मित्रांचे बिनसले! (अग्रलेख)   

शांतता करार मार्गी लागून जगावरील तेलसंकट दूर करण्याऐवजी ट्रम्प यांनी मध्येच अब्राहम कराराचे पिलू सोडले. आखातातील धग यामुळे आणखी वाढली. 
 
इराणवर हल्ला करून जागतिक स्तरावर आपली दंडेलशाही सुरू ठेवण्याची अमेरिकेची खेळी पूर्ण फसली. कोणत्याही स्थितीत टोकाची बेअब्रू टाळणे, हाच आता अमेरिकेचा प्राधान्यविषय आहे. इस्रायलच्या लेबाननवरील जोरदार हल्ल्यांमुळे त्यात अडथळा आला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे याच कारणावरून बिनसले. या दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची चर्चा जगजाहीर झाली असून पुन्हा एकदा ट्रम्प हास्याचा विषय ठरले आहेत! नेतन्याहू यांना ट्रम्प यांनी बरेच अपशब्द वापरले. सुसंस्कृत वर्तन आणि सभ्य भाषा यांच्याशी ट्रम्प यांचे वैर आहे; पण स्पर्धक अथवा शत्रूंऐवजी आपल्याच मित्र देशाच्या प्रमुखासाठी ही भाषा वापरण्याची वेळ त्यांच्यावर आली. अमेरिकेत ज्यू धमीर्र्यांचा गट प्रभावी आहे आणि अमेरिकी सरकारच्या निर्णयावर या गटाचा अंकुश असतो, ही वस्तुस्थिती. मात्र; असे असताना देखील अमेरिकेच्या अलीकडच्या एकाही अध्यक्षाने इस्रायलबरोबर एखाद्या देशाविरुद्धच्या युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला नव्हता. ट्रम्प यांच्या लेखी हे पूर्वाध्यक्ष महामूर्ख आणि भित्रे होते! आपण, आपला देश सर्वसामर्थ्यवान आहोत, या गंडाने पछाडलेल्या ट्रम्प यांनी अविवेकी निर्णय घेतला. इराण झुकण्यास तयार नाही. जाहीरपणे आणि पडद्याआडून शांतता करारासाठी ट्रम्प उतावीळ झाले आहेत. यातून त्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. नुकताच त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील अहवाल व्हाईट हाऊसद्वारे प्रसिद्धीस देण्यात आला. ते ठणठणीत असल्याचे अहवाल सांगतो; पण प्रश्न शारीरिक तंदुरुस्तीचा नसून मानसिक प्रकृतीचा आहे.

वेडाचाराची परिसीमा

कोणत्याही स्थितीत अमेरिकेला इराण युद्धातून सहजासहजी बाहेर पडता येऊ नये, ही रशिया आणि चीन यांची भूमिका. ती स्वाभाविक मानता येईल. स्वतःचे सक्षम सैन्यदल नसताना युक्रेनसारखा देश रशियाला दीर्घकाळ झुंजवत ठेवतो, यामागचे कारण उघड आहे. इराणबरोबरच्या अमेरिकेच्या संघर्षाकडे रशिया त्याच दृष्टीने पाहतो. चीनकडून इराणला होणारी शस्त्रास्त्रांची मदत रोखण्यासाठी ट्रम्प यांना चीन दौरा करावा लागला. त्यातून फार काही साध्य झाले, असे म्हणण्यासारखी स्थिती आज नाही. इराणचे सरकार आणि इराणच्या मोठ्या भूभागावर प्रत्यक्ष नियंत्रण असलेले रिव्हॉल्युशनरी गार्ड यांच्यातील मतभेद टोकाला गेल्याने युद्धबंदीसाठीच्या करारात आधीच अडथळे आले आहेत. पहिल्या पायरीपासून नागरी नेतृत्वाची मोठी फळी संपवल्याचा आनंद ट्रम्प साजरा करत होते. ती वेडाचाराची परिसीमा होती. आता ते नेतृत्व नसल्याने करार प्रत्यक्षात येणे ही अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे. एकीकडे अमेरिकेने युद्धविराम जाहीर केला; पण इस्रायल माघारीसाठी तयार नाही. लेबाननमधील हिज्बउल्लाचे तळ नष्ट करण्यासाठी  इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. या स्थितीत इराण शांतता करार मान्य करणार नाही हे तर उघड होते. इराणने त्याबद्दल धमकी दिल्यावर ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना फैलावर घेतले. ‘तू पूर्ण वेडा झाला आहेस. मी पाठीशी नसतो तर तुझी जागा तुरुंगात असती’, या शब्दांत ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना सुनावलेच, त्याचवेळी बरीच शिवीगाळ देखील केली! इस्रायलला असलेला धोका जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हल्ले थांबणार नाहीत, हे थेट शब्दांत सांगून नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना फटकारले. वाजवी कारण नसताना मित्र देशाच्या मागे फरफटत जाण्याची मोठी किंमत ट्रम्प यांना चुकवावी लागणार आहे. त्यांच्या आततायी निर्णयामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून सर्वच देशांमध्ये सर्वसामान्यांना त्याचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. पारदर्शकतेचा अभाव, वर्चस्ववादी मानसिकता, जागतिक व्यवस्थेसाठी असलेले नियम-संकेत याबद्दल अनास्था, यातून अमेरिकेवर ही वेळी आली. अमेरिका सामर्थ्यवान आहे; पण जमिनीवरील युद्ध ती जिंकू शकत नाही, हे जगाला दिसले. इराणमध्ये जमिनीवर उतरून लढण्याची हिंमत ट्रम्प यांना दाखवता आली नाही. व्हिएतनाम, अफगाणिस्तान यानंतर अमेरिकेच्या झालेल्या नामुष्कीला ट्रम्प कारण ठरले. इस्रायलचे ओझे झुगारून त्यांना अमेरिकेची सुटका करून घेता येते का, हे लवकरच दिसेल. 
 

Related Articles