‘असमान’ शक्तींची लढाई   

भागा वरखडे

लोकसभेच्या निवडणुकीत  ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट  साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची भाजपची तयारी आहे. त्यासाठी अगोदर एक एक पक्ष जोड़ून घेण्याचा प्रयत्न झाला. नंतर मात्र मुजोरी आली. आम्हाला नाही, तर तुम्हाला आमची गरज आहे, असा वागणुकीतला एकूण सूर झाला. ज्या बिजू जनता दलाने भाजपला  अडचणीत वेळोवेळी मदत केली, त्याच्याशी काही जागांवरून भांडणे झाली. अखेर ओडिशात  स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘आम आदमी पक्षा’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दिल्ली आणि पंजाब सहज जिंकू, असे वाटल्याने अकाली दलाशी चर्चा फिसकटली.

अनेक राजकीय पक्ष फोडूनही दररोज कुणाला न कुणाला गळाला लावण्याचे भाजपचे प्रयत्न चालू आहेत. ‘आप’च्या खासदाराला फोडण्यात आलं. काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस अशा पक्षांच्या नेत्यांना फोडण्यात आलं. अजूनही हे सत्र सुरूच आहे. स्वकीयांच्या जोरावर ‘चारशे पार’ करता येणार नाही अशी भीती   भाजपला वाटत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

आमच्या पाहणी प्रमाणे तुमचा उमेदवार निवडून येणार नाही, तो बदला. नाहीतर मतदारसंघ बदला, असे सुरू आहे. लोकशाही व्यवस्थेत दुसर्‍या पक्षाचे उमेदवार ठरवण्याचा, तो बदलण्याचा अधिकार इतर पक्षांना नसतो; परंतु मोदी यांच्या प्रतिमेवर तुम्ही निवडून येणार आहात, तर आम्ही सांगतो, तसे करावे लागेल,  असे भाजप कथित ‘मित्र‘ पक्षांना सांगत आहे. मोदी यांच्या नावावर उमेदवार निवडून येत असेल, तर मग काही उमेदवार बदलण्याची गरजच का पडली ? हाही प्रश्न आहेच. ज्या राज्यांमध्ये भाजपची शक्ती क्षीण आहे अशा राज्यांवर भाजप लक्ष केंद्रित करत आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: गेल्या दीड महिन्यात २३ दिवस दक्षिण भारतातील राज्यांचा दौरा केला. पक्षाचे नेतृत्व सतत आपल्या कुळाचा विस्तार करण्यात आणि नवीन राजकीय पक्षांना जोडण्यात व्यग्र आहे.

दुसरीकडे,  या निवडणूक लढाईत  आपली रणनीती  अजूनही काँग्रेस ठरवू शकलेला  नाही. भाजपचा पराभव करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘इंडिया’ आघाडीतील अनेक पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत, तरी त्यांना दिल्ली गाठायची आहे!  या ‘इंडिया’ आडीच्या जोरावर काँग्रेसला निवडणुकीतून वाटचाल करता येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काँग्रेससाठी ही निवडणूक  अस्तित्वाची लढाई आहे.  स्वबळावर विरोधी पक्षनेतेपद मिळवू शकेल, अशीही त्यांची स्थिती नाही. काँग्रेसला खरोखरच समर्थ विरोधी पक्ष व्हायचे असेल, तर पक्षाच्या नेत्यांना एकत्र ठेवावे लागेल. यासोबतच या निवडणुकीत स्वबळावर शतक झळकावण्याची गरज आहे. देशातील लोकसभेच्या ५४३ पैकी सुमारे २०० जागांवर काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत असल्याने काँग्रेसचे नाव प्रमुख विरोधी पक्ष म्हणून घेतले जाते.  कर्नाटक, छत्तीसगढ, हरयाना, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम, राजस्तान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांत  भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे.
शतकी जागा जिंकण्याचा दावा तेव्हाच करता येईल, जेव्हा या पक्षाचे नेते भाजपविरोधात सामूहिकपणे लढत देऊ शकतील; परंतु पहिल्या टप्प्याचे अर्ज भरून झाले, तरी ते दृष्टिपथात येताना दिसत नाही. दररोज कुणी ना कुणी हाती कमळ धरताना दिसतो आहे.   भाजपने आतापर्यंत सात उमेदवारी याद्या जाहीर केल्या. काँग्रेस कमी  जागा लढवत असूनही उमेदवार ठरवण्यात एवढ्या अडचणी का? याचे कारण वरिष्ठ नेतृत्व दुबळे आणि प्रादेशिक  नेते मुजोर असे आहे.  नरेंद्र मोदी सतत निवडणूक प्रचार करत  आहेत.. तर काँग्रेसला  प्रचाराचा विसर पडला काय असे वाटत आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समारोपानंतर एकही मोठी सभा नाही, की रोड शो झाला नाही.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत अनेक बड्या नावांची तिकिटे कापण्यात आली. या यादीत अनेक आश्चर्यकारक नावेही आहेत. असे असतानाही पक्षातील नाराजी  फारशी उघड झालेली नाही. महाराष्ट्रात मात्र काही मतदारसंघात नाराजी दिसली. प्रचंड वाद आणि विरोध असतानाही भाजपने नवनीत राणा, रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली   दुसरीकडे तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू असून, उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारही बदलण्यात येत आहेत.

याचे ताजे उदाहरण राजस्तानमध्ये पाहायला मिळाले. काँग्रेसने जयपूरमधून सुनील शर्मा यांना उमेदवारी दिली होती; मात्र त्यांच्या नावावरून वाद निर्माण झाल्यावर त्यांच्या जागी पक्षाने राज्याचे माजी मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांना उमेदवार म्हणून घोषित केले.  काँग्रेस पक्ष सोडून  भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेकांना  केंद्रातील सत्ताधारी पक्षाने बक्षीस दिले.  उदाहरणार्थ  नवीन जिंदाल, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद, आरपीएन सिंह, हिमंत सरमा. राहुल गांधी यांच्या जवळच्या मित्रांनी पक्ष सोडला. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘ए फ्रेंड इन डीड इज ए फ्रेंड इननीड.’ इथे तर मित्र अडचणीत असताना त्याच्या अडचणी आणखी वाढवण्यात आल्या.

या निवडणुकीत काँग्रेसला  जर चांगली कामगिरी करता आली नाही, तर केवळ संघटनेलाच फटका बसणार नाही, तर प्रादेशिक पक्षही काँग्रेसवर आणखी कुरघोडी करतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे असले, तरी पक्ष अजूनही गांधी घराण्यावर अवलंबून असल्याचे दिसते. या लोकसभा निवडणुकीत गांधी घराण्याची  विश्वासार्हता पणाला लागली आहे.

‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ यांच्यातील लढाई ही दोन असमान आघाड्यांमधील लढाई आहे.  भाजपकडे ‘सीबीआय’, ‘ईडी’, ‘आयटी’ इत्यादी तपास संस्था, प्रशासकीय अधिकारी आणि निमलष्करी दले आणि निवडणूक आयोग आदी आहेत. घटनाबाह्य निवडणूक रोखे आणि इतर  मार्गांनी मिळवलेला पैसा आणि फौजफाटा आहे, तर ’इंडिया’कडे सैन्य, संसाधने नाहीत. काँग्रेसची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. ही कारवाई किती योग्य हा प्रश्न आहे. सध्या गोंधळाच्या वातावरणातील  या असमान शक्तींमधील लढाईचा निर्णय काय लागतो? ते लवकरच कळेल.

 

Related Articles