E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
गुरू आणि शिष्य यांचे नाते
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
शिक्षणबोध , संदीप वाकचौरे
ज्ञानाच्या निर्मिती आणि प्रसारासाठी शाळा-महाविद्यालयांची निर्मिती झाली. निर्माण झालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी शिक्षणाचा विचार केला गेला. जेव्हा शाळा, महाविद्यालये अस्तित्वात नव्हती तेव्हा ज्ञान निर्मिती होत नव्हती का? असा प्रश्न विचारला जात असला, तरी त्याचे उत्तर नकारात्मक आहे. ज्ञान निर्मिती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.
शाळा महाविद्यालये नसली तरी ती होत राहते. देशात जेव्हा शाळा महाविद्यालये नव्हती तेव्हा मुलांना शिक्षण देण्यासाठी गुरुकुल शिक्षणाची व्यवस्था होती. त्याकाळी गुरूच्या घरी जाऊन शिक्षण घेण्याची परंपरा होती. अगदी राजपुत्र असले तरी गुरूच्या घरी जाऊन शिक्षण घेतले जात होते. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण देखील शिक्षणासाठी गुरूकुलात गेले होते. शिक्षणासाठीची आपली परंपरा मोठी आहे. गुरूचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात अधिक मोठे आहे. इतिहासात गुरूचे स्थान सर्वोच्च होते. गुरूला त्याकाळी कोणताही पर्याय नव्हता. आज आपल्या हाती ज्ञान, माहितीच्या दृष्टीने विविध स्वरूपाचे पर्याय आहेत. प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालयात जाऊन शिक्षणाची गरज नाही. मात्र याचा अर्थ गुरूची गरज नाही असे होत नाही.
आपल्याला ज्ञानासाठी गुरूच्या शिवाय वर्तमानात देखील पर्याय नाही. दत्त महाराजांनी तर जीवनात चोवीस गुरू केल्याचा उल्लेख आहे. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आपल्याला हवे असेल, तर त्यासाठी गुरू केला जातो. आज आपण ज्या विषयात पारंगत आहोत, त्या विषयासाठी गुरू असतो. पण दुसर्या विषयात आपल्याला ज्ञान हवे असेल, तर पुन्हा नव्याने गुरूची वाट चालावी लागते. ज्ञान आणि जीवनदर्शन घडण्यासाठी गुरू जीवनाला दिशा दाखवत असतात. गुरू म्हणजे अज्ञानाचा अंधकार नष्ट करणारी व्यवस्था आहे. गुरूमुळे मानवी जीवनाची उन्नती होत असते.
गुरूंचे स्थान मोठे
जगातील कोणत्याही धर्मातील, पंथातील गुरू आपल्या शिष्याच्या उन्नतीसाठी समर्पणाने काम करत असतो. आपल्या गुरूचा उद्धार व्हावा यासाठी अखंड ज्ञानसाधना करत असतो. त्यामुळे व्यक्तीचे जीवन आणि गुरू यांचा अनन्यसाधारण असा संबंध आहे. त्यामुळे जीवनात गुरूचे स्थान मोठे असल्याने त्यांचा आदर, सन्मानाची भूमिका अधोरेखित झालेली आहे. गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानत अनेकांनी जगात इतिहास निर्माण केला. महाभारतापासून तर वर्तमानापर्यंत गुरूची आज्ञा स्वीकारत माणसांनी स्वतःचे जीवन समद्ध केले आहे. त्या दृष्टीने समर्थ रामदास दासबोधात जीवनात देखील कसे वागायला हवे याविषयी मार्गदर्शन करत आहेत. समर्थांच्या काळात शाळा नव्हत्या, पण गुरू शिष्य परंपरा मोठी होती. त्यामुळे गुरू शिष्याचे नाते नेमके कसे असायला हवे याविषयी ते मार्गदर्शन करत आहेत. त्या संदर्भातील एका श्लोकात समर्थ म्हणतात की,
