देशाची निर्यात साडेचारशे अब्ज डॉलर होणार   

वृत्तवेध

 
देशापुढे अनेक भौगोलिक, राजकीय आव्हाने असूनही चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशाची व्यापारी मालाची निर्यात ४५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. निर्यातदारांची सर्वोच्च संघटना असलेल्या ‘एफआयईओ’चे अध्यक्ष अश्विनीकुमार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यात क्षेत्राला सुलभ आणि कमी किमतीत कर्ज आणि विपणन समर्थनाची आवश्यकता आहे.
 
ब्रिटन आणि ओमानसोबतच्या मुक्त व्यापार करारांना लवकर अंतिम रूप दिल्याने निर्यातीलाही मदत होईल. ‘एमएसएमई’च्या समस्या सोडवण्यावर मी लक्ष केंद्रित करेन. २०३० पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्सच्या व्यापारी मालाच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यात या युनिट्सची महत्त्वाची भूमिका असेल.
 
लहान आणि मध्यम युनिट्स हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांना पतपुरवठ्याशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागत आहे, असे सांगून कुमार म्हणाले की, मी बँकांना या युनिट्सना पाठिंबा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करेन. संघटना लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेसारख्या प्रदेशात निर्यातदारांसाठी अधिक संधी शोधण्यावर देखील काम करत आहे. आव्हाने आहेत, पण मला खात्री आहे की आम्ही चालू आर्थिक वर्षात ४५० अब्ज डॉलरची निर्यात करू. समस्या असूनही फेब्रुवारीमध्ये निर्यात सुमारे १२ टक्क्यांनी वाढून ४१.४० अब्ज डॉलर झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल २३ -फेब्रुवारी २४ दरम्यान मालाची निर्यात ३९५ अब्ज डॉलर होती.

Related Articles