नात्यांवर प्रश्नचिन्ह   

भागा वरखडे

मेघालयातील राजा रघुवंशी  याची हत्या आणि पुण्यातील केतन अग्रवाल याच्या खुनाने मोठी खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांची चौकशी अद्याप सुरू आहे, संबंधित आरोपींवरचे आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी असले, तरी या घटनांनी समाजाला धक्के दिले आहेत. या हत्या विश्वास, विवाह, कुटुंबव्यवस्था आणि बदलत्या सामाजिक मूल्यांवर गंभीर विचार करण्यास भाग पाडतात.
 
विवाह ही केवळ दोन व्यक्तींची नव्हे, तर दोन कुटुंबांची बांधिलकी मानली जाते. या नात्याचा पाया विश्वास, परस्परसन्मान आणि जबाबदारीवर उभा असतो. म्हणूनच पती किंवा नियोजित पतीच्या हत्येच्या  घटना घडल्या, की समाजाला जास्त धक्का बसतो. कारण या गुन्ह्यांमध्ये केवळ एका व्यक्तीचा मृत्यू होत नाही, तर विश्वासाचाही खून झाल्याची भावना निर्माण होते. सोनम रघुवंशीने  मधुचंद्रास गेल्यावर  पती राजा रघुवंशी याचा खून केला .तर सिया या तरुणीने नियोजित पती केतन अगरवाल याची  विवाहापूर्वी हत्या केली. दोन्ही प्रकरणांत युवतींचे मित्र सहभागी होते. या घटनांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या व्यक्तीला नाते मान्य नसेल, विवाह करायचा नसेल किंवा नात्यातून बाहेर पडायचे असेल, तर त्यासाठी कायदेशीर आणि सामाजिक मार्ग उपलब्ध असताना हिंसेचा मार्ग का निवडला जातो? भारतीय समाजात गेल्या काही दशकांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याला अधिक महत्त्व मिळाले आहे. प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह, विवाह न करण्याचा निर्णय किंवा विवाहानंतर विभक्त होण्याचा निर्णय याबाबत समाज अधिक खुला होत आहे.  कोणत्याही व्यक्तीला स्वतःचे आयुष्य आपल्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे; परंतु त्या अधिकारासोबत जबाबदारीही येते. मतभेद असतील, प्रेम संपले असेल किंवा नाते टिकवायचे नसेल, तर त्यावर संवाद, समुपदेशन किंवा कायदेशीर मार्ग हा सभ्य समाजाचा स्वीकारलेला पर्याय आहे. हिंसा हा कोणत्याही परिस्थितीत पर्याय असू शकत नाही. मात्र आज नेमके तेच घडते आहे.
 
अशा घटनांच्या निमित्ताने कुटुंबसंस्थेतील बदलांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पूर्वी मोठ्या कुटुंबांमध्ये अनेक नाती एकत्र नांदत असत. संवादासाठी अनेक माणसे उपलब्ध असत. आज शहरीकरण, करिअरची धावपळ आणि विभक्त कुटुंबपद्धतीमुळे अनेक तरुण भावनिकदृष्ट्या अधिक एकाकी झाले आहेत. नात्यांमधील तणाव वाढला, तरी मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी किंवा योग्य सल्ला घेण्यासाठी फार कमी संधी उपलब्ध असतात. त्यामुळे काही वेळा चुकीचे निर्णय 
 
घेतले जातात. ‘सोशल मीडिया’ आणि डिजिटल माध्यमांचाही या बदलत्या सामाजिक वास्तवात मोठा वाटा आहे. मोबाईल फोन आणि इंटरनेटमुळे संवाद अधिक सोपा झाला असला, तरी त्याच माध्यमांचा वापर कट रचण्यासाठी, पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठीही होत असल्याची उदाहरणे अनेक गुन्ह्यांमधून समोर आली आहेत; मात्र यासाठी तंत्रज्ञानाला दोष देणे योग्य ठरणार नाही. तंत्रज्ञान हे साधन आहे; त्याचा वापर कसा केला जातो, हे माणसावर अवलंबून असते. या पार्श्वभूमीवर माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. अशा घटनांचे वृत्तांकन करताना सनसनाटीपणा टाळणे गरजेचे आहे.  पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. 
 
आज मुलांच्या आयुष्याबाबत निर्णय घेताना त्यांची इच्छा, मानसिक तयारी आणि आयुष्याविषयीचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी तरुणांनीही पालकांशी प्रामाणिक संवाद साधला पाहिजे. नाते मान्य नसेल, तर नकार देण्याचे धैर्य दाखवणे अधिक योग्य आहे. काही काळासाठी निर्माण होणारी नाराजी स्वीकारणे हे कोणत्याही हिंसक कृतीपेक्षा अधिक जबाबदार पाऊल ठरते. समाज हल्ली   यश, पैसा, प्रतिष्ठा आणि बाह्य आकर्षण यांना प्राधान्य देत आहेे; मात्र भावनिक परिपक्वता, नातेसंबंध सांभाळण्याची क्षमता, मतभेद हाताळण्याचे कौशल्य आणि मानसिक आरोग्य याकडे तुलनेने कमी लक्ष दिले जाते.
 
औपचारिक शिक्षणात करिअरची तयारी होते; पण आयुष्याची तयारी कितपत होते, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. या घटनांमुळे विवाहसंस्थेवरील विश्वास डळमळीत होईल, असे मानण्याचे कारण नाही. दररोज देशात लाखो कुटुंबे विश्वास, प्रेम आणि परस्परसन्मानाच्या आधारावर आनंदाने जीवन जगत आहेत. समाजातील अपवादात्मक घटना संपूर्ण वास्तवाचे प्रतिनिधित्व करत नाहीत; परंतु अशा घटना गंभीर इशारा नक्कीच देतात. त्या आपल्याला नात्यांमधील संवाद, परस्पर आदर आणि कायद्याचा सन्मान यांचे महत्त्व पुन्हा अधो रेखित करून देतात. कोणतेही नाते परस्पर संमतीवर टिकते. प्रेम संपले, विश्वास उरला नाही किंवा एकत्र राहणे शक्य नाही, असे वाटल्यास विभक्त होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कोणत्याही व्यक्तीचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. 
 
राजा रघुवंशी आणि केतन अगरवाल हत्या प्रकरणांचा न्यायालयीन निकाल भविष्यात लागेल. तपासातून आणखी अनेक बाबी समोर येऊ शकतात; परंतु या घटनांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. नाती टिकवण्यासाठी प्रेम जितके आवश्यक आहे, तितकाच प्रामाणिकपणा, परस्परसन्मान आणि स्पष्ट संवादही आवश्यक आहे. विश्वास निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात; पण तो तुटण्यासाठी एका क्षणाचा अविचारही पुरेसा असतो. म्हणूनच बदलत्या काळात आधुनिक विचार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यासोबत नैतिक जबाबदारी, कायद्याचा आदर आणि मानवी जीवनाचे मूल्य जपणे याची खरी गरज आहे. 
 
एकविसाव्या शतकात प्रत्येक व्यक्तीला, मग तो मुलगा असो वा मुलगी; आपला जीवनसाथी निवडण्याचा किंवा नको असलेले लग्न नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. केतन अगरवाल प्रकरणातील मुलीचे आधीच अन्य व्यक्तीवर प्रेम होते आणि केतनसोबत संसार थाटायचा नव्हता, तर ती सरळ नकार देऊ शकत होती. तिने घेतलेल्या नकाराच्या निर्णयाला समाजाने आणि कायद्यानेही पाठिंबा दिला असता; परंतु इथे प्रश्न नाकारण्याच्या हक्काचा नव्हता, तर त्या हक्काच्या आड लपलेल्या एका भयंकर विकृतीचा होता. सओ सोनम रघुवंशीबद्दलही तेच म्हणता येईल.
 
विवाह हा दोन व्यक्तींचा करार असला, तरी तो दोन कुटुंबांमधील विश्वासाचाही करार असतो. साखरपुडा झाल्यानंतर दोन्ही कुटुंबे भविष्यातील संसाराची स्वप्ने रंगवत असतात. अशा वेळी त्या नात्यातील एखादी व्यक्तीच दुसर्‍याच्या जीवावर उठल्याचा आरोप समोर आला, तर तो केवळ एका कुटुंबावरील आघात राहत नाही, तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेला धक्का देतो. सियाने लग्नाला नकार दिला नाही, कारण तिला केतनची  संपत्ती आणि त्या संपत्तीच्या बळावर मिळणारे ऐशोआरामाचे आयुष्य हवे होते. एका बाजूला लग्नाची तयारी करायची, केतनच्या पैशावर स्वतःच्या आणि प्रियकराच्या मौजमजा पुरवून घ्यायच्या आणि दुसरीकडे ज्याच्या पैशावर हे वैभव उपभोगले, त्याच माणसाला संपवण्याचा कट रचायचा हा कमालीचा कृतघ्नपणा आहे. 
 
या प्रकरणाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे नात्यांचे झालेले बाजारीकरण. आजच्या चंगळवादी युगात मानवी भावनांपेक्षा भौतिक सुखांना जास्त महत्त्व दिले जात आहे. केतनचे तिच्यावर असलेले प्रेम, त्याचा निष्पाप विश्वास हे सर्व त्या मुलीसाठी केवळ एक ‘साधन’ होते. आर्थिक गरजा पूर्ण होत होत्या, तोपर्यंत या साधनाची किंमत होती; पण लग्नाची वेळ आली आणि प्रियकरासोबत राहण्याबाबत अडथळा निर्माण झाला, तेव्हा तिने  केतनला कायमचे संपवण्याचा मार्ग निवडला. हे सारे भयानक आहे. अघोरी आहे. हे चित्र बदलायचे तर समाजाला अंतर्मुख व्हावे लागणार आहे.
 

Related Articles