‘ग्रॅमी’वर भारताची मुद्रा   

राधिका परांजपे

 
संगीत क्षेत्रातील ‘ग्रॅमी’ या जागतिक महत्त्वाच्या पारितोषिकांच्या  सोहळ्यामध्ये या वर्षी    शंकर महादेवन, गणेश राजगोपालन, उस्ताद झाकीर हुसेन, व्ही. सेल्वागणेश आणि राकेश चौरासिया यांच्या ‘शक्ती’ या वृंदास  पारितोषिक  मिळाल्याचा विशेष आनंद आहे. यामुळे त्यांच्या कारकिर्दीला नवी झळाळी प्राप्त होईलच; पण आपल्या मातीतील संगीत जगामध्ये रुजत असल्याची भावना संगीतप्रेमींना सुखावणार आहे.
 
संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘ग्रॅमपारितोषिक दिले जाते. जगभरातील संगीतकार ग्रॅमी पुरस्कारांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात. यातील मतदार सदस्य प्रत्येक पुरस्कारासाठी पाच नामांकित व्यक्तींची निवड करतात. संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित समारंभांपैकी एक असणार्‍या या सोहळ्यात पॉप, रॉक, कंट्री, जॅझ, हिप हॉप, आर अँड बी आणि अभिजात संगीत यांसारख्या विविध शैलीतील संगीतकारांना सन्मानित केले जाते. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘ऑस्कर’ आणि पत्रकारितेतील ‘पुलित्झर’ पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो, त्याचप्रमाणे संगीतक्षेत्रात ‘ग्रॅमी पुरस्कारा’लाही महत्त्व आहे.
 
पहिला ग्रॅमी पुरस्कार सोहळा 1959 मध्ये लॉस एंजेलिस येथे झाला आणि त्यात 28 पुरस्कार देण्यात आले होते. त्यावेळी विजेत्यांना सादर केलेला पुतळा सोन्याचा मुलामा असणारा ग्रामोफोन होता. यालाच फोनोग्राफ किंवा रेकॉर्ड प्लेयर म्हणूनही ओळखले जात असे. ‘ग्रॅमी’ हे नाव ग्रामोफोनला दिलेली भावांजली असल्यामुळेच संगीत क्षेत्रावर त्याचा  प्रभाव बघायला मिळतो.
 
ग्रॅमी पुरस्कारांमध्ये कोणतेही रोख पारितोषिक दिले जात नाही. तथापि, विजेत्यांना आजही ग्रॅमी पुतळा मिळतो, जो सोन्याचा असतो.  सहाजिकच या पुरस्कारानंतर कलाकाराची  पत वाढते आणि तो वा ती अधिक कमाई करु शकते. यावेळी दिल्या जाणार्‍या छोटेखानी भेटींमध्ये  विजेत्यांना परफ्यूमपासून स्पा आणि रेस्टॉरंट कूपनपर्यंत काहीही मिळू शकते. ग्रॅमी अवॉर्ड मिळाल्यानंतर शो, कार्यक्रम आणि कार्यक्रमांच्या तिकिटांसह संगीतकाराची फी आपोआप वाढते. हा अप्रत्यक्ष लाभ कलाकाराच्या जीवनात आमूलाग्र बदल आणू शकतो. 
 
2010 मध्ये ए.आर रेहमानला ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जयहो’ या गीतासाठी  ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम जॉर्ज सोल्टीच्या नावावर असून त्यांनी 31 पुरस्कार जिंकले आहेत. 79 नामांकनांसह जॉर्ज सोल्टी आणि क्विन्सी जोन्स यांच्या नावावर सर्वाधिक ग्रॅमी नामांकने मिळवण्याचा विक्रम आहे. ग्रॅमी पुरस्कार 84 श्रेणींमध्ये दिले जातात. हा सोहळा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा पुरस्कार सोहळा आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे 66 वे वर्ष होते.
 
या वर्षी  ‘ग्रॅमी’मध्ये भारताचे ‘शक्ती’ प्रदर्शन दिसून आले! पाच भारतीय कलाकारांनी यावर मोहर उमटवली. ‘ग्रॅमी सारख्या महत्त्वपूर्ण पुरस्कारांमध्ये भारतीय नावे येऊ लागणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.  शंकर महादेवन, गणेश राजगोपालन, उस्ताद झाकीर हुसेन, व्ही सेल्वागणेश आणि राकेश चौरसिया यांना ग्रॅमी मिळाल्याचा विशेष आनंद आहे. यामुळे त्यांच्या कारकिर्दीला नवी झळाळी प्राप्त होणार आहेच; खेरीज आपल्या मातीतील संगीत जगामध्ये रुजत असल्याची भावनाही प्रत्येक संगीतप्रेमीला सुखावणारी आहे. 
 