गुरु आज्ञा पाळावी । सत्य मार्ग धरावा ।
सतत ज्ञान वाढवावे । सद्वर्तन करावे ॥
गुरूचे असलेले स्थान अधिक महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. दासबोधात अनेक श्लोकांमध्ये जीवन विषयक तत्त्वज्ञान सांगितले आहे. जीवन उद्धारासंदर्भाने देखील अनेक श्लोक आहेत. त्याचप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण कसे वागायला हवे याबददल देखील समर्थांनी विविध समासात, विविध श्लोकात दिशादर्शन केले आहे. प्रस्तुत श्लोक हा विद्यार्थ्यांसाठी विशेष उपदेश करणारा आहे. अर्थात जन्माला आलेला प्रत्येक माणूस जीवनभर विद्यार्थी असतो. माणूस शाळेत गेला, तरच विद्यार्थी असतो असे नाही, तर अखंड जीवनभराचा त्याचा प्रवास काहींना काही प्राप्त करण्याचा असतो. अनुभवाने माणूस शिकतो. जगताजगता कोणीतरी त्याला उपदेश करत असतो. अशावेळी त्याला जी काही मदत होत असते, त्यातून त्याचे शिकणे होत असते याचा अर्थ त्या क्षेत्रातील ती व्यक्ती म्हणजे गुरू आहे. गुरूशिवाय कोणाचेही जीवन असू शकत नाही. समर्थानी वरील श्लोकात चार मूलभूत तत्त्वे सांगितली आहेत. पहिले तत्त्व आहे गुरूच्या आज्ञेचे पालन करणे. दुसरे तत्त्व आहे सत्य मार्गाचे अनुसरण करणे. तिसरे तत्त्व आहे सतत ज्ञानवृद्धी आणि चौथे तत्त्व आहे सद्वर्तन करणे.
चार जीवनतत्त्वे
ही चार तत्त्वे विद्यार्थ्यांच्या आणि अगदी व्यक्तीच्या जीवनाला दिशा देणारी आहेत. या तत्त्वांचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात अनुसरला तरी त्याच्या हाती निश्चित काही लागल्याशिवाय राहाणार नाही. ही चार तत्त्वे म्हणजे जीवनाला उन्नत करण्याची वाट आहे. मुळात हा प्रवास घडत गेला की, आपले जीवन निश्चित गतिमान होण्यास मदत होईल यात शंका नाही. या चार तत्त्वांमुळे व्यक्तिमत्त्वाला आकार मिळण्यास आणि समृद्ध होण्यास निश्चित मदत होणार आहे. समर्थ म्हणतात की, प्रत्येक शिष्याने गुरुंची आज्ञा पाळावी. याचे कारण गुरू हा केवळ शिक्षक नसून जीवनाचा मार्गदर्शक आहे. त्याला आपल्या शिष्याच्या उन्नतीचा विचार केंद्रस्थानी आहे. जगातील कोणत्याही गुरूला आपल्या शिष्याचे अकल्याण व्हावे असे कधीच वाटत नाही. शिष्याचे जे काही व्हावे असे वाटते त्यात फक्त त्याच्या कल्याणाचा विचार सामावलेला असतो. आपल्या शिष्याचे भले होण्यातच गुरूचा आनंद सामावलेला आहे. आपला व्यवसाय चालावा असे वाटत असताना, त्या व्यवसायाची भरभराट व्हावी यासाठी इतरांचे अकल्याणातच त्यांच्या व्यवसायाची भरभराट असते. इतर लोकांच्या अहितामध्ये त्यांचे हित सामावलेले असते. लोकांचे शारीरिक, मानसिक, भौतिक नुकसान होणे म्हणजे यांची भरभराट होणे आहे. मात्र येथे गुरू, शिक्षक हा एकमेव माणूस आहे, त्याला नेहमीच वाटत असते की, आपला शिष्य सर्वोत्तम असायला हवा आणि त्याचे सातत्याने कल्याण व्हायला हवे. त्याने त्याच्या जीवनात अधिकाधिक प्रगती करावी. शिष्याच्या हिताची काळजी त्याच्या माता पित्यांइतकीच करणारा दुसरा कोणी महत्त्वाचा घटक असेल, तर तो त्याचा गुरू असतो.
