फार्मासिस्ट पुजारी, पाटील यांच्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई   

झेडपीच्या सभेचा नियम मोडला; अध्यक्ष दीपक वैद्य यांनी मागवली माहिती 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून सभाध्यक्षाची परवानगी न घेता सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्याप्रकरणी फार्मासिस्ट लीना पुजारी व पल्लवी पाटील कारवाईच्या कचाट्यात आल्या आहेत.
 
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या सभेत करकंबचे झेडपी सदस्य आदिनाथ देशमुख यांनी लसीच्या पुरवठ्याविषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड उठले असतानाच सभागृहात आधीच येऊन बसलेल्या औषध निर्माण अधिकारी लिना पुजारी यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोग्य अधिकारी कोपूरवाड यांना गप बसावे लागले. औषध निर्माण अधिकारी पुजारी यांनी सदस्य देशमुख यांच्याशी प्रतिवाद केला. सदस्यांच्या प्रश्नाला कोण उत्तर देतंय हे सभा अध्यक्ष व सीईओ यांच्या लक्षातच आले नाही. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर ही चूक लक्षात आली. 

काय आहे सभेचा नियम...

सभेचे सर्व अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे आहेत. सभेत बोलण्यासाठी व बसण्यासाठी अध्यक्षांची परवानगी लागते. सभेच्या कामकाजात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापती व संबंधित विभाग प्रमुखांनाच बसता येते. कामकाजाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्षांच्या परवानगीनेच विभाग प्रमुखांना उत्तरे द्यावी लागतात. ज्यावेळी असे उत्तर देण्याबाबत अध्यक्ष सूचित करतात त्याबाबत विभाग प्रमुखांना सदस्यानी विचारलेली माहिती नसेल तर संबंधित कर्मचार्‍यांकडून माहिती घेण्यासाठी कर्मचार्‍यांना सभागृहाजवळ बोलाविले जाते पण सभागृहात त्यांना बसण्याची अनुमती दिली जात नाही. असे असताना या सभेत आरोग्य विभागाच्या औषध निर्माण अधिकारी लीना पुजारी व पल्लवी पाटील या दोघी सभागृहात बसल्या होत्या. 
 
आदिनाथ देशमुख यांनी लसीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर उत्तर देण्यासाठी विभाग प्रमुख आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड उठले. पण अध्यक्ष व विभाग प्रमुख कोपरवाड यांच्या संमतीविनाच औषध निर्माण अधिकारी पुजारी उठल्या व त्यांनी देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास सुरुवात केली. याबाबत देशमुख यांनी जाब विचारल्यानंतर त्यांनी प्रतिवाद केला. कर्मचार्‍याने सभागृहात उपस्थित राहून सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर कसे दिले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबद्दल विचारणा केल्यानंतर औषध निर्माण अधिकारी लीना पुजारी यांनी मला डीएचओनी बोलावले होते असे सांगितले. डीएचओ कोपरवाडी यांनी सभेत कर्मचार्‍यांना बसता येत नाही हे मला माहिती नव्हते असे उत्तर दिले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सीईओ यांनाही सभागृहाचे कामकाज सुरू असताना ही बाब निदर्शनाला आली नाही का असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Related Articles