लखनौमध्ये अग्नितांडव विद्यार्थ्यांसह १५ जणांचा मृत्यू   

कोचिंग सेंटरच्या इमारतीला आग

लखनौ : उत्तर प्रदेशाच्या लखनौमधील एका उच्चभ्रू परिसरातील तीन मजली व्यावसायिक इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत विद्यार्थ्यांसह १५ जणांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
उत्तर लखनौमधील अलीगंज परिसरातील उषा मेहता मार्गावर काल दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर एक कोचिंग सेंटर होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.या आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे. आगीचे रौद्ररूप पाहून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अनेकांनी इमारतीवरून उड्या मारल्या. या इमारतीत पाळीव प्राण्यांचे रुग्णालय देखील होते.
 
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाची १४ वाहने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिकांच्या मदतीने २२ जणांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच १५ जणांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उर्वरित, पाच जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती केजीएमयूचे जनसंपर्क अधिकारी प्रा. के. के. सिंग यांनी दिली. इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली असून, वैद्यकीय उपचारानंतर ते घरी परतले आहेत, असेही ते म्हणाले.डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी  जखमींवर सतत लक्ष ठेवून आहेत. उडी मारल्यामुळे दोन मुलांना पाठीला दुखापत झाली आहे, असे ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल अग्रवाल यांनी सांगितले.
 
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगढचा दौरा अर्धवट सोडून घटनास्थळी धाव घेतली. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हे बचाव कार्य सुरू असतानाच दाखल झाले होते.आगीनंतर काही मुले बाहेर पडली. मात्र, काही मागील बाजूच्या दिशेने धावली. त्यामुळे ती वाचू शकली नाहीत. बळींची संख्या अद्याप निश्चित सांगता येणार नाही. मी स्वतः ११-१२ मृतदेह पाहिले, असे पाठक यांनी पत्रकारांना सांगितले.
 
या घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखांची आणि  जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली.आग आटोक्यात आली असली तरी अद्याप इमारतीत धूर आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी इमारतीतील प्रत्येक खोलीची तपासणी करत आहेत. 
 
गृह विभागाचे प्रधान सचिव संजय प्रसाद, पोलिस महासंचालक राजीव कृष्ण आणि लखनौचे पोलिस आयुक्त अमरेन्द्र सेंगर यांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यात स्थानिकांसह एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांचा समावेश होता.काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील एका पाच मजली हॉटेलला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच लखनौमध्ये अग्नितांडव झाले. 
 

Related Articles