गुरू जेव्हा केव्हा रागावतो, गुरू कधी त्रागा करतो तेव्हा त्यात त्या गुरूचा काहीच फायदा नसतो, तर त्या रागावण्यातही शिष्याचे हित दडलेले असते. अलीकडे शिक्षणासाठी गुरुकुल व्यवस्था नसली, तरी शाळा आहेत आणि तेथे शिकवणारा शिक्षक हा गुरूस्थानी असतो. शिष्य म्हणजे वर्तमानातील विद्यार्थी त्यामुळे त्याकाळी गुरूच्या संदर्भात जो विचार सांगितला आहे, तो वर्तमानात शिक्षक म्हणून लक्षात घ्यायला हवा. समर्थ म्हणतात की, शिष्याने गुरू जे काही सांगत आहेत, ते लक्षपूर्वक ऐकून त्याप्रमाणे कृती करावी. त्यामुळे त्यांची आज्ञा पाळायला हवी. विद्यार्थ्यांनी गुरूचे आदेश व मार्गदर्शन निष्ठेने पाळायले हवे. कारण आपल्या शिक्षकांच्या आज्ञेत फक्त आपले हितच दडलेले आहे हे लक्षात घ्यायला हवे. भारतीय परंपरेत गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती अपूर्ण मानली जाते. गुरू हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे. त्यामुळे गुरूचे आदेश, शिकवण आणि मार्गदर्शन निष्ठेने पाळणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे.आजच्या काळातही शिक्षक, मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक यांच्या सूचनांचे पालन केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात योग्य दिशा मिळते. आदेशाचे पालन म्हणजे केवळ आदेश पालन करणे नव्हे, तर त्यांच्या शिकवणीला जीवन वर्तनात आणणे आहे. गुरूने सांगितले आणि आपण ते केवळ पाठ केले, तर आपल्या हाती काही लागणार नाही.
सत्याचा मार्ग अनुसरावा
विद्यार्थ्यांनी जीवनात सत्याचा मार्ग अनुसरायला हवा असेही समर्थ सांगतात. सत्य हे सर्व धर्मांचे मूळ आहे. सत्याची वाट चालणे म्हणजे जीवनभर धर्माचे पालन करणे आहे. सत्याची वाट चालणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. आज शिक्षणातून सत्याचा विचार पेरला जात नाही. त्यामुळे समाज जीवनात भ्रष्टाचाराचा महापूर आलेला आपणास दिसतो. शिक्षणातून आपण जे काही पेरतो त्यावरच समाजाचे उत्थान अवलंबून असते. त्यामुळे शिक्षणातून सत्याची वाट दाखवली जावी अशी अपेक्षा आहे. जगातील अनेक महापुरुषांनी सत्याची उपासना केली आहे. पूर्वी गुरुकुलचे शिक्षण थांबले की, गुरू पुढील जीवनासाठी संदेश द्यायचे. त्या संदेशातून जीवनभराची वाट चालावी अशी अपेक्षा केली जायची. तेव्हा ते सांगत की, सत्यं वद, म्हणजे सत्य बोला. सत्याची वाट चाला अशी ती अपेक्षा असायची. ही एकच वाट माणसाच्या जीवनात धर्माच्या दिशेने प्रवास घडवणारी असते. त्यामुळे जीवनात सत्य, प्रामाणिकपणा व धर्ममार्ग स्वीकारावा. सत्याची वाट जीवनात आनंदाचा मार्ग दाखवणारी आहे. खरं तर विद्यार्थ्यांनी सत्याची वाट चालणे केले, तर त्यांना मार्क मिळवण्यासाठी वाममार्गाची वाट चालावी असे वाटणार नाही. जगातील कोणत्याही असत्यावर आधारित असणारे यश हे तात्पुरते समाधान देणारे असते. सत्यावर आधारित जीवन दीर्घकाळ टिकते. परीक्षेत, अभ्यासात, वर्तनात सत्यनिष्ठ राहणे आवश्यक आहे. फसवणूक, कपट किंवा खोटेपणा विद्यार्थ्यांच्या प्रगतीला अडथळा ठरतो. सत्याचा मार्ग धरल्याने आत्मविश्वास वाढतो, समाजात विश्वासार्हता निर्माण होते. सत्य मार्ग म्हणजे प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि धर्मनिष्ठा आहे. अखंड जीवनभर हाच मार्ग उत्तम आहे अशी धारणा आहे. त्यामुळे जीवनात यशासाठी समर्थानी हा दाखवलेला मार्ग अधिक महत्त्वाचा आहे.
