भागवत यांच्या अमेरिका भेटीला धार्मिक संस्थेचा विरोध   

 

न्यूयॉर्क : ’यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजीअस फ्रीडम’ म्हणजेच यूएससीआयआरएफ संस्थेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या अमेरिका भेटीला कडाडून विरोध केला. दरम्यान, या महिन्याअखेर भागवत न्यूयॉर्कला भेट देणार आहेत.
 
यूएससीआयआरएफच्या एका सदस्याने एक्सवर याबाबतची पोस्ट टाकली. अमेरिकेच्या सरकारने संघाचे सदस्य जे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे दोषी आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे म्हटले आहे. यूएससीआयआरएफे प्रमुख असिफ महमूद म्हणाले की, ’भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. संघाशी संबंधित अनेक संघटनांनी अल्पसंख्यांकांवर हल्ले केले आहेत.  त्या हल्ल्यात त्यांचा सहभाग आहे. यात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांचा समावेश आहे. आता डॉ. मोहन भागवत अमेरिकेच्या भेटीवर येण्याची योजना आखत आहेत.’ आणखी एक सदस्य जेन मिल्स म्हणाले की, संघाचे नेते जरी ते भारतीय सरकारशी संबंधित असले तरी त्यांना उच्च स्तरावरील बैठका आणि राजनैतिक आदर देण्यात येऊ नये. या व्यतिरिक्त सदस्यांवर बंदी घालण्यावर लक्ष केंद्रित करावे.’
 
यूएससीआयआरएफ संस्थेचे काम  
 
विशेष म्हणजे ही यूएससीआयआरएफ संस्था ही अमेरिकन विधिमंडळाची एक शाखा आहे जी १९९८ मध्ये तयार केली होती. यातील सदस्यांची नियुक्ती ही अध्यक्ष आणि वरिष्ठ खासदार करतात. मात्र, ती अमेरिकेच्या सरकारपेक्षा स्वतंत्र पद्धतीने काम करते. यापूर्वी संस्थेने संघ आणि गुप्तचर संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच अमेरिकेच्या सरकारला धार्मिक स्वातंत्र्य ही गोष्ट सुरक्षा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार धोरणांसोबत जोडण्याची देखील मागणी केली.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे मत
 
यूएससीआयआरएफ मागणीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र गेल्या वर्षी या संस्थेचा वार्षिक अहवाल आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने, ’यूएससीआय आरएफचे अध्यक्ष हे एखाद दुसर्‍या घटनेचा चुकीचा अर्थ काढत आहेत. त्यावरून ते भारताच्या बहुविविध संस्कृती असलेल्या समाजाबाबत, प्रतिमा मलीन करणारे वक्तव्य करणे अन्यायकारक असल्याचे म्हटले होेते. धार्मिक स्वातंत्र्याबाबतची ही खरोखरची काळजी नसून एक मुद्दाम राबलेला अजेंडा वाटतो आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

Related Articles