रुग्णवाहिका गैरव्यवहार प्रकरणी आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा   

रोहित पवार यांची मागणी

 
पुणे : राज्यातील आरोग्य विभागातील रुग्णवाहिकांच्या खरेदीत ६ हजार ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याचे पुरावे आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सोमवारी केली. रोहित पवार म्हणाले, आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध, भोजनात गैरव्यवहार करणार्‍या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणार्‍या रुग्णवाहिकामध्येही गैरव्यवहार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणार्‍या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले. त्याद्वारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असा आरोप करण्यात आला आहे.
 
पवार म्हणाले, निवडणुकीला फंड देण्यासाठी कंपन्यांवर मेहरबानी दाखवली जात आहे. हा लढा सामान्य व्यक्तीचा असून नियम कसे वळविण्यात आले, टेंडर डिझाईन करून वळवले गेले. या गैरव्यवहाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी साडेसहा हजार कोटींचा गैरव्यवहार केला आहे. या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हा गैरव्यवहार केला आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी  करावी, सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, असेही रोहित पवार म्हणाले.
 

खेकडा आरोग्य विभागाला पोखरतोय

 
तानाजी सावंत यांनी खेकड्याने पोखरल्याने धरणांना गळती लागते असे विधान केले होते. या विधानाचा आधार घेत पवार म्हणाले, सावंत यांच्याकडून रुग्णवाहिका प्रकरणात साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. खेकडा वळवळ करतो. धरण पोखरतो. बिळात जावून बसतो. लोकांचे लक्ष कमी झाले की पुन्हा बाहेर येतो. खेकडा महाराष्ट्राला पोखरतोय.
 

निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार

 
आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील  संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही. तसेच सद्य:स्थितीत प्राप्त सेवापुरवठादारासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला नसून अद्यापपर्यंत शासनामार्फत पुरवठादारास कोणताही निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
 

Related Articles