लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही   

कायदा समजून घेताना , अ‍ॅड. जी.एम.आळंदीकर बारामती,

संविधानाच्या अनुच्छेद 22(1) नुसार अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण याचा विचार करताना व भारतीय न्यायसंहितेच्या कलम 47 नुसार अटक केलेल्या व्यक्तीला अटकेची कारणे व जामिनाच्या हक्काची माहिती देणे आवश्यक आहे; मात्र प्रत्येक वेळी अटक करताना लेखी नोटीस गरजेची नसून संबंधित व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला अटकेबद्दल माहिती दिली तरी पुरेशी आहे. उच्च न्यायालयांनी देखील देशाच्या सुरक्षासंबंधी अथवा गंभीर गुन्ह्यामध्ये नोटीसच्या औपचारिकतेचा मुद्दा उपस्थित करून जामीन देऊ नये, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. उच्च न्यायालयाने दिलेला जामीन मंजुरीचा आदेश रद्द करून संबंधित व्यक्तीला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. 28 ऑक्टोबर 2026 रोजी राजस्थान राज्य विरुद्ध झाबरा राम (2026 0 सी जे (एस सी) 894) या फौजदारी अपीलामध्ये न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश व न्यायमूर्ती प्रसन्न.बी. वराळे यांच्या खंडपीठाने देशातील पोलिस यंत्रणेला व न्यायालयांना मार्गदर्शक असा तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारा महत्वपूर्ण आदेश दिला आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खटल्यांचा संदर्भ देत सविस्तर दिलेल्या या निकालाने अटकेबाबतच्या तरतुदी स्पष्ट केल्या. जेसलमेर येथील पोखरण चौकीतील सीआयडीच्या पोलिस उपनिरीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित झबरा राम हा एका पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या सूत्रधाराच्या संपर्कात होता. आर्थिक लाभाच्या बदल्यात भारतीय लष्करासंबंधी संवेदनशील लष्करी गुप्त माहिती तोे प्रसारित करत होता. त्यानुसार त्याला शासकीय गुपित अधिनियम 1923 (ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट) नुसार 23 व 26 जानेवारी 2026 रोजी नोटीस बजावण्यात आल्या व त्याला या कायद्याच्या कलम तीन अंतर्गत माहिती देण्यासाठी 28 जानेवारी रोजी केंद्रीय चौकशी केंद्र जयपूर येथे हजर राहण्यास सांगितले. प्राथमिक चौकशी व तांत्रिक विश्‍लेषण पूर्ण झाल्यावर सिद्ध झाले, की प्रतिवादी संशयित व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पोखरण व जैसलमेरमधील संवेदनशील लष्करी छायाचित्रे, व्हिडिओ व सैन्याच्या हालचाली याचा तपशील पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्‍यांना पाठवत होता. या प्रकरणी गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी आरोपाच्या विशिष्ट वस्तुस्थितीचा आधार प्रतिवादीला कळवण्यात आला होता. अटक करताना प्रतिवादीने सांगितल्याप्रमाणे त्याचा भाऊ भोमाराम याचा मोबाइल क्रमांक घेऊन दोन पोलीस साक्षीदारांच्या उपस्थितीत भावाला अटकेची माहिती दिली. तशी नोंद अटक मेमोमध्ये करण्यात आली. त्यावर प्रतिवादीची सही घेतली. दुसर्‍या दिवशी प्रतिवादीला जयपूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांचेसमोर हजर करण्यात आले. त्याचे प्रतिनिधित्व कायदेशीर वकील यांनी केले व गुणवत्तेच्या आधारावर पोलीस कोठडीला विरोध केला. यावेळी वकिलांनी अटकेची कारणे न दिल्याबद्दल किंवा न कळवल्याबद्दल न्यायदंडाधिकारी यांचे समोर कोणतीही तक्रार व आक्षेप नोंदवला नाही. न्यायालयाने भारतीय न्यायसंहितेच्या कलम 47 ची नोटीस तपासली व रिमांडच्या आदेशात एक निष्कर्ष नोंदवला, की प्रतिवादीच्या कुटुंबाला अटकेची माहिती देण्यात आली होती. रेकॉर्डवर पुरेशी कारणे अस्तित्वात होती व आरोपीला माहिती देण्यात आल्याचे दिसून आले. रिमांडनंतर नियमित जामीनसाठी अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी फेटाळला व गुणवत्तेचा विचार करून असे मत मांडले, की स्वाक्षरी केलेल्या अटक मेमोमध्ये नोंदवलेली सविस्तर कारणे भारतीय न्यायसंहितेच्या कलम 47 चे पालन करतात व स्वतंत्र लेखी दस्तऐवज सादर न करणे हे प्रतिवादीला जामिनावर सोडण्याचे कारण असू शकत नाही, त्यावरुन जामीन फेटाळला.
 
त्यावर प्रतिवादीने उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाने विविध खटल्यांचा संदर्भ देत अटकेमध्ये प्रक्रियात्मक उणीवा राहिल्या असल्याचे स्पष्ट करून रिमांड आदेशामध्ये अटकेच्या कारणांच्या मेमोच्या बजावणीचा उल्लेख नव्हता, साक्षीदारांनी अटकेच्या वेळी उपस्थित असल्याचे मेमोवर स्वाक्षरी केल्याचे सांगितले नव्हते, अटकेनंतर लगेच अटकेची सविस्तर लेखी व वैयक्तिक कारणे बजावण्यात आलेले अपयश सांगून प्रतिवादीच जामीन अर्ज मंजूर केला. त्यावर राजस्थान सरकारद्वारे सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले.
 
