चेतनसोबत सियाने आधीच केले होते लग्न!   

व्हॉटस्अ‍ॅप चॅटमधून धक्कादायक माहिती
 
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांमधील झालेला व्हॉटस्अ‍ॅप चॅट संवाद समोर आला आहे. त्यातून दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी याबाबत कुणाकडेही वाच्यता केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
केतनसोबत साखरपुडा झाल्यानंतर सिया आणि चेतन खूप अस्वस्थ होते. दोघांनाही हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी केतनला संपविण्यासाठी एका कॅफेमध्ये कारस्थान रचले. त्यानुसार, दोघांनी केतनला १८ जून रोजी लोहगडावरून ३५० फूट दरीत ढकलून त्याची हत्या केली. या प्रकरणात सिया आणि चेतनला अटक झाली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या दोघांची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. केतनच्या हत्येच्या कटात सापडू नये, याकरिता दोघांनीही मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता.
 
मात्र, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळविला आहे. त्यातून मागील ६ ते ८ महिन्यांत दोघांमध्ये झालेल्या संवादातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. यात दोघांनी चार महिन्यांपूर्वीच लग्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, तपासादरम्यान, काही तांत्रिक पुरावे आणि महत्त्वाची माहिती देखील पोलिसांच्या हाती लागली आहे. याआधारे दोघांचे कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि व्हॉटस्अ‍ॅप चॅट संवाद तपासण्यात आले आहे. 
 
केतनची हत्या करण्याची योजना सुरुवातीला सियानेच केली होती. मात्र, धाडस होत नसल्याने ती चेतनला सोबत येण्यासाठी विचारत होती. या संदर्भात दोघांमध्ये काही दिवस व्हॉटस् अ‍ॅपवर चर्चा झाली होती. माझे धाडस होत नसून तूसुद्धा सोबत चल, आपण दोघेही त्याला दरीत ढकलून देऊ, असा मेसेज सियाने चेतनला पाठवल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. 

Related Articles