जीवनात जेव्हा सत्याची वाट चालणे महत्त्वाची वाटते, तेव्हा ज्ञानाची साधना करावी वाटते. आपल्याला कॉपी करून मार्क नको असे विद्यार्थी ठरवेल, तर त्याला त्यासाठी अभ्यास करावा लागेल. त्यामुळे त्यातून ज्ञानात भर पडेल. समर्थ पुढचा जो मार्ग सांगत आहेत की, विद्यार्थ्यांनी सतत ज्ञान वाढवावे. एका मार्गाची वाट धरली की आपोआप दुसर्या मार्गाने प्रवास करणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांने अखंड जीवनभर ज्ञानाची साधना करण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे मुख्य कर्तव्य हे ज्ञानार्जन करणे हेच आहे. त्याचवेळी शिक्षकांनी देखील ज्ञानग्रहण करणे, ज्ञानप्राप्तीचा मार्ग अनुसरणे आवश्यक आहे. गुरू ज्ञान वाढवेल, तरच विद्यार्थी त्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे. त्याने सतत ज्ञान वाढवावे. सतत अभ्यास करून विद्या व ज्ञान वृद्धिंगत करावे ही अपेक्षा आहे.
ज्ञानाला अंत नाही
कोणतीही विद्या ही समुद्रासारखी आहे. आपण कितीही ज्ञान मिळवले, तरी ज्ञानाचा मार्ग कधीच संपत नाही. आपण जितके ज्ञान अधिक मिळवतो तितकेच ज्ञान अजून बाकी राहते. ज्ञानाला अंत असत नाही. ज्ञानाची भूक जितकी असेल, तितक्या मोठ्या प्रमाणावर ज्ञानाची वाट चालणे शक्य होते. त्यामुळे नियमित अभ्यास, वाचन, चिंतन आणि प्रश्न विचारण्याची वृत्तीची जोपासना करण्याची गरज आहे. या मार्गाच्या विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धी घडते. आजच्या स्पर्धात्मक युगात सतत नवीन ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान, विज्ञान, भाषा, इतिहास यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना सक्षम करतो. सतत ज्ञान वाढवणे म्हणजे आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवणे आहे. ही वृत्ती जोपासली तरच सन्मान, आदर मिळण्याची शक्यता आहे. जीवनात ज्ञान असेल, तर लोक सन्मान करतात. विद्यार्थी म्हणून वरील सर्व गोष्टी कराव्यात यात शंका नाही. पण त्याच बरोबर सद्वर्तन करायला हवे. आचरणात सद्गुण, शिस्त व विनय असायला हवा.
ज्ञानासोबत सद्वर्तन हेच खरे व्यक्तिमत्त्व घडवते. अन्यथा अनेकदा ज्ञानी माणूस अहंकारी असण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सद्वर्तनाची वाट चालणे त्याच्यासाठी कठीण बनते. माणसाकडे विद्या असूनही जर वर्तन चांगले नसेल तर समाजात मान मिळत नाही. विद्यार्थ्यांनी शिस्त, विनय, नम्रता, आदरभाव, सहकार्य ही सद्वर्तनाची लक्षणे आहेत. सद्वर्तनामुळे विद्यार्थी समाजात आदर्श ठरतो. सद्वर्तन म्हणजे ज्ञानाला आचरणाची जोड देणे आहे. त्यामुळे शिक्षकांचे मार्गदर्शनाची वाट चालत असताना, प्रामाणिकपणे अभ्यास करून विद्यार्थी यशस्वी होण्याची वाट चालायला हवी. जीवनात सत्यनिष्ठा व सद्वर्तनामुळे कार्यक्षेत्रात विश्वासार्हता निर्माण होते. ज्ञान व सद्वर्तनामुळे विद्यार्थी समाजात आदर्श ठरतो. समर्थ रामदास स्वामींचा हा उपदेश विद्यार्थ्यांना जीवनभर मार्गदर्शक ठरतो. गुरु आज्ञा पालन, सत्य मार्ग, सतत ज्ञानवृद्धी आणि सद्वर्तन ही चार तत्त्वे आत्मसात करणारा विद्यार्थी केवळ यशस्वीच होत नाही तर समाजासाठी आदर्श ठरतो.
Related
Articles
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड
13 Aug 2026
अकरावी प्रवेशाच्या अंतिम विशेष फेरीला सुरुवात
13 Aug 2026
पाकिस्तानचा लष्करी खर्च ४१ टक्क्यांनी वाढला
14 Aug 2026
रोहिडेश्वरच्या पायथ्याला निवासाची सोय
18 Aug 2026
सोलापूर शहराबाहेरून तिसरी आणि चौथी नवीन रेल्वे लाईन उभारण्यास मंजुरी
18 Aug 2026
‘जेन झी’ची दखल सरकारला घ्यावीच लागेल
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा