संत तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान   

पावसामुळे मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत सोहळा

पिंपरी/देहू : विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी मंगळवारी देहूतून प्रस्थान ठेवले. पालखीचा पहिला मुक्काम देहूतच इनामदारवाड्यात असणार आहे. पावसामुळे आणि देहूत न येण्याचे प्रशासन, देवस्थानच्या आवाहनामुळे मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
 
संत तुकाराम महाराजांचा यंदा ३४१ वा पालखी सोहळा असून प्रस्थान सोहळ्याची सुरुवात पहाटे पाचपासून सुरू झाली. शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा झाली. इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. प्रथेनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.
 
ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात, चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. नगराध्यक्षा पूजा दिवटे, तहसीलदार जयराज देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यावेळी उपस्थित होते.
 
दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी पालखीने मंडपातून प्रस्थान ठेवले. शंख, नगारा आणि ताशांच्या गजरात पालखी मंदिरातून बाहेर आली. त्याच क्षणी टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला. प्रेमाने, आनंदाने वारकरी देहभान विसरून नामघोषात तल्लीन झाले. टाळ, मृदंगाचा सूर टिपेला पोचला अन् ’पुंडलिका वर दे हरि विठ्ठल’चा सूर उमटला. पालखीने मानाच्या अश्वांसोबत मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली आणि इनामदार साहेब वाड्यात मुक्कामासाठी पोहोचली. आज (बुधवारी) पालखी आकुर्डी येथे मुक्कामासाठी निघणार आहे.

खासदार,आमदार झाले टाळकरी

पादुकापूजनानंतर खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके आणि महेश लांडगे यांनी टाळ वाजविण्याचा आनंद घेतला. तिघेही टाळ वाजविण्यात तल्लीन झाले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुपारी अडीचच्या सुमारास मंदिरात दाखल झाल्या. पादुकापूजनानंतर त्या मंदिराच्या समोरील बाजूला असलेल्या टेरेसवर आल्या. त्यांनी तेथून पालखी सोहळा अनुभवला. सव्वा तास त्या मंदिर परिसरात थांबल्या होत्या.

बळीराजाला सुखी ठेवण्याचे साकडे

काही भागात पावसाचा कहर झाला आहे. पण, मराठवड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला नाही. राज्यभर सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी राहू दे, असे साकडे पांडुरंगाच्या चरणी घातल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. गेली १९ वर्षे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला उपस्थित राहत आहे. पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना कोणताही त्रास होऊ नये, याची अजित पवार हे बारकाईने काळजी घेत होते. वारकरीही त्यांच्या आठवणीने व्याकूळ होत आहेत. पण, नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. वारकर्‍यांनी दोन्ही पालख्यांमध्ये पुण्यातून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे देहूत वारकर्‍यांचा ओघ कमी आहे. पुण्यातील महापालिकेच्या शाळांमध्ये वारकर्‍यांची व्यवस्था केली आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

वारकर्‍यांच्या सुरक्षेची विशेष काळजी

यंदा इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली होती. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देऊळवाड्यात (मुख्य मंदिरात) मोठी गर्दी होऊ नये म्हणून मोजक्याच मानकरी, सेवाकरी आणि वारकर्‍यांच्या मर्यादित उपस्थितीत अतिशय शिस्तबद्ध व सुरक्षितपणे हा प्रस्थान सोहळा पार पडला.
 

Related Articles