खडकवासला धरणातून पुन्हा पाणी सोडले   

धरण दुसर्‍यांदा शंभर टक्के भरले 

पुणे : यंदाच्या पावसाळी हंगामात खडकवासला धरण दुसर्‍यांदा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सलग दुसर्‍या दिवशी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 9 हजार 372 क्युसेक पाणी सोडण्यात आले. धरण शंभर टक्के भरले असताना डोंगरावरून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. 
 
जुलैच्या पहिल्या आठवड्यातही जोरदार पावसामुळे हे धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे सुमारे 30 ते 35 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे गुरूवारी पुन्हा शंभर टक्के धरण भरल्याने धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. काल सकाळी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले. मात्र दुपारनंतर धरण क्षेत्रात पावसाचा वेग वाढल्याने सायंकाळी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. 
 
सद्य:स्थितीत पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांपैकी खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. पानशेत धरण 85 टक्के, वरसगाव 79 टक्का, तर टेमघर धरण 64 टक्के भरले आहे. चार धरणांत 23.42 टीएमसी पाणी साठले असून त्याची टक्केवारी 80.35 आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी चार धरणांत 23.60 टीएमसी पाणी होते. त्याची टक्केवारी 80.98 इतकी होती. यंदा उशिराने पावसाला सुरूवात झाली. तरीही दोन मोठ्या पावसामुळे मधले अंतर दूर झाले आहे. आणखी दोन दिवस पावसाचे सातत्य राहिल्यास धरणांतील पाणी साठ्यात आणखी लक्षणीय वाढ होणार आहे. आज (शनिवारी) चारही धरण क्षेत्रात पावसाचे सातत्य असणार असल्याचा अंदाज आहे. तसेच घाट माथ्यावरून मोठ्या प्रमाणात धरणांत पाणी वाहून येत आहे. पुढील दोन दिवस धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण असेच असणार आहे.  
 
शहरासह उपनगरांत पावसाचे सातत्य 
 
धरण क्षेत्राप्रमाणेच शहर आणि उपनगरात पावसाचे सातत्य कायम आहे. काल सकाळपासून शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता. दुपारी मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी पुन्हा हलका पाऊस पडत होता. आज (शनिवारी) शहरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. काल सायंकाळपर्यंत एनडीए भागात 9.5 मिमी, लोहगाव 9.4 मिमी, पाषाण 7.6 मिमी, शिवाजीनगर भागात 4.4 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे सलग तिसर्‍या दिवशी शहरातील व्यवहार मंदावले होते.
 
धरण क्षेत्रात 24 तासांत पडलेला पाऊस   
 
धरण                    पाऊस टीएमसी टक्केवारी 
खडकवासला 41 मिमी          1.97               100
पानशेत           153 मिमी 9.04              84.87
वरसगाव          146 मिमी 10.06              78.75
टेमघर             203 मिमी 2.35              63.44
एकूण              543 मिमी 23.42             80.35

Related Articles