भाजपच्या दहा वर्षांच्या काळात सरकारी नोकर्‍या दीडपट वाढल्या   

रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांची माहिती

 
नवी दिल्‍ली : केेंद्रातील भाजप सरकारच्या दहा वर्षांच्या काळात सरकारी नोकर्‍या दीडपट वाढल्या असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. 
रोजगार मेळाव्यात एक लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरीची प्रमाणपत्रे देण्याचा आली. त्या वेळीं मोदी दृकश्राव्य माध्यमातून बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्यापेक्षा नोकर्‍यांची संख्या गेल्या दहा वर्षांत वाढली आहे. पूर्वीच्या सरकारने नोकरभरती प्रलंबित ठेवली..हा प्रकार लाचखोरीला चालना देणारा ठरला होता. माझ्या सरकारने मात्र, नोकरभरतीत पारदर्शकता आणली. तसेच योग्य कालावधीत ती पूर्णही केली. तरुणांनी कष्ट आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर सरकारी नोकरी प्राप्‍त केली असून त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले आहे.
 
ते म्हणाले, एक कोटी घरांवर सौरपॅनल उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तसेच या क्षेत्रात मोठी गुंतवणूकही होणार आहे.  त्याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी तरुणांंना उपलब्ध होणार आहेत. देशात सध्या 1.25 लाख स्टार्ट अप सुरू आहेत. पोषक वातावरणामुळे त्यात देश जागतिक पातळीवर तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. भविष्यात आणखी उद्योग उभे राहणार आहेत. त्यातून लाखो रोजगार निर्माण होतील. स्टार्ट अपना चालना देण्यासाठी प्राप्‍तिकरात सरकराने सूट दिली आहे. तसेच संशोधन आणि नव कल्पनांना वाव देण्यासाठी एक लाख कोटींचा निधी दिला आहे.
 
यापूर्वीच्या सरकारने नागरिकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचा चुराडा केला होता, असे सांगताना मोदी म्हणाले, वंदेभारत रेल्वेची संख्या वाढत आहे. त्यासाठी आधुनिक 40 हजार डबे वापरले जाणार आहेत. सर्वसाधारण डब्यांबरोबरच अत्याधुनिक डब्यांच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना सुखदायक प्रवास करता येईल.. पूर्वीच्या सरकारने रेल्वेच्या विकासाकडे दुर्लक्ष केले होते. आता रेल्वेचे आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. संपर्काचे जाळे वाढले आहे. तसेच पर्यटनालाही चालना मिळाली आहे. नवीन उद्योगधंदे, नवी बाजार पेठ आणि पर्यटन क्षेत्राचा विस्तार झाल्यास लाखो नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासाचा धडाका लावला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात 11 लाख कोटींची तरतूद केली आहे. रोजगार मेळाव्यातून केंद्रीय संरक्षण दलातही तरुणांना नोकर्‍या प्राप्‍त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.. त्याद्वारे तरुणांना राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. सैन्यभरतीासाठी हिंदी, इंग्रजीशिवाय 13 प्रादेशिक भाषेत स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यामुळे उमेदावारांची मोठी सोय झाली आहे.या प्रसंगी कर्मयोगी भवनाच्या पहिल्या टप्प्याचा पायाभरणी समारंभ झाला. भविष्यातील कर्मयोगी अभियानाचा तो पाया ठरणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. 
 

Related Articles