भावी वधूनेच केतनला दरीत ढकलले   

लोहगडावरील अपघाताचा बनाव उघड; दोघांना अटक

पिंपरी : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या २५ वर्षांच्या केतन अग्रवाल याच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. सुरुवातीला ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात पूर्वनियोजित कारस्थान रचून केलेला खून असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. भावी वधूनेच प्रियकराच्या मदतीने केतनला दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केतन त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.विशाल अग्रवाल (गहुंजे, ता. मावळ) यांनी मुलाच्या हत्येप्रकरणी फिर्याद दिली आहे. सिया प्रवीण गोयल (वय २०) आणि चेतन बाबुलाल चौधरी (वय २२) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना अटक झाली आहे. सियाचे वडील मार्केट यार्डात ड्रायफ्रूटचा व्यवसाय करतात. हत्या झालेल्या केतन याचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत.
 
सियाचा दि. १९ जूनला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ते लोहगडावर गेले. केतन याचा मृतदेह १८ जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागात झुडपांमध्ये आढळून आला होता. त्यावेळी केतनसोबत असलेल्या सिया हिने किल्ला पाहताना पाय घसरून तो दरीत पडल्याचे सांगितले होते. केतन सेल्फी घेत होता आणि त्यावेळी जोरदार वारा वाहत होता. त्यामुळे केतनचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला, अशी थाप सियाने मारली. त्यानुसार, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, या घटनेबाबत संशय निर्माण झाल्याने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सखोल तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेची दोन विशेष पथके या तपासासाठी नियुक्त करण्यात आली. तपासादरम्यान सिया हिचे चेतन याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी चेतन चौधरी (रा. कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. 
 
सिया आणि चेतन यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, सियाचे लग्न केतनसोबत ठरले होते. केतनमुळे त्यांच्या नात्यात अडथळा निर्माण होत असल्याची भावना दोघांच्या मनात होती. यातूनच दोघांनी केतनला संपविण्याचे कारस्थान रचले. नियोजनानुसार सिया हिने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी घेऊन गेली. त्यानंतर चेतनला तेथे बोलावण्यात आले आणि संधी साधून केतनला किल्ल्यावरून खाली ढकलण्यात आले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. पोलिस तपासात हा प्रकार उघड झाल्यानंतर सिया आणि चेतनला अटक करण्यात आली.
 
दोन वेळा हत्येचा प्रयत्न
 
३१ मे आणि १४ जून रोजी देखील केतनला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. १४ जून रोजी सापाची भीती दाखवून त्याला दरीत ढकलण्याचा कट होता; पण, तो अयशस्वी ठरला होता. केतनला ठार करण्यासाठी सियाने मित्रासह आधी जाऊन लोहगडाची पाहणीदेखील केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
बाली दौरा रद्द 
 
केतन आणि सिया प्री-वेडिंग फोटोशूटसाठी इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. मात्र, मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर सियाने तिचा पासपोर्ट हरवल्याचे नाटक केले आणि दौरा रद्द करायला लावले होते.पोलिस अधीक्षक संदीप सिंह गील यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचे लग्न काही दिवसांत होणार होते. दोन्ही कुटुंबांकडून लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यानंतर सियाने तिचा मित्र चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनला संपवण्याचा कट रचला. केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर गेले होते.
              
त्यांच्या मागोमाग चेतनही तेथे पोहोचला होता. सिया आणि चेतन यांची वर्षभरापासून ओळख होती. सिया बेकरीचा व्यवसाय करते. तर चेतन चौधरीचा मार्केट यार्ड परिसरात कटलरीचा व्यवसाय आहे. दोघांची दुकाने शेजारीच असल्याने व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. गेल्या एक वर्षापासून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते, असेही गिल यांनी सांगितले. 
 
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना दुःख अनावर
 
सियाच्या क्रौर्याने अग्रवाल कुटुंब कोलमडून पडले आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल म्हणाले, १८ जून रोजी माझा २६ वर्षांचा मुलगा केतन लोहगड किल्ल्यावरून पडला. आम्हाला सोडून गेला. सुरुवातीला त्याची होणारी पत्नी सिया हिने सांगितलेल्या कथेवर विश्वास ठेवला. आम्हालाही हा एक दुर्दैवी अपघातच वाटला होता. मात्र, त्यानंतर तिची बदलती वक्तव्ये आणि संशयास्पद वागण्यामुळे आमचा संशय बळावला. पोलिसांनी सिया आणि तिच्या साथीदाराला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला. या दोघांनीही पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून, केतनची हत्या करण्यासाठी त्यांनी आधीच पूर्ण नियोजन केले होते, असेही केतनच्या वडिलाने सांगितले.
 
१४ जूनचे नियोजन फसल्यानंतर १८ जूनला केली हत्या!
 
या हत्येच्या कटामागील धक्कादायक क्रूरता समोर आणताना केतनच्या वडिलांनी भावनिक होत सांगितले की, सिया आणि तिच्या साथीदाराने केतनला संपवण्याचा पहिला प्रयत्न १४ जून रोजीच केला होता. मात्र, त्या दिवशी त्यांची ही योजना फसली. त्यानंतर त्यांनी पुन्हा योजना केली. १८ जून रोजी ते केतनला पुन्हा लोहगड किल्ल्यावर घेऊन गेले. याठिकाणी त्यांनी अतिशय थंड डोक्याने या गुन्ह्याची अंमलबजावणी केली. 
 
गोयल कुटुंबातील सदस्यांची चौकशी व्हावी
 
सियाच्या कुटुंबातील सदस्यही या कटात सामील असल्याचा संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केला. या गुन्ह्यात केवळ सिया आणि तिचा साथीदारच नव्हे, तर तिचे संपूर्ण कुटुंब सामील असल्याचा संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, माझा ठाम विश्वास आहे की, सियाचे आई-वडील, भाऊ आणि तिची आत्या हे सर्वजण या कटात आहेत. सर्व प्रकाराची त्यांना पहिल्यापासून पूर्ण कल्पना होती. या क्रूर आणि अमानुष गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा व्हावी. माझ्या मुलाला न्याय मिळावा, एवढीच माझी प्रशासनाकडून अपेक्षा आहे.
 
‘हुडी’मुळे क्रौर्याचा उलगडा

 

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये प्रचंड उष्णतेच्या वातावरणात एक तरुण हुडी परिधान करून कानात हेडफोन लावून चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत परिसरात फिरताना दिसून आला. त्या दिवशी हवेत उकाडा असताना देखील एक तरुण हुडी घालून का फिरतोय? हा प्रश्न पोलिसांना पडला. यातूनच सिया आणि तिच्या साथीदारांच्या क्रुर कृत्याचा उलगडा झाला. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचे लक्ष वेधले गेले आणि तपासाची सूत्रे त्याच्याकडे वळली. त्यानंतर या खुनाचा छडा पोलिसांनी लावला.

Related Articles