E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
शिक्षणातून व्हावेत सदाचाराचे संस्कार
Samruddhi Dhayagude
03 Jun 2026
शिक्षणबोध : संदीप वाकचौरे
शिक्षणाचा अर्थ विविध प्रकारे सांगितला जातो; मात्र तरी शिक्षण म्हणजे मानवी जीवनाची जडणघडण आहे. मानवाचे माणसात रूपांतरण करण्याचे काम शिक्षण करते. शिक्षणाच्या प्रक्रियेत फक्त पुस्तके वाचून आणि पदव्यांची भेंडोळी हाती घेऊन व्यक्तिमत्त्व घडत नाही. शिक्षण म्हणजे केवळ मार्कांचा प्रवास नाही. शिक्षणाचा मूलभूत अर्थ आहे संस्कार. शिक्षण घेतल्यामुळे मानवी जीवन संस्कारशील व्हायला हवे अशी अपेक्षा केली जाते. शिक्षणाचे कार्य मानवी मनाला आकार देणे हे आहे. मानवी मनाला आकार द्यायचा असेल, तर शिक्षणातून सदाचाराची वाट दाखवावी लागणार आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथात विविध श्लोकांच्या माध्यमातून शिक्षणाचे खरे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर जीवन जगण्याची कला आहे. समर्थांच्या मते खरे शिक्षण तेच असते जे सदाचाराशी जोडलेले आहे. सदाचाराची वाट दाखवते तेच खरे शिक्षण.
समर्थ रामदास स्वामी हे सदाचारी शिक्षणाविषयी अधिक बोलत आहेत. अलीकडे शिक्षणाचा अर्थ बदलत चालला आहे. शिक्षणाचा संबंध विविध भूमिकांशी जोडला जातो. शिक्षणाचे मूळ सदाचारात आहे. शिक्षणाने व्यक्तीला प्रामाणिकपणा, सत्य, अहिंसा, संयम, दया, कर्तव्यनिष्ठा शिकवली नाही, तर ते शिक्षण अपूर्ण आहे. खरे शिक्षण म्हणजे व्यक्तीला नैतिकतेची जाणीव करून देणे. नैतिकतेचा अर्थही वर्तमानात समजून घेण्याची गरज आहे. मुळात आपल्याकडे मूल्यांचा अर्थ फार मर्यादित अर्थाने घेतला जातो. आपल्याकडे मूल्यांच्या संकल्पना देखील सापेक्ष स्वरूपात मांडल्या जातात. मूल्यांचा विचार करताना तो विचार त्रिकालबाधित असायला हवा. व्यक्तिनिहाय मूल्यांचा विचार बदलतो तो काही मूल्यांचा विचार आहे असे म्हणता येणार नाही. शिक्षण घेतलेली माणसे अधिक प्रामाणिक असायला हवीत. अर्थात हा प्रामाणिकपणा स्वतःबरोबर समाजाशी आणि राष्ट्राशी देखील असायला हवा. समाजात शिकलेली माणसे अधिक अप्रामाणिक आहेत. सर्वाधिक भ्रष्टाचार हा शिकलेली माणसे करत आहेत. नफा मिळवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात होणारी कट प्रॅक्टीस, त्याच बरोबर गरज नसताना रुग्णाला दिली जाणारी औषधे, मृत्यूनंतरही रुग्णावर केले जाणारे उपचार. जेथे माणूस डॉक्टरला देव समजतो तेथे शिकलेला डॉक्टर रुग्णाची फसवणूक करतो. वर्ष दोन वर्षांत रस्ते खराब होत आहेत. रस्त्यावर खड्डे पडून अपघात होत आहेत. माणसे मरत आहेत. केवळ भ्रष्टाचाराच्या कारणामुळे माणसे मरत आहेत, त्याचेही काहीच वाटेनासे झाले आहे. माणसे इतकी अप्रमाणिक झाली आहेत. अगदी अलीकडे नीटचे पेपर फुटले. ते फोडण्यामध्ये शिक्षक सहभागी असल्याचे समोर आले आहे. ज्यांनी संस्काराची पेरणी करायची, प्रामाणिकतेची वाट चालायची, तीच माणसे आज अधिकाधिक अप्रमाणिक दिसत आहेत. ज्यांच्यावर समाज व राष्ट्राच्या जडणघडणीची जबाबदारी आहे, ती माणसे जेव्हा आपल्या कर्तव्य आणि जबाबदारीच्या जाणिवेपासून दूर जातात, तेव्हा शिक्षण निकामी होते. समाजात जे काही बरे-वाईट दिसते, त्या दिसणार्या गोष्टी म्हणजे शिक्षणाचे प्रतिबिंब आहे.
