लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा   

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक मुलगी लेहमध्ये जाऊन आपले साम्राज्य उभारते. या प्रवासात सांगली-पुणे-मुंबईपासून थेट लेहपर्यंत ती कशी पोहोचली?
 
या प्रवासातील तिचे अनुभव आणि लेहमधील तिच्या उद्योगांची माहिती आणि आजच्या पहिल्यावहिल्या युगंधरेची महती आपण जाणून घेऊ.  सांगलीमधून शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात आलेली ग्रीष्मा सोले ही एक धाडसी आणि म्हटले तर बंडखोर वाटावी अशी आहे. वडील सांगलीतील व्यावसायिक असून त्यांच्याप्रमाणेच आपणही वेगळ्या व्यवसायाची वाट जोखावी असे वाटलेले. पुण्यात एमबीएची पदवी घेऊन एकीकडे पर्यटनाची आवड जोपासत होती. या बरोबर मला ’स्कुबा डायव्हिंग’ची क्रेझ होती, त्याप्रमाणे मी त्यात पारंगत झाले आणि आंतराष्ट्रीय परवाना देखील मिळवला.’ एकीकडे वेगवेगळ्या टूर कंपन्यांमध्ये मॅनेजर आणि लीडर म्हणून काम पाहात होते. यातून कारकीर्द तर घडलीच पण ग्रीष्माचे व्यक्तिमत्त्व देखील आणखी खुलत गेले. 
 
काही वर्षांपूर्वी ’डायरी ऑफ अ रोव्हर्स ओडिसी’ या नावाने ब्लॉगिंग सुरू केले. स्कुबा डायव्हिंग आणि बायकिंगच्या सहली आयोजनाचे काम केले. एका ’होम स्टे’ प्रकल्पासाठी लेहला आल्यानंतर ग्रीष्मा इथेच रमली. लेहमधील नागरिकांविषयी ग्रीष्मा अतिशय भरभरून बोलते. ज्या स्थानिकांच्या घरी राहिली त्यांच्या जीवनपद्धतीचा बारकाईने अभ्यास केला, ग्रीष्माला लेहची ओढ लागली. बाईकिंग आणि पर्यटनाची आवड असणार्‍या ग्रीष्मा सोले हिने लडाखमध्ये एक हॉस्टेल सुरू केले, तेव्हा आपण कधीतरी रेस्टॉरंट व्यावसायात उतरू असा विचारही मनात नव्हता.
 
लेहविषयी बोलताना ग्रीष्मा म्हणाली, ’’या शीत वाळवंटाचे वेड लागण्याचे कारण इथली बोचरी थंडी. जंगल, समुद्र, हिरवेगार डोंगर यांचे मला आकर्षण नव्हते. पण येथील उजाड डोंगर, दुर्मिळ आणि विविध रंगांचे खडक, तीव्र वळणाचे रस्ते हे जास्त भावले. 2015 मध्ये ’रोव्ह की’ नावाची स्वत:ची ट्रॅव्हलिंग कंपनी सुरू केली. त्यानंतर मी लेह-लडाखची निवासी झाले. एकटी फिरताना बर्‍याचदा रस्त्यात दरड कोसळणे, कोणत्याही स्थानिकांचे दार ठोठावून एकटीने राहणे, भर रस्त्यात लिफ्ट मागून प्रवास करणे असे प्रकार तिकडे केलेले. हे सर्व अनुभव अर्थात तिचे चांगले होते.
 
’रोव्ह की’च्या विस्ताराबरोबर ग्रीष्माचे आणखी एक स्वप्न होते. 40 वर्ष जुने असे पारंपरिक लडाखी घर होते. ते विकत घेऊन त्याचे आरामदायी एका हॉस्टेलमध्ये रूपांतर करावे. हे करताना पती कौस्तुभ दळवी यांची साथ लाभली आणि भागीदारीमध्ये आता टुमदार असे हॉस्टेल सुरू झाले. या सोयी सुविधांमुळे बरेच परदेशी पर्यटक देखील इथे येतात. लेह ही राहायला अतिशय स्वस्त आणि आदर्श जागा आहे. यामुळे अल्पावधीतच आमचे ’होम स्टे’ लोकप्रिय झाले. आमचे स्वयंपाक घर देखील खुले आहे. घरातील भाज्यांपासून स्वयंपाक होतो, घरात फळ झाडे तर आहेतच त्यामुळे या सर्वांगसुंदर अनुभवामुळे पर्यटक खुश होऊनच परततो. लडाखला जाणार्‍या हजारो महाराष्ट्रीयन पर्यटकांना तिथे ’महाराष्ट्रीयन आदरातिथ्य’ आणि घरच्या चवीचा आस्वाद मिळत आहे. 
 
