आयुष अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या यादीत   

5 हजार 961 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे. आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस) आणि युनानी (बीयुएमएस) या तीन अभ्यासक्रमांसाठी एकूण 5 हजार 961 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. राज्यातील 204 वैद्यकीय महाविद्यालयांमधील एकूण 13 हजार 750 जागांपैकी पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये 7,116 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तिसर्‍या फेरीअखेर 673 जागा रिक्त असून, त्या स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील. या फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
 
आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या यादीत राज्यातील 139 महाविद्यालयांमधील 9,303 जागांपैकी पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये 5,041 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसर्‍या फेरीत 4,085 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, 177 जागा रिक्त आहेत. यामध्ये सहा शासकीय महाविद्यालयांतील 329, शासकीय अनुदानित व महापालिकेच्या 17 महाविद्यालयांतील 860, तर विनाअनुदानित 116 महाविद्यालयांतील 2,896 जागांचा समावेश आहे. होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या यादीत राज्यातील 57 महाविद्यालयांमधील 4,019 जागांपैकी पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये 1,847 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसर्‍या फेरीत 1,683 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, 489 जागा रिक्त आहेत. यामध्ये दोन शासकीय महाविद्यालयांतील 82, तर विनाअनुदानित 55 महाविद्यालयांतील 1,601 जागांचा समावेश आहे.
 
युनानी अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या यादीत राज्यातील आठ महाविद्यालयांमधील 428 जागांपैकी पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये 228 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसर्‍या फेरीत 193 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, सात जागा रिक्त आहेत. यामध्ये शासकीय अनुदानित व महापालिकेच्या तीन महाविद्यालयांतील 27, तर विनाअनुदानित पाच महाविद्यालयांतील 166 जागांचा समावेश आहे.तिसर्‍या फेरीत महाविद्यालयाचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी आज (बुधवारी) सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन प्रवेश परीक्षा कक्षातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Comments (0)

Be the first to share your view on this news.

Leave a comment

0 / 300
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.