चित्रसृष्टी दहशतीत..!   

महेश जोशी

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेला गोळीबार केवळ एका प्रसिद्ध व्यक्तीवरील हल्ला नसून महानगराच्या कायदा-सुव्यवस्थेला दिलेले थेट आव्हान आहे. ९०च्या दशकातील ‘अंडरवर्ल्ड’ची दहशत संपल्याचा दावा होत असताना पुन्हा एकदा हिंदी चित्रसृष्टी  गुन्हेगारांचे लक्ष्य ठरत आहे.
 
मुंबई आणि गुन्हेगारी जगताचे नाते जुने असले, तरी गेल्या दोन दशकांमध्ये संघटित गुन्हेगारीचा (अंडरवर्ल्ड) प्रभाव ओसरल्याचे मानले जात होते. मात्र  जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराने या समजाला सुरुंग लावला. गजबजलेल्या रस्त्यावर, पोलिसांच्या नाकावर टिच्चून झालेला हा हल्ला केवळ एका अभिनेत्याला लक्ष्य करण्यासाठी नव्हता, तर संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये आणि मुंबईकरांमध्ये दहशत पसरवण्यासाठी रचलेला पूर्वनियोजित कट होता.
 
टायगर श्रॉफ जुहू येथील पुष्पा नारसी पार्कजवळ नेहमीप्रमाणे आपल्या दिनक्रमात व्यस्त होता. फुटबॉल खेळून तो आपल्या मोटारीतून परतत असतानाच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या वाहनावर अचानक पाच ते सहावेळा   गोळ्या झाडल्या.हल्लेखोर तिघे होते. एकजण दुचाकीवर सज्ज उभा होता, तर दोघांनी रस्त्यावर उभे राहून थेट गाडीवर गोळीबार केला.या गोळीबारात टायगर  सुदैवाने बचावला. काचांच्या तुकड्यांमुळे आणि बंदुकीच्या दारूमुळे त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली; मात्र टायगरच्या चालकाच्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला. याच वेळी तिथे उपस्थित असलेला व्लॉगर आणि कंटेंट क्रिएटर उमेश चरण हा तरुण छातीत गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर टायगरने तातडीने प्रसंगावधान दाखवत स्वत: मोटार चालवून जखमींना नानावटी रुग्णालयात दाखल केले. 
 
हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तातडीने १५ विशेष तपास पथके स्थापन केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि माहितीदारांच्या नेटवर्कच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ ते ३६ तासांमध्ये मोठी प्रगती साधली. हल्ल्यानंतर हल्लेखोर मुंबईतून पसार झाले होते. राजस्तान पोलिसांच्या सहकार्याने कोटा रेल्वे स्थानकावर पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून तीन संशयितांना अवघ्या १५ मिनिटांच्या अत्यंत वेगवान कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आले. यामध्ये बिहारच्या बेगुसराय येथील रितिक ऊर्फ रोशन आणि हरयानाच्या सोनीपत येथील रेहान यांचा समावेश आहे.  रेहान लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय हस्तक अनिल पंडित याच्या संपर्कात होता. हल्ल्यानंतर लगेचच ‘सोशल मीडिया’वर अनिल पंडित आणि हरमन संधू यांच्या नावाने एक पोस्ट आणि व्हॉईस नोट प्रसारित झाली होती, ज्यात या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. सलमान खानसोबत काम करणार्‍यांना लक्ष्य केले जाईल, अशी थेट धमकी त्या पोस्टमध्ये देण्यात आली होती. हल्लेखोरांनी गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल मुंबईच्या अंधेरी परिसरातून पोलिसांनी जप्त केली. 
 
तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे, हल्लेखोरांनी केवळ टायगर श्रॉफवरच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतील इतर अनेक बड्या कलाकारांच्या घरांचीही टेहळणी केली होती. अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अक्षयकुमार यांच्या घराभोवती कडक पोलिस बंदोबस्त असल्याने हल्लेखोरांनी सोपे लक्ष्य म्हणून टायगरची निवड केली आणि सुमारे सात दिवस त्याचा माग काढला. 
 
टायगर श्रॉफवरील या हल्ल्याने चित्रपटसृष्टी आणि गुन्हेगारी जगतातील संबंधांचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आणला. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मुंबईचे संघटित गुन्हेगार हिंदी चित्रपट क्षेत्रावर आपली पकड घट्ट करून बसले होते. हाजी मस्तान, करीम लाला यांच्या काळातील अनौपचारिक संबंध पुढे जाऊन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनी, छोटा राजन आणि अबू सालेम यांच्या काळात हिंसक आणि खंडणीखोर बनले. त्या काळी चित्रपटांना बँकांकडून अधिकृत अर्थसाह्य मिळत नव्हते. त्यामुळे काळा पैसा चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवला जात असे. परिणामी, चित्रपटांचे परदेशातील वितरण हक्क बळकावणे, कलाकारांच्या तारखांवर नियंत्रण ठेवणे आणि बड्या निर्मात्यांकडून करोडो रुपयांची खंडणी उकळणे हा गुन्हेगारांचा नित्यक्रम झाला होता. 
 