प्रामाणिकपणाचा आदर्श
शिक्षणाचा परिणाम माणसांच्या वर्तनात दिसला पाहिजे. शिकलेला मनुष्य नम्र, प्रामाणिक आणि जबाबदार असायला हवा. दक्षिण कोरियाचे रोहमू हयूम हे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी आपल्या देशाचा कारभार अत्यंत प्रामाणिकपणाने केला आणि निर्धारित कालावधीनंतर पदावरून दूर झाले. त्यानंतर ते आपल्या गावी येऊन नियमित शेती करू लागले. त्या दरम्यान त्यांच्या पत्नीवर, पती हे राष्ट्राध्यक्ष असताना, त्यांच्या पदाचा लाभ घेत, एका उद्योजकाला लाभ मिळून देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला; मात्र तो केवळ आरोप होता. न्यायालयात आरोप सिद्ध झाले नव्हते. अशा वेळी आरोपाने व्यथित होऊन रोहमू यांनी लगेचच आत्महत्या केली होती. आपल्या देशाशी प्रामाणिक राहणे म्हणजे काय हे पाश्चात्त्य देशातील अनेक महापुरुषांकडे पाहून शिकता येईल. हे देश आज प्रगतीच्या शिखरावर आहेत, याचे कारण त्याचे समर्पण हेच कारण आहे; मात्र त्याचवेळी त्यात प्रामाणिकपणाचा भाव आहे. राज्यकर्ते प्रामाणिक असतील, तर जगात परिवर्तन होऊ शकते हे लक्षात घ्यायला हवे. आज हा प्रामाणिकपणा आपल्याकडे कमी होताना दिसतो.
शिक्षणाचा पराभव
आपला समाज प्रामाणिकपणाबद्दल खूप बोलतो; मात्र प्रामाणिकपणाने राहात नाही हे आपले वास्तव आहे. जे बोलतो ते करत नाही आणि जे करतो ते बोलत नाही. अशा परिस्थितीत सदाचाराची किती गरज आहे. शिक्षणातून सत्याची उपासना शिकवली गेली, तर आपल्याला कॉपीमुक्त परीक्षांची गरज पडणार नाही. आज परीक्षांपेक्षा अधिक जबाबदारी परीक्षा पार पाडणे ही बनली आहे. परीक्षांसाठी पोलीस संरक्षणाची गरज पडते. प्रश्नपत्रिका पोलीस संरक्षणात ठेवण्याची वेळ आली आहे. अलीकडे तर भारत सरकारने या प्रश्नपत्रिका भारतीय सैनिकांच्या सुरक्षेत ठेवण्याचे घोषित केले. ही सारी पडणारी पावले म्हणजे आपल्या शिक्षणाचा पराभव आहे. आपल्या शिक्षणातून सदाचाराच्या दृष्टीने सत्याची वाट चालवणे घडले असते, तर शिक्षणाच्या क्षेत्रात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जी पावले उचलावी लागतात, तीच पावले शिक्षणात उचलावी लागत असतील, तर वर्तमानातील शिक्षणातून काय अपेक्षा करायची. त्याच बरोबर अहिंसा, संयम, दया यांसारख्या गोष्टी देखील सदाचाराच्या अनुषंगाने अधिक महत्त्वाच्या आहेत. आज आपल्या समाज व्यवस्थेत माणसे कर्तव्य भावनेपासून दूर जात आहेत. नोकरी करत असताना देखील आपल्याला वाममार्गी पैसा हवा आहे. त्यासाठी सामान्य माणसांची कामे अडवली जात आहेत. सामान्य माणसे वैतागून इंग्रज परवडले असे सांगत आहेत. त्यांचा हा वैताग म्हणजे एक प्रकारे आपल्या समाजातील शिकलेल्या माणसांविषयीचा संताप आहे. यातून आपल्या शिक्षणाचा पराभव होतो आहे. आपल्या कामाप्रति निष्ठा, प्रामाणिकता, गरिबांविषयी प्रेम, देशाविषयी आत्मीयता, आपल्या कर्तव्य भावना महत्त्वाच्या आहेत. ती कर्तव्यनिष्ठा आपल्या शिक्षणातून शिकवली गेली नाही आणि शिकवण्याचा प्रयत्न झाला असेल, तर त्या रूजवण्यात आपल्याला अपयश आले आहे.