युक्तीवादामध्ये शासकीय गुपित अधिनियम 1923 कलम 8(1) नुसार दिलेल्या नोटिसामध्ये आरोपांची पूर्ण माहिती प्रतिवादीला होती. अटकेची कारणे न कळवल्याबद्दल कोणतीही तक्रार न करता न्यायदंडाधिकारी पुढे गुणवत्तेच्या आधारावर रिमांडला विरोध केला गेला. जोपर्यंत प्रत्यक्ष नुकसान सिद्ध होत नाही, तोपर्यंत प्रक्रियात्मक सुरक्षा उपायाचे पालन करणे पुरेसे आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती किंवा सिद्ध करण्यात प्रतिवादी अयशस्वी ठरला. त्यामुळे उच्च न्यायालयाचा जामीन मंजूर करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले.
 
प्रतिवादीच्या वतीने युक्तिवाद करताना संविधानाचे अनुच्छेद 22(1) नुसार व भारतीय न्यायसंहितेच्या कलम 47 चे उल्लंघन झालेले आहे. कितीही गंभीर अपराध असला तरी घटनात्मक संरक्षणाचे पालन झालेच पाहिजे असे सांगण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून खंडपीठाने स्पष्ट केले, की अटकेची कारणे कळवणे संविधानानुसार व भारतीय न्यायसंहितानुसार गरजेचे आहे. संबंधित आरोपीला त्वरित कारणे कळाल्यास त्याला कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेता येतो, रिमांडला विरोध करता येतो, यात वाद नाही; मात्र या प्रकरणात त्याचे तंतोतंत पालन झाल्याचे दिसून आले आहे. प्रतिवादीला 23 जानेवारी व 26 जानेवारी रोजी दिलेल्या नोटिसा त्याला अटक करताच त्याच्या भावाला कळवलेली माहिती, केस डायरीचे अवलोकन करून स्पष्ट होते, की प्रतिवादीला त्याच्या अटकेची माहिती दिली गेली होती. त्याच्या मोबाईलमध्ये आढळलेली संवेदनशील माहिती स्वतःच अटकेची कारण ठरते. अटक मेमोमध्ये अटकेची तारीख, वेळ अटक करणार्‍या अधिकार्‍याची ओळख पदनाम स्पष्ट करते. प्रतिवादीला त्याच्या घटनात्मक हक्‍काची माहिती देण्यात आली होती याचीही नोंद आहे. साक्षीदाराच्या उपस्थितीत ते प्रतिवादीला वाचून दाखवण्यात आले. कोणत्या नातेवाईकाला माहिती द्यायची विचारल्यानंतर भावाला फोन करण्यात आला. अटक केलेले ठिकाण व भावाचे गाव वेगळे असल्याने लेखी सूचनेवर भावाची सही घेणे शक्य नव्हते. त्यामुळे मोबाइल फोनवरून माहिती देण्यात आली. ही बाब अटक मेमोमध्ये  नोंदवली गेली.
 
पहिल्या रिमांडच्या वेळी अटकेचे कारण न दिल्याबद्दल बचाव देखील करण्यात आला नव्हता. या सर्व बाबीचा विचार करता विविध खटल्यांचा संदर्भ देत वरील खंडपीठाने स्पष्ट केले की, केवळ लेखी कारणाचा अभाव अटकेला आपोआप बेकायदेशीर ठरवत नाही. जोपर्यंत स्पष्ट पूर्वग्रह किंवा बचावाच्या योग्य संधीचा नकार होत नाही. अटकेनंतर लगेच जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावरून आरोपांची तात्काळ माहिती पूर्ण समज होती हे सिद्ध होते. उच्च न्यायालयाने प्रक्रियात्मक त्रुटीचा आधार घेताना विविध खटल्याचा चुकीचा संदर्भ घेतला. नोटीस बजावण्याच्या पद्धतीतील प्रक्रियेत फक्त त्रुटीमुळे अटक आपोआप अवैध ठरू शकत नाही किंवा आरोपीला नियमित जामीनचा हक्‍क मिळू शकत नाही. विशेषत: राष्ट्रीय सुरक्षा व सार्वभौम अखंडतेवर परिणाम करणारे, हेरगिरीच्या गंभीर आरोपाच्या प्रकरणात तर नाहीच. त्यामुळे उच्च न्यायालयाचा जामिन मंजुरीचा निर्णय रद्द करत असून दोन आठवड्याच्या आत प्रतिवादीने सत्र न्यायालय किंवा तपास यंत्रणेसमोर आत्मसमर्पण करावे, अन्यथा संबंधित राज्य त्याला कायद्यातील तरतुदीनुसार तात्काळ ताब्यात घेईल असा आदेश दिला आहे. एकूणच प्रत्येक वेळी लेखी नोटीसचा आग्रह धरून जामिनासाठी अर्ज दाखल करणारे आरोपींना जरब बसवणारा व अटकेच्या तरतुदी स्पष्ट करणारा हा निर्णय आहे.

Related Articles

Comments (0)

Be the first to share your view on this news.

Leave a comment

0 / 300
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.