ऑगस्ट १९९७ मध्ये ‘टी-सिरीज’चे संस्थापक गुलशन कुमार यांची भरदिवसा  निर्घृण हत्या करण्यात आली. जानेवारी २००० मध्ये दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर त्यांच्या सांताक्रूझ कार्यालयाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात ते थोडक्यात बचावले. सुभाष घई, मणि रत्नम आणि राजीव राय यांच्यासारख्या दिग्दर्शकांना खुनाच्या धमक्या आणि हल्ल्यांचा सामना करावा लागला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि एन्काउंटर पथकांनी नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला गुन्हेगारीचे कंबरडे मोडले. 
 
पुढे चित्रपटसृष्टीला ‘उद्योगा’चा दर्जा मिळाला. कॉर्पोरेट स्टुडिओ आले आणि वाटले, की हे क्षेत्रगुन्हेगारांच्या  तावडीतून कायमचे मुक्त झाले. आज मुंबईत दाऊद किंवा छोटा राजन टोळीचा पूर्वीसारखा दरारा उरला नसला, तरी त्या पोकळीत उत्तर भारतातील टोळ्यांनी, विशेषतः लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने  पाऊल ठेवले आहे. या टोळ्यांचे स्वरूप जुन्या अंडरवर्ल्डपेक्षा थोडे वेगळे आहे. आजचे गँगस्टर्स बंद खोलीतून लपून काम करत नाहीत, तर ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म, ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’ (व्हीपीएन) आणि ‘एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप्स’चा वापर करून धमक्या देतात आणि तशी जाहीर कबुलीही देतात. गँगचे प्रमुख किंवा महत्त्वाचे म्होरके कॅनडा, अमेरिका किंवा दुबईसारख्या देशांमध्ये बसून स्थानिक बेरोजगार तरुणांना पैशांचे अथवा टोळीत मोठे नाव करण्याचे आमिष दाखवून अशा हल्ल्यांसाठी ‘शूटर’ म्हणून वापरतात. राजकारणी बाबा सिद्दीकी यांची हत्या असो, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेला गोळीबार असो, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेला हल्ला असो किंवा आता टायगर वरील गोळीबार; या सगळ्यामागील मुख्य हेतू भयनिर्मिती करणे आणि स्वतःच्या दहशतीचा ब्रँड तयार करून खंडणी साम्राज्य चालवणे हाच आहे. या हल्ल्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांसमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. 
 
देशाच्या आर्थिक राजधानीत, अतिश्रीमंत आणि कडेकोट सुरक्षा असलेल्या जुहू-वांद्रे परिसरात भर संध्याकाळी गोळीबार होत असेल, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिक रास्तपणे विचारत आहेत. उपमुख्यमंत्री आणि गृहखात्याने हल्लेखोरांना कठोर उत्तर देण्याचे आश्वासन दिले असले, तरी केवळ तीन जणांना पकडणे पुरेसे नाही. त्यांना शस्त्रे कोणी पुरवली,  मुंबईत आसरा कोणी दिला, आर्थिक रसद कुठून मिळाली? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, परदेशात बसून या हत्यांची सुपारी देणार्‍या मुख्य सूत्रधारांपर्यंत भारतीय यंत्रणा कधी पोहोचणार? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.हा हल्ला केवळ एका अभिनेत्याचा वैयक्तिक सुरक्षेचा विषय राहिलेला नाही. ही मुंबईच्या प्रतिमेवर, गुंतवणुकीच्या वातावरणावर आणि कलाक्षेत्राच्या स्वातंत्र्यावर उमटलेली काळी किनार आहे.
 
गुन्हेगारी टोळ्यांनी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा आपली खंडणी उकळण्याची सोपी जागा बनवण्याचा प्रयत्न सुरू केला असेल, तर ते वेळीच हाणून पाडणे राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य ठरते. मुंबईने एके काळी अंडरवर्ल्डच्या दहशतीचा भयंकर काळ सोसला आहे, त्याची पुनरावृत्ती परवडणारी नाही. परदेशी भूमीवरून चालणार्‍या डिजिटल गुन्हेगारी नेटवर्कला संपवण्यासाठी केंद्र आणि राज्य तपास यंत्रणांमध्ये अधिक ताळमेळ आवश्यक आहे. अन्यथा, चित्रपट पडद्यावर दिसणारे अ‍ॅक्शन थ्रिलर मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा खर्‍याखुर्‍या गोळ्यांच्या रूपात सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करत राहतील.
 

Related Articles

Comments (0)

Be the first to share your view on this news.

Leave a comment

0 / 300
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.