माणसाच्या वर्तनात सदाचार असेल, तरच समाजात विश्वास निर्माण होतो. त्यामुळे शिक्षणातून सदाचाराची वाट चालण्याची गरज आहे. शिक्षण घेतलेल्या माणसांच्या बोलण्यातही सदाचाराची वाट दिसायला हवी आहे. शिक्षण घेऊन समाजात वावरणार्या माणसांच्या बोलण्यात किमान सौजन्य दिसायला हवे. अनेकदा शिकलेली माणसे अधिक अहंकाराने युक्त असतात. अहंकार असला, की बोलण्यात मवाळता येण्याऐवजी अहंकाराचेच वर्चस्व प्रतिबिंबीत होते. शिक्षणामुळे आपल्याला पद मिळाले आहे. त्या पदाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी आहे ही भावना निर्माण करण्याची गरज आहे. पदावर बसलेली माणसे माणसांशी माणसांसारखे बोलणार नसतील, तर अशी शिकलेली माणसे अशिक्षित समजावी. बोलण्यात नम्रता हवी. बोलणे रसाळ हवे. त्यात गोडवा असायला हवा. खरे बोलण्याची वृत्ती शिक्षणातून विकसित होण्याची गरज आहे. ती सत्यता मात्र प्रतिबिंबित झालेली दिसत नाही. शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी माणसे भ्रष्टाचाराशी जुळवून घेत असतील, तर उद्याचा समाज आणि राष्ट्र कधीच समृद्धता आणि संस्काराचा वारसा सांगू शकणार नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाने सत्याची वाट चालण्याची अपेक्षा आहे. आज तर माणसे स्वत:चा स्वार्थ लक्षात घेऊन सत्य-असत्याची निवड करताना दिसतात. त्याचबरोबर शिक्षणाने माणसाच्या मनात विवेकाची वाट सापडण्याची गरज आहे. सत्य, विवेकाशिवाय आपला प्रवास घडत असेल, तर शिक्षण फक्त माहितीचे आहे असेच म्हणावे लागेल. माणसांच्या संवादावर देखील अत्यंत सकारात्मक परिणाम होण्याची गरज आहे. शिकलेली माणसे कितीही सत्यप्रिय असली, तरी त्यांच्या मुखातून कठोर, खोटे किंवा अपमानकारक बोलणे होता कामा नये. असे घडणार असेल, तर ते वर्तन हे शिक्षणाशी विसंगत मानले जाते. बोलण्यातून व्यक्तीचे संस्कार आणि शिक्षण दिसून येते. त्यामुळे संवादाची भाषा ही अत्यंत मवाळ, हृदयाला स्पर्श करणारी, मनात घर करणारी असायला हवी. शिक्षणाचा अंतिम उद्देश कृतीतून सदाचार प्रकट करणे आहे. शिकलेला मनुष्य समाजहितासाठी कार्य करतो, इतरांना मदत करतो. कृतीतूनच शिक्षणाचे खरे मूल्य सिद्ध होते. समर्थच म्हणतात की, सदाचार हा थोर सोडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. सदाचाराचे जीवनातील स्थान अनन्य साधारण आहे. त्यामुळे जीवन आनंदाने फुलवायचे असेल आणि जीवनाचा अर्थ सापडावा असे वाटत असेल, तर शिक्षण आणि सदाचार यांचे नाते अधिक दृढ व्हायला हवे.
शिक्षण म्हणजे ज्ञान, सदाचार आणि आचरण होय. खरे शिक्षण तेच असते, जे व्यक्तीच्या बोलण्यात, वर्तनात आणि कृतीत सदाचार आणते. शिक्षणाने व्यक्ती बदलते, व्यक्ती बदलली, की समाज बदलतो. आजच्या काळात शिक्षण केवळ नोकरी मिळून देण्यापुरता विचार केला जात आहे; पण समर्थ रामदास म्हणतात की, शिक्षणाचे खरे मूल्य सदाचारात आहे. डॉक्टरांनी रुग्णांशी प्रामाणिक राहावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये शिकवावीत. विद्यार्थी केवळ गुणांसाठी नव्हे, तर सदाचारासाठी शिकवावेत. श्लोकात समर्थ रामदास म्हणतात की, सदाचारें शिक्षण| सदाचारें वर्तन| सदाचारें बोलणें| सदाचारें करणें॥ याचा अर्थ आहे की, शिक्षण हे सदाचाराशी जोडलेले असावे. बोलणे, वर्तन आणि कृती यात सदाचार असेल, तरच ते खरे शिक्षण ठरते. शिक्षणाचा उद्देश समाजहित, नैतिकता आणि जीवनमूल्ये रुजवणे हा आहे. सदाचाराशिवाय शिक्षण अपूर्ण आहे; सदाचारयुक्