नैसर्गिक हिर्‍यांची वाढती चमक   

वृत्तवेध 

सोने, चांदी आणि मौल्यवान दागिन्यांचा भारतातील सांस्कृतिक वारसा हजारो वर्षांचा आहे; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या पारंपरिक बाजारपेठेत एक महत्त्वाचा बदल घडताना दिसत आहे. एकेकाळी केवळ श्रीमंतवर्गाची पसंती असलेले नैसर्गिक हिर्‍यांचे दागिने आता मध्यमवर्गीय, नोकरदार, व्यावसायिक महिला तसेच तरुण पिढीपर्यंत पोहोचत आहेत. परिणामी भारत अमेरिकेनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी नैसर्गिक हिर्‍यांच्या दागिन्यांची बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे.
 
भारतात नैसर्गिक हिर्‍यांच्या दागिन्यांची मागणी सध्या वार्षिक सुमारे 12 टक्क्यांनी वाढत आहे. 2019 मध्ये हा दर दहा टक्के होता. यावरून या क्षेत्रातील वाढ किती वेगाने होत आहे, याचा अंदाज येतो. उद्योगक्षेत्रातील अंदाजानुसार 2030 पर्यंत भारतातील नैसर्गिक हिर्‍यांच्या दागिन्यांची बाजारपेठ सुमारे 1.52 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. ही वाढ भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलत्या ग्राहकवर्गाची साक्ष देते. या वाढीमागे महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे. आजच्या महिला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाल्या आहेत. स्वतःच्या उत्पन्नातून स्वतःसाठी दागिने खरेदी करण्याचा आत्मविश्‍वास त्यांच्यात वाढला आहे. 
 
भारतातील ब्रँडेड ज्वेलरी कंपन्यांनाही या बदलाचा मोठा फायदा होत आहे. अक्षय तृतीया आणि विवाह हंगामात अनेक कंपन्यांनी हिर्‍यांच्या दागिन्यांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली आहे. यावरून ग्राहकांचा विश्‍वास केवळ सोन्यावर मर्यादित राहिलेला नसून नैसर्गिक हिर्‍यांकडेही वाढत असल्याचे स्पष्ट होते. नैसर्गिक हिर्‍यांच्या बाजारातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा मर्यादित पुरवठा. जगभरातील प्रमुख खाणींमधून उत्पादन कमी होत आहे. अनेक प्रसिद्ध खाणींचा साठा आटत चालला असून नवीन मोठे स्रोत सापडत नाहीत. परिणामी, नैसर्गिक हिर्‍यांच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. विशेषतः सॉलिटेअर हिर्‍यांच्या किंमतीमध्ये वार्षिक पाच ते आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे हिरे हे केवळ सौंदर्यवर्धक दागिने नसून दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही नावाजले जात आहेत.
 
या बाजारासमोर काही आव्हानेही आहेत. प्रयोगशाळेत तयार होणारे कृत्रिम हिरे (लॅब-ग्रोन डायमंड) कमी किमतीत उपलब्ध असल्याने छोट्या आकाराच्या नैसर्गिक हिर्‍यांवर किंमतीचा दबाव वाढत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा हिरे घासणी आणि पॉलिशिंग उद्योग असलेला देश आहे. गुजरातमधील सुरत हे शहर जागतिक हिरे उद्योगाचे प्रमुख केंद्र मानले जाते. त्यामुळे देशांतर्गत मागणी वाढणे म्हणजे केवळ विक्री वाढणे नव्हे, तर उत्पादन, प्रक्रिया, निर्यात आणि रोजगारालाही नवी गती मिळणे होय.

Related Articles