गणेश विसर्जनासाठी प्रमुख १७ रस्ते बंद   

 

पुणे : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल केले आहेत. उद्या (शुक्रवारी) सकाळपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरातील १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आणि परिसरात २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून नो-पार्किंग लागू करण्यात येणार आहे.
 
गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. मिरवणुकीला होणारी गर्दी, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
 
छत्रपती शिवाजी रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक, बाजीराव रस्ता : सावरकर चौक ते फुटका बुरूज चौक, कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक, गणेश रस्ता : दारूवाला पूल ते जिजामाता चौक, केळकर रस्ता : बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता : जेधे चौक ते टिळक चौक, शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी ते अलका टॉकीज चौक, जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, कर्वे रस्ता : नळ स्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रस्ता : खंडोजीबाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट, भांडारकर रस्ता : पी.वाय.सी. जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक, पुणे-सातारा रस्ता : व्होल्गा चौक ते जेधे चौक, सोलापूर रस्ता : सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक, प्रभात रस्ता : डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौक, बगाडे रस्ता : सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक, गुरुनानक रस्ता : देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक हे १७ रस्ते बंद राहणार आहेत.
 

Related Articles