झाकीर हुसेन यांनी  आधीच तबला जगभर पोहोचवला आहे. मात्र या पुरस्काराने त्यावर मोहोर उमटली असल्याची भावना रसिकांमध्ये आहे.  गायक  शंकर महादेवन यांचीही ओळख बहुमुखी कलाकार अशी आहे. ख्याल गात नसले तरी त्यांना अभिजात किंवा शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आहे. आपल्या रचनांमध्ये ते शास्त्रीय संगीतातील विविधांगाचा अत्यंत खुबीने वापरही करतात. त्यामुळेच असे ख्यातकीर्त कलाकार आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या अभ्यासावर, आविष्कारावर शिक्कामोर्तब होते तेव्हा मिळालेली ही पोचपावती बहुमोल असते. त्यांचे काम स्वदेशातच नव्हे तर जगभर वाखाणले गेल्याची ही दाद असते. म्हणूनच असे पुरस्कार कोणा एका कलाकाराला नव्हे तर आपल्या मातीतील संगीताला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवतात असे वाटते.
 
‘शक्ती’ या फ्यूजन बँडने 45 वर्षांनंतर आपला पहिला आल्बम रिलीज केला. इंग्लिश गिटारवादक जॉन मॅक्लॉफलिनने भारतीय व्हायोलिन वादक एल. शंकर, तबलावादक झाकीर हुसेन आणि टी. एच. ‘विक्कू’ विनायकरामसोबत ‘शक्ति’ या फ्युजन बँडची सुरुवात केली होती. पण 1977 नंतर हा बँड फारसा सक्रिय नव्हता. 1997 मध्ये जॉन मॅक्लॉफलिनने त्याच संकल्पनेवर पुन्हा ‘रिमेंबर शक्ती’ नावाचा बँड तयार केला. त्यात व्ही. सेल्वागणेश (टी. एच. ‘विक्कू’ -विनायकरामचा मुलगा), मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास आणि शंकर महादेवन यांचा समावेश होता. 2020 मध्ये हा बँड पुन्हा एकत्र आला आणि ‘शक्ती’ म्हणून त्यांनी 46 वर्षांनंतर  ‘दिस मोमेंट’ हा पहिला आल्बम रिलीज केला. 50 वर्षांपासून संगीताच्या क्षेत्रातील ही वाटचाल आणि संघर्ष याचे प्रतिबिंब या आल्बममधून होते.  
 
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये या वर्षी  सर्वाधिक पुरस्कार महिला कलाकारांना मिळाले. त्यात मायली सायरस, टेलर स्विफ्ट, बिली एलिश, व्हिक्टोरिया मोन या कलाकारांनी चांगलीच बाजी मारली. मायली सायरसने आयुष्यातील पहिलेच ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड जिंकले. त्यामुळे एका अर्थी ती ‘सातवे आसमानपे’ होती. फॅन्सनेही तिचे मनापासून कौतुक केले.. मायली सायरसला ‘फ्लॉवर्स’ या गाण्यासाठी ‘रेकॉर्ड ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. मायली सायरस गेली अनेक वर्षे मेहनतीने संगीतक्षेत्रात टिकून आहे. या पुरस्काराने तिच्या मेहनतीचे चीज झाले असे म्हणायला हरकत नाही. 
 
टेलर स्विफ्टच्या ‘मिडनाईट’ या अल्बमला ‘अल्बम ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला. टेलर स्विफ्ट ‘आल्बम ऑफ द इयर’ या पुरस्काराची चौथ्यांदा मानकरी ठरत आहे. ग्रॅमी अ‍ॅवॉर्डच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडत आहे. याआधी टेलर स्विफ्टला तीन आल्बम्ससाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2023 मध्ये आलेल्या ‘मिडनाईट’ या आल्बमने आजपर्यंतचे सगळे विक्रम मोडले. त्यामुळे टेलरच्या या आल्बमला हा पुरस्कार मिळणार हे काहीसे गृहीतच होते.
 
बिली एलिश हेसुद्धा संगीतक्षेत्रातील आणखी एक प्रसिद्ध नाव. आजपर्यंत तिने अतिशय वेगळ्या चालीची गाणी दिली आहेत. गाण्यातील वेगळेपणासाठी ती प्रसिद्ध आहे. तिच्या ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ या गाण्याला ‘साँग ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. हे गाणं ‘बार्बी’ या चित्रपटात वापरलं गेलं होतं. ते चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. सोशल मिडीयावर रील्समध्ये हे गाणं भरपूर लोकप्रिय झालं.
 
संगीतक्षेत्रात नव्याने पदार्पण करुन वाखाणण्याजोगी कामगिरी करणार्‍या कलाकारांना बेस्ट न्यू आर्टिस्ट हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा व्हिक्टोरिया मोनेट् या पुरस्काराची मानकरी ठरली. एकूणच संगीत क्षेत्रातील पुरस्कारांसाठी नॉमिनींमध्येसुद्धा महिलांची नावे जास्त होती. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यामध्ये महिलांचा करिष्मा  दिसत होता. या सगळ्यात ‘लाना देल रे’ या गायिकेला एक तरी पुरस्कार मिळायला हवा होता असं चाहत्यांचं मत दिसून आलं.             
 

Related Articles