमध्ये अन्वर आणि जावेद यांच्याशिवाय पक्षाने भागलपूरमधून आमदार अजित शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. राज्यात काँग्रेस नऊ जागा लढवत असून मित्र पक्ष राष्ट्रीय जनता दला २६ आणि डावे पक्ष ५ जागा लढविणार आहेत.
 
बिहारच्या कटिहारमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा अन्वर यांना तिकीट दिले आहे. मागच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे उमेदवार दुलारचंद गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला होता.आंध्र प्रदेशात पक्षाने शर्मिला आणि राजू यांच्याशिवाय राजमुंद्रीमधून गिदुगु रुद्र राजू, बापटलामधून जे.डी. सलीम आणि कुरनूलमधून पी.जी. रामापुल्लैया यादव यांना उमेदवारी दिली आहे.
 
ओडिशाच्या कोरापुटमधून काँग्रेसने विद्यमान खासदार सप्तगिरी उलाका यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्याव्यतिरिक्त बारगडमधून संजय भोई, सुंदरगडमधून जनार्दन देहुरी, बोलंगीरमधून मनोज मिश्रा, कालाहंडीतून द्रौपदी मांझी, नबरंगपूरमधून भुजाबळ माळी, कंधमालमधून अमीर चंद नायक यांना उमेदवारी दिली आहे.काँग्रेसने आंध्र प्रदेशात विधानसभेच्या ११४ आणि ओडिशात ३९ उमेदवारांची घोषणा आतापर्यंत केली आहे.

Related Articles