‘मेफेड्रोन’चा कारखाना उद्ध्वस्त   

२० कोटींचा मुद्देमाल जप्त; १८ जणांना अटक

ठाणे : मीरा भाईंदर, वसई विरार (एमबीव्हीव्ही) पोलिसांनी ‘एमडी’ (मेफेड्रोन) अमली पदार्थांचे जाळे उघडकीस आणले आहे. तेलंगणातील जहिराबाद येथे सुरू असलेला ‘एमडी’चा  कारखाना शोधून काढत तो उद्ध्वस्त केला. या कारवाईत आतापर्यंत २०.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १८ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एमबीव्हीव्हीचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली.
 
गुन्हे शोध शाखेने ४ एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील एका घरावर छापा घातला होता. या कारवाईत २.६६ कोटी किमतीचे १.३२४ किलो ‘मेफेड्रोन’ अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात फिरदोस अरबाज कुरेशी व तिचा पती अरबाज वकील कुरेशी यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या प्रकरणाचा तपास करताना ठाणे आणि मुंबईतील मीरा रोड, अग्रिपाडा, मालवणी आणि मनोर परिसरातून अमली पदार्थ, त्याच्या निर्मितीसाठी लागणारी रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य असा सुमारे १३.६५ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून संदीप वीरास्वामी नायडू, हैदराबाद येथून नसिर जानिमिया रोख आणि महमूद मेहबूब खान यांना अटक करण्यात आली.
 
 त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जाहिराबाद तालुक्यात एमडी तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती समोर आली. त्याआधारे, ही कारवाई करण्यात आली. 
 

Related Articles