मनसेच्या दोघांना अटक   

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गोंधळ प्रकरण 

पुणे : गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विनापरवानगी प्रवेश करत तेथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र काढून घेत कर्मचार्‍यांना धमकी देवून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंसह 20 ते 25 जनांवर गुन्हा दाखल आहे.
 
प्रशांत दुर्गाप्रसाद कनोजिया (वय-50, रा.श्रीपाद अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि विक्रांत वसंत भिलारे (वय-40, रा. न्यू अक्षय सोसायटी, कोरेगाव पार्क) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र काशिराम पाटील (वय-52, रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.आरोपींनी फिर्यादी यांच्या महाविद्यालयातील कार्यालयात विनापरवाना प्रवेश केला. कार्यालयात असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेतला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांना धमकावले. तसेच फिर्यादी यांच्या कार्यालयात विनाकारण थांबून जोरजोरात घोषणा देत गोंधळ घातला होता.
 
दोघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी 
 
या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्यामागे आरोपींचा हेतू काय होता याबाबतचा तपास करण्यात येत आहे. अटक आरोपींच्या मदतीने इतर आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांना अटक करायची आहे. आरोपींचे मोबाइल जप्त करायचे आहेत, त्यामुळे त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील शिला घोडेस्वार यांनी केला. बचाव पक्षाच्या वतीने वकील अमेय बलकवडे, वकील मुकुल महिंद्रकर आणि वकील अमृता मुळे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत (ता. 4) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles