पुण्यात संततधार कायम   

पुणे : मागील आठवडाभरापासून पुणे शहर आणि परिसरात पावसाचे सातत्य कायम आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शहर आणि उपनगरातील बहुतांश रस्त्यांवरून वाहणारे पाणी कायम आहे. सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे शहरातील विविध व्यवहार विस्कळीत झाले आहेत.
 
सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरासह उपनगरातील बहुतांश मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे अनेकांना भिजत निश्‍चित स्थळी पोहचावे लागले. तर वाहतूक कोंडीमुळे अनेकांची गैरसोय झाली. पावसामुळे मध्य वस्तीतील विविध प्रकारच्या बाजारपेठांतील व्यवहार मंदावले होते. तर काही ठिकाणी ग्राहकांची संख्या मंदावल्याने शांतता होती. पावसामुळे अनेक जण नियोजित कामे रद्द करून घरातच थांबणे पसंद करत आहेत. जे लोक घराबाहेर पडत आहेत. त्यांची मात्र पावसामुळे गैरसोय होत आहे. 
 
शहर आणि परिसरात मान्सून सक्रीय आहे. त्यामुळेच कधी मोठा, तर कधी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काल सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी उपनगरात पावसाचा वेग वाढला होता. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत पावसाची भुरभूर सुरूच होती. पावसामुळे हवेत गारवा वाढला आहे. पाऊस आणि गारव्यामुळे घराबाहेर पडणार्‍या नागरिकांच्या संख्येत घट झाली आहे. काल कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्त्यावरून कमी अधिक प्रमाणात पाणी वाहत होते. 
 
सकाळी भिजत तसेच वाहतूक कोंडीतून मार्ग काढत कार्यालये तसेच कामाच्या ठिकाणी पोहचलेल्या नागरिकांना सायंकाळी पुन्हा पावसात भिजत वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने पादचार्‍यांनाही वाहत्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर वाहत्या पाण्यामुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत गेली. आज (मंगळवारी) शहरात ढगाळ वातावरणासह पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
धरण क्षेत्रातील स्थिती 
 
धरण                   पाऊस टीएमसी टक्केवारी 
खडकवासला 13 मिमी 1.97              100
पानशेत            41 मिमी 10.13 95.14
वरसगाव          28 मिमी 11.35 88.55
टेमघर             74 मिमी 2.80              75.57
एकूण            156 मिमी  26.26 90.09
 
धरणांतून पाणी सोडले 
 
खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पडणार्‍या पावसाच्या अंदाजानुसार धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत धरण 95 टक्के भरले असल्यामुळे काल या धरणातून पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणातून दुपारी 4 हजार 708 क्युसेक पाणी सोडण्यात आले, तर पानशेत धरणातून 600 क्युसेक पाणी सोडण्यात आले. वरसगाव धरण 88, तर टेमघर धरण 75 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात पाऊस कायम आहे. 

Related Articles