’खानावळ’ची सुरुवात  
 
लेह-लडाखसारख्या डोंगराळ आणि आव्हानात्मक प्रदेशात, एक रेस्टॉरंट उभारणे हे देखील आव्हानात्मक होते. पर्यटकांना विशेषतः घरगुती महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद देण्यासाठी ग्रीष्मा सोले यांनी 2022मध्ये ’खानावळ’ हे रेस्टॉरंट सुरू केले. देशांतर्गत पर्यटकांची वाढती संख्या पाहून मी हॉटेल व्यवसायात पाऊल टाकले. एका बाजूला हॉस्टेल आणि लडाखच्या खास सहलींचे नियोजन सुरू असतानाच, मी वर्षभर एक हॉटेलही चालवले.
 
आपल्या राज्यातील जेवणाचा शोध घेणार्‍या महाराष्ट्रीयन लोकांसाठी एक मोठा आधार होत आहे. भारतासारख्या विविध भौगोलिक प्रदेशांनी आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या डोंगराळ प्रदेशांत एका वळणावर महाराष्ट्रीयन माणसाला लेह सारख्या ठिकाणी  ग्रीष्माची ’खानावळ’ दिसते, तेव्हा त्याचा आनंद काय वर्णावा. लेहमध्ये दोन महाराष्ट्रीयन व्यक्तींनी इथे हॉस्टेल सुरू केल्याची माहिती हळूहळू पसरली, ज्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटक ’रोव्हर्स डेन’कडे आपोआपच आकर्षित होऊ लागले. लेहच्या मुख्य बाजारपेठेत ’खानावळ’ हे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण जसे की, मिसळ, थालीपीठ, झुणका भाकर, पोहे, कोकम, ताक,साबुदाणा खिचडी, वडे आणि वेगवेगळ्या थाळी स्वरूपाचे पदार्थ दिले जातात. 
 
इथे सीमा रस्ते (इठज) करणारे अधिकारी, लष्करी अधिकारी यांची देखील मोलाची साथ लाभली. मराठा रेजिमेंटचे बरेच अधिकारी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. त्यामुळे या वातावरणात आता मी पूर्णपणे समरसून गेल्याचे ग्रीष्मा सांगते. याचा परिणाम लेहमध्ये सुरुवातीला जाणवतो नंतर महाराष्ट्रात आल्यावर आणखीनच समजतो. या विषयीचा अनुभव सांगताना ग्रीष्मा म्हणाली, ‘‘बायकर्स आणि सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केलेले. त्याची सुरुवात हिमालयातील पहिल्या अल्ट्रा सायकलिंग रेसपासून झाली. यामध्ये 600 किमी रेसच्या सुरुवातीचा आणि अंतिम बिंदू म्हणून ’रोव्हर डेन’ची महत्त्वाची भूमिका होती. एप्रिल ते सप्टेंबर हा इथला हंगाम असून लडाख महोत्सवा नंतर हिवाळ्यात ’झंस्कार व्हॅली ट्रेक’, ’स्नो लेपर्ड एक्स्पोडिशन’साठी पर्यटक येतात. यासाठी देखील हॉस्टेल सुरू असते. 
 
खानावळीच्या बाबतीत एक अनुभव सांगताना ती म्हणाली, ’स्थानिक लोकांकडून मिसळीसाठी आणि वड्यासाठी पाव तयार करून घेणे खूप आव्हानात्मक होते. कारण या वातावरणात तो तयार करणे देखील कठीण होते. शेवटी एका महाराष्ट्रीयन बेकरीवाल्याला तिकडे नेऊन स्थानिक बेकरी वाल्यांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर खानावळीच्या मेन्यूमध्ये ब्रेड अ‍ॅड झाला आणि व्यवसायाची घडी बसली. 
 
व्यवसायाची भरभराट होताना एक मोठे संकट ओढवले. लडाखमध्ये अचानक ढगफुटी झाली आणि त्यात माझे हॉटेल व रेस्टॉरंटचे नुकसान झाले. अवघ्या काही मिनिटांतच, मी उभी केलेली सर्व मालमत्ता वाहून गेली. ’’भटकंती आणि प्रवासामुळे हार मानण्याचा पर्यायच नव्हता. जिद्दीच्या जोरावर मी नवीन जागा शोधली आणि अवघ्या एका आठवड्यात ’खानावळ’ पुन्हा सुरू केली. पुढच्या वर्षी मी व्यवसायाचा आणखी विस्तार केला आणि एका नवीन जागेवर ’बुटिक होमस्टे’ सुरू केला. अशा प्रकारे, एका मोठ्या नुकसानीच्या प्रसंगाचे रूपांतर मी अधिक भक्कम अशा नव्या उपक्रमाच्या पायात केले.’’
 
शब्दांकन : समृद्धी धायगुडे

Related Articles

Comments (1)

  • S
    sai

    khupch chan mahiti dili aahe greshmachi. Greeshma great ...work All the best

Leave a comment

0 / 300
Comments are published after review by the editor. Abusive or offensive language is not allowed.