....म्हणून वाघेरे व भोईर यांची मविआ उमेदवारीची संधी हुकली   

नंदकुमार सातुर्डेकर

 
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून इच्छुक भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे व  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक तथा मराठी नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर दोघेही स्वतंत्रपणे शिवसेना उबाठा  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करून आले होते. मात्र दोघांनीही शिवसेना पक्षप्रवेशास विलंब केल्याने उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आलेल्या माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी देऊन टाकली.
 
सन २००९ मध्ये मतदार संघाच्या पुनर्रचनेत मावळ मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदार संघातून सन २००९ मध्ये गजानन बाबर, तर सन २०१४ आणि सन २०१९ मध्ये श्रीरंग बारणे हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे बारणे यांच्याशी लढत देऊ शकेल अशा उमेदवारासाठी शोध मोहीम सुरू झाली. भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे सर्वप्रथम शिवसेनेच्या गळाला लागले. खरेतर वाघेरे यांनी पूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली व पिंपरी गावठाण मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडणूक मात्र पाच वर्षात भाजपने त्यांना कोणतेही महत्त्वाचे पद दिले नाही. त्यामुळे ते नाराज होते. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड व मावळ आणि घाटाखालील रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत असा मोठा विस्तारलेला असताना संदीप वाघेरे यांनी संपूर्ण मतदारसंघात संपर्क केला. काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन  वाघेरे यांनी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत व नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी वाघेरे यांना आपण लवकरात लवकर 
शिवसेनेत प्रवेश करा, उमेदवारी जाहीर करू असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले. मात्र विचार करण्यात तसेच आईच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेत संदीप वाघेरे यांनी बराच काळ घालवला. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाने पुन्हा नवीन चेहर्‍याचा विचार सुरू केला. दरम्यानच्या काळात भाजपामधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या महापालिकेतील माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना मातोश्री दर्शन घडवून आणले. भाऊसाहेब भोईर हे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत चिंचवड मतदार संघातून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने निवडणूक लढवली. मात्र लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी केली व विजय मिळवला. त्यानंतर काही काळानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादातून भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांची पाठराखण केली. लोकसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनाही मातोश्रीने लवकरात लवकर शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितले. मात्र भोईर हे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिंचवड येथे आयोजित संमेलनात मग्न राहिले. त्यामुळे त्यांचेही काही खरे दिसत नाही असे मानून शिवसेनेने नवीन उमेदवाराचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान एकनाथ पवार यांनी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर व अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घालून दिली. अन् या सार्‍या उलाढालीत वाघेरे यांची तिकिटाची लॉटरी लागली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड दौर्‍यावर असताना संजोग वाघेरे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर मागील बुधवारी शिवसेनेने ज्या सतरा उमेदवारांची नावे जाहीर केली त्यात संजोग वाघेरे यांना मावळ मधून उमेदवारी दिल्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब झाले.
 
या सगळ्या घडामोडीनंतर नाराज झालेले संदीप वाघेरे यांनी भाजपतर्फे तर भोईर यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला यावा आणि आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी धडपड केली. मात्र महा युतीची  उमेदवारी श्रीरंग बारणे यांना मिळाल्याने संदीप वाघेरे व भाऊसाहेब भोईर यांची दुहेरी निराशा झाली.

संजोग वाघेरे यांच्यापुढे आव्हान

आपण सर्वप्रथम तिकिटासाठी शब्द मिळवला. मात्र त्यानंतर संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन आपली संधी घालवली. या भावनेने संदीप वाघेरे अस्वस्थ आहेत. संजोग वाघेरे यांनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर पिंपरीतील ग्रामस्थांची  बैठक  घेतली. मात्र त्या बैठकीकडे संदीप वाघेरे, श्रीरंग शिंदे, मीना नाणेकर या माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली. संदीप वाघेरे यांना मानणारा मोठा वर्ग पिंपरी परिसरात आहेत. त्यामुळे त्यांना शांत करण्याचे मोठे आव्हान संजोग वाघेरे यांच्यापुढे आहे.
 

Related Articles