निवडणूक कामकाजाचा कर संकलन विभागाला फटका; मालमत्ता कराच्या सेवांना विलंब   

‘निवडणूक एसआयआर’च्या कामासाठी नियुक्ती

पुणे : महानगरपालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागातील मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचार्‍यांची ‘निवडणूक एसआयआर 2026’च्या विशेष निवडणूक कामकाजासाठी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विभागाच्या नियमित कामकाजावर तात्पुरता परिणाम झाला असून, मालमत्ता कराशी संबंधित सेवा, विविध अर्ज तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.
 
निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने करसंकलन विभागातील दैनंदिन कामकाजाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. मालमत्ता करासंदर्भातील अर्ज, विविध सेवा आणि इतर प्रशासकीय कामांसाठी महापालिका कार्यालयात येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे.या परिस्थितीची दखल घेत पुणे महापालिका प्रशासनाने नागरिकांची मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त केली आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून नागरिकांना शक्य तितक्या कार्यक्षम आणि तत्पर सेवा देण्यासाठी विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
निवडणूक एसआयआर 2026’चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर कर आकारणी व करसंकलन विभागाचे नियमित कामकाज पूर्ववत गतीने सुरू करण्यात येईल. दरम्यान, सध्या कामकाजात काही प्रमाणात विलंब होत असल्यास नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि संयम बाळगावा, असे आवाहन कर आकारणी व करसंकलन विभागाने केले आहे.

Related Articles