E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
रविवार केसरी
महागाईचा आगडोंब; सामान्यांची होरपळ
Samruddhi Dhayagude
25 Oct 2026
कैलास ढगे
पश्चिम आशियातील युद्ध,जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे भारतासमोर तीव्र महागाईचे संकट उभे ठाकले आहे. घाऊक आणि किरकोळ महागाई दरातील वाढीने सर्वसामान्यांचे अंदाजपत्रक उद्ध्वस्त केले आहे. केवळ व्याजदर वाढवून या संकटावर मात करता येणार नाही; त्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ धोरणात्मक हस्तक्षेप, साठेबाजीवर कडक नियंत्रण असे उपाय योजायला हवेत.
ताज्या सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते, की महागाई म्हणजे आता किंमतींची तात्पुरती चढ-उतार राहिलेली नाही, तर तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सप्टेंबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधरित महागाईवाढीचा दर ११.३९ टक्क्यांवर पोहोचला. तो ऑगस्टमध्ये ९.९२ टक्के होता. सर्वसामान्यांच्या थेट दैनंदिन खर्चाशी संबंधित किरकोळ महागाई वाढीचा दर २३ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर, म्हणजेच ५.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
पश्चिम आशियातील संघर्ष चिघळल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत. विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी आणि तांबड्या समुद्रातील अस्थिरतेमुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्क्यांहून अधिक खनिज तेल आयात करतो. त्यामुळे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली कोणतीही वाढ थेट देशात महागाईचे स्वरूप धारण करते. या संघर्षामुळे खते आणि इतर औद्योगिक कच्च्या मालाची आवकही प्रचंड महागली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या या कोंडीची किंमत मात्र भारतातील सर्वसामान्य जनतेला स्वतःच्या खिशातून मोजावी लागत आहे. जागतिक बाजारातील घडामोडींवर देशाचे थेट नियंत्रण नसले, तरी देशांतर्गत बाजारपेठेत त्याचा आघात किमान व्हावा यासाठी पूर्वतयारी आणि धोरणात्मक साठ्यांचे योग्य व्यवस्थापन याबाबत सरकारी यंत्रणा पुरेशी सावध दिसली नाही.
घाऊक बाजारात अन्नधान्य, भाजीपाला आणि डाळींचे दर ऑगस्टच्या ७.०५ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये थेट ८.६६ टक्क्यांवर गेले आहेत. उत्पादित वस्तूंच्या महागाईवाढीचा दर ९.७६ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर इंधन आणि वीजक्षेत्रातील महागाई २५.८५ टक्क्यांवर गेली आहे. इंधन आणि वीज या पायाभूत घटकांचे दर २५ टक्क्यांहून अधिक वाढतात, तेव्हा त्याचा परिणाम वाहतूक खर्च वाढण्यात होतो; पर्यायाने प्रत्येक वस्तू महाग होते.
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व बँकेने रेपो दरात ०.२५ टक्क्यांची वाढ करून ५.५० टक्क्यांवर नेला. बाजारात रोखता जास्त असते आणि मागणी प्रचंड वाढल्याने भाववाढ होते, तेव्हा व्याजदर वाढवून मागणीला वेसण घालणे उपयुक्त ठरते; मात्र सध्या भारतात निर्माण झालेली परिस्थिती ही मागणी वाढल्यामुळे नसून ‘पुरवठा साखळीतील अडथळे’ आणि ‘वाढलेला उत्पादन खर्च’ यामुळे आहे. लहरी हवामानामुळे झालेले शेतीचे नुकसान, खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि खतांची टंचाई हे घटक महागाई वाढवत आहेत. अशा वेळी बँकांनी रेपो दर वाढवल्यास महागाई नियंत्रणात येण्याची हमी कमी आणि मध्यमवर्गावरील कर्जाचा बोजा वाढण्याची भीती जास्त असते.
रेपो दर वाढल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे हप्ते महाग होतात. परिणामी, आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या कुटुंबांच्या बचतीवर आणखी कात्री चालवली जाते. उद्योगजगतासाठी खेळत्या भांडवलावरील व्याज खर्च वाढतो. यामुळे नवीन गुंतवणुकीला खीळ बसते आणि आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याचा धोका निर्माण होतो. थोडक्यात, आजार एका बाजूला आणि उपचार भलत्याच बाजूला, अशी पतधोरणाची अवस्था झाली आहे. महागाईचा सर्वात मोठा तडाखा देशातील गरीब, शेतमजूर, असंघटित कामगार आणि कनिष्ठ मध्यमवर्गाला बसतो. एका सर्वसामान्य कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचा ५० ते ६० टक्के हिस्सा केवळ अन्नधान्य आणि मूलभूत गरजांवर खर्च होतो. डाळी, खाद्यतेल, भाज्या, दूध आणि गॅस सिलिंडरच्या किंमती वाढतात तेव्हा गरीब कुटुंबांसमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होतो. याचा थेट परिणाम महिला आणि बालकांच्या पोषणावर होतो. त्यामुळे कुपोषण आणि आरोग्याच्या दीर्घकालीन समस्या उद्भवतात. शिक्षण, आरोग्य आणि भविष्यासाठी केली जाणारी तुटपुंजी बचत थांबते किंवा ती मोडून संसाराचा गाडा हाकावा लागतो. यातून असमानतेची दरी अधिक रुंदावत जाते. महागाई ही माणसाच्या जगण्याच्या संघर्षाशी जोडलेली सामाजिक शोकांतिका आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच घाऊक महागाईचे संकेत धोक्याची घंटा वाजवत होते. आंतरराष्ट्रीय घडामोडी अनपेक्षित नव्हत्या. रशिया-युक्रेन युद्धानंतर पश्चिम आशियातील तणाव सतत वाढत होता. असे असतानाही इंधनावरील कररचनेत लवचिकता आणून किंवा जीवनावश्यक वस्तूंचे बफर स्टॉक (राखीव साठे) वेळेवर बाजारात आणून दर नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन का झाले नाही? बाजारात एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण होते, तेव्हा मध्यस्थ, व्यापारी आणि दलाल साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करतात. डाळी आणि खाद्यतेलाच्या बाबतीत हा प्रकार वारंवार घडतो. जीवनावश्यक वस्तू कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून साठेबाजांवर छापे घालणे आणि काळाबाजार रोखणे ही स्थानिक आणि राज्य प्रशासनाची जबाबदारी असते; मात्र बाजार समित्या आणि स्थानिक बाजारांवर प्रशासकीय नियंत्रणाचा अभाव असल्याने ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचताना किमती दुप्पट-तिप्पट झालेल्या असतात. शेतकर्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नाही आणि ग्राहकाला मात्र तीच वस्तू भरमसाठ दराने विकत घ्यावी लागते. यामधील नफेखोरी रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे.
महागाईच्या समस्येवर कायमस्वरूपी आणि रचनात्मक उपायांची गरज आहे. हवामानबदलाच्या या काळात शेतीला हवामान-प्रतिरोधक बनवणे ही राष्ट्रीय निकड आहे. देशातील शीतगृहे, आधुनिक गोदामे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांचे जाळे अपुरे असल्याने दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा भाजीपाला आणि फळे सडून जातात. ग्रामीण भागात आधुनिक साठवणूक व्यवस्था आणि जलद वाहतूक व्यवस्था उपलब्ध असेल, तर उत्पादनाच्या काळात होणारे नुकसान टाळता येईल आणि टंचाईच्या काळात हा साठा बाजारात आणून किंमती स्थिर ठेवता येतील. डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांनी व्हॅटमध्ये तात्काळ कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. डिझेलचे दर कमी झाल्यास मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन सर्वच वस्तूंचे भाव उतरण्यास मदत होईल. डाळी, खाद्यतेल, कांदा आणि बटाटा यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंची साठेबाजी करणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) अधिक सक्षम करून त्यात डाळी आणि खाद्यतेलाचा समावेश सवलतीच्या दरात केला जावा. देशांतर्गत तुटवडा असलेल्या वस्तुंच्या आयातीवरील शुल्क तातडीने शिथिल करणे आणि देशात गरज असलेल्या वस्तुंच्या निर्यातीवर तात्पुरती बंधने घालणे यांसारखे निर्णय वेळेत घेतले पाहिजेत. देशाचा विकास दर कितीही आकर्षक दिसत असला, तरी देशातील बहुसंख्य जनतेला महागाईमुळे उपाशी राहावे लागत असेल, त्यांचे जगणे असह्य होत असेल, तर तो विकास एकांगी ठरतो. सामान्य नागरिकाचे उत्पन्न वाढण्यासोबतच त्याची क्रयशक्ती (खरेदी क्षमता) टिकून राहते तेव्हाच आर्थिक विकासाची खरी सार्थकता सिद्ध होते. महागाई हा असा अदृश्य कर आहे, जो गरिबांना सर्वात जास्त लुटतो. त्यामुळे केवळ व्याजदरांचे खेळ न खेळता सरकारने पुरवठा साखळी मजबूत करून, कररचनेत सुधारणा करून आणि साठेबाजीला चाप लावून महागाईला वेसण घातली पाहिजे; अन्यथा ही आर्थिक कोंडी सामाजिक असंतोषाला आमंत्रण देणारी ठरेल.
Related
Articles
गोकुळसाठी व्याकुळ, कायदाच बदलला!
10 Nov 2026
शेअर बाजाराची कोंडी
08 Nov 2026
सेन्सेक्स २ हजार अंकांनी वधारला
06 Nov 2026
गोकुळातली दिवाळी
08 Nov 2026
शहर शिवसेनेच्या दुष्काळग्रस्त सहाय्यता हेल्पलाइनची घोषणा
05 Nov 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये 10 कचरा प्रक्रिया केंद्रांचा प्रस्ताव
09 Nov 2026
Comments
(0)
Be the first to share your view on this news.
Leave
a comment
Name *
Email *
Mobile *
Comment *
0
/ 300
Website
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)