खंडणीसाठी पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण   

कामशेतमधील घटना; तीन पोलिस कर्मचारी आणि तीन होमगार्डस्वर गुन्हा

पिंपरी : पुण्यातून लोणावळ्यात पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांना अमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाखांची  खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पर्यटकांमधील एका तरुणाने स्मार्ट वॉचमधून मदतीचा संदेश पाठवल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांची सुखरूप सुटका केली. हे घटना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत येथे घडली.
 
याप्रकरणी भूषित उमेश शर्मा (वय २८, विमाननगर, पुणे) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महामार्ग सुरक्षा पथकाच्या तीन पोलिस कर्मचारी आणि तीन होमगार्ड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
भूषित यांचे मित्र महमद काशान आझमी (वय-२८), त्यांच्या पत्नी फायझा जमील (वय-२७) आणि महमद यांचा मेहुणा सय्यद जुबेर अहमद (वय ३१, तिघे रा. छत्रपती संभाजीनगर) हे पुण्यात पर्यटनासाठी आले होते. त्यांना लोणावळ्यातील मॅप्रो गार्डन येथे पर्यटनासाठी जायचे होते. त्यामुळे ते तिघे मोटारीतून लोणावळ्याकडे निघाले होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने जात असताना कामशेत येथे आल्यानंतर पोलिसांच्या एका वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू केला आणि काही अंतरावर पोलिसांनी त्यांची मोटार अडवली. पोलिसांच्या वाहनात पांढर्‍या रंगाचा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेले तीन तर खाकी रंगाचे गणवेश घातलेले तीन असे सहा जण होते. त्यांच्या जॅकेटवर महामार्ग वाहतूक पोलिस असे लिहिलेले होते. त्यांनी मोटारीची तपासणी करायची असल्याचे सांगितले. त्यानंतर, महमद यांची झडती घेतली. त्यांच्याकडे सिगारेटचे पाकीट आढळून आले. या पाकिटात गांजा असल्याचे सांगत पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पाच लाखांची मागणी पोलिसांनी केली. यातून बराच वेळ तोडगा निघाला नाही. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांचे अपहरण करून त्यांना सात तास ताब्यात ठेवले आणि कोणाशीही संपर्क साधू दिला नाही. पैसे देण्यासाठी भूषित आणि त्यांच्या सहकार्‍यांना तळेगाव येथील एटीएम केंद्रावर नेले. त्यामुळे चारही पर्यटक घाबरले. दरम्यान, भूषित यांचा मित्र महमद काशान आझमी यांनी आपल्या हातातील स्मार्ट वॉचचा वापर करून आणीबाणीचा संदेश पाठवला. यावेळी पर्यटक तळेगाव हद्दीत होते. तळेगाव शहर हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षात तात्काळ माहिती मिळाली. आणीबाणीच्या संदेशानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे आणि तीन पोलिस उपायुक्तांनी तातडीने सूत्रे हलवली. संदेश आलेल्या ठिकाणी पोलिस पथके पाठवण्यात आली. पर्यटकांनी पोलिसांना संपर्क केल्याचे समजल्याने महामार्ग सुरक्षा पथकातील आरोपी पोलिसांनी तिथून पळ काढला. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्यटकांची सुटका केली.
 
सुरुवातीला हे कृत्य गुन्हेगारांचे असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर पर्यटकांनी दिलेली माहिती आणि घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता अपहरण करून खंडणी मागणारे महामार्ग सुरक्षा पथकातील पोलिस असल्याचे निष्पन्न झाले. कामशेत पोलिस तपास करीत आहेत.
 

Related Articles