आष्टी तालुक्यावर दुष्काळाचे सावट; खरिपासह चारा-पाण्याची चिंता   

कडा, (वार्ताहर) : ऑगस्ट महिना संपत आला तरी आष्टी तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. दमदार पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा कोरड्या जमिनीप्रमाणे तडकू लागल्या असून, खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सोयाबीन, मूग, तूर, उडीद, बाजरी व कपाशी पिकांवर पावसाअभावी मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः उडीद पिकाला मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी उभी पिके माना टाकू लागली आहेत.
 
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने जमिनीतील ओल संपत चालली आहे. विहिरी, बोरवेल तसेच नदीनाले, तलाव, बंधारे व लहान-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. उपलब्ध पाण्यावर सिंचन करावे, तर जलस्रोतच तळ गाठत असल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
 
पावसाअभावी शेतीसोबतच पशुधनाच्या चारापाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. हिरवा चारा आटत चालला असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पशुपालकांची धावपळ सुरू आहे. पिके वाचवायची की पशुधनासाठी पाणी राखायचे, असा दुहेरी पेच शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.जुलैच्या दुसर्‍या व तिसर्‍या आठवड्यात झालेल्या तुरळक पावसाने पिकांना काही काळ दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुष्काळाचे सावट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही, तर पशुधन जगवायचे कसे, हा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता कडा येथील शेतकरी विजयकुमार जाचक यांनी व्यक्त केली.

Related Articles