हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू   

 

उत्तराखंडमधील दुर्घटना
 
चमोली, (उत्तराखंड) : बद्रीनाथहून डेहराडूनला परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी दुपारी जोशी मठाजवळील डोंगराळ भागात कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह सहा जण प्रवास करत होते. या सर्वांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती चमोलीचे पोलिस अधीक्षक सुरजित सिंग पनवार यांनी दिली.
 
कॅप्टन हिमांशू, प्रताप,  अरुण, शंकर गौडा, सुधीर के. आणि एच. एस. नटराज अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व प्रवासी बंगळुरुचे रहिवासी होते. खराब हवामान आणि पावसामुळे ही दुर्घटना घडली, असेही ते म्हणाले.
 
हे हेलिकॉप्टर ’ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीचे असून, ते बद्रीनाथहून डेहराडूनला परतत असताना दुपारी २:२० च्या सुमारास चमोली जिल्ह्यातील जोशीमठ परिसरातील ’चई’ गावाजवळ डोंगराळ भागात कोसळले. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथ धामवरून परतत होते का, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र, हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत कार्यासाठी पोलिस एसडीआरएफ, लष्कर आणि आयटीबीपीचे जवान रवाना झाले.दुपारी सव्वाच्या सुमारास बद्रीनाथहून डेहराडूनकडे निघालेले हेलिकॉप्टर सव्वादोनच्या सुमारास बेपत्ता झाले होते. जोशीमठजवळील दरीवरून उड्डाण करत असताना हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला, असे उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक जैन यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून ’ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’च्या सर्व हेलिकॉप्टर्सच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
 
या दुर्घटनेबद्दल पुष्कर सिंग धामी यांनी दुःख व्यक्त केले आहे.  दरम्यान, २०१५ ते २०२५ या दहा वर्षांच्या कालावधीत ‘चार धाम’ क्षेत्रात अशा नऊ दुर्घटना घडल्या आहेत. मागील वर्षी दोन दुर्घटना घडल्या होत्या. 
 

Related Articles

Comments (0)

Be the first to share your view on this news.

Leave a comment

0 / 300
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.