मनसेचे ठरेना; महायुतीचा चौथा भिडू अजूनही संभ्रमात   

मुंबई, (प्रतिनिधी) : भाजप नेते अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन राज ठाकरे मुंबईला परतले तेव्हा ते महायुतीत सहभागी होणार हे जवळपास निश्चित झाले असे समजले गेले; पण या बहुचर्चित भेटीला दोन आठवडे झाले तरी अजूनही मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत संभ्रम आहे. मनसेला लोकसभेची केवळ एक जागा सोडण्याची राज्यातील नेत्यांची तयारी आहे. त्यामुळे युतीत जायचे की नाही, याबाबत मनसे द्विधा मनःस्थितीत आहे. सन्मानाने युती होत नसेल तर आपली ताकद असलेल्या मतदारसंघात स्वबळावर लढावे, यासाठी कार्यकर्त्यांचा रेटा वाढत असल्याने राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्च रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. तब्बल ४० मिनिटे या दोघांची चर्चा झाली होती. या भेटीच्या वेळी राज यांचे पुत्र अमित ठाकरे देखील उपस्थित होते. 
 
मनसेला सोबत घेण्यासाठी राज्य पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्यानंतरच अमित शहा यांनी राज यांना दिल्लीला बोलावले होते. त्यामुळे मनसे महायुतीत सहभागी होणार हे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात होते. मनसेने लोकसभेच्या दोन जागा मागितल्या होत्या; पण नाशिकची जागा सोडण्यास मुख्यमंत्र्यांनी ठाम नकार दिल्याने दक्षिण मुंबईची एकच जागा सोडण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. याबाबत राज फारसे समाधानी नाहीत.  त्यामुळे त्यांनी महायुतीतील सहभागाचा निर्णय प्रलंबित ठेवल्याची चर्चा आहे. येत्या एक दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर राज भाजपला पाठिंबा देऊन शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या विरोधात ठाणे, कल्याण, नाशिक, दक्षिण व दक्षिण मध्य मुंबईसह ११ ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
 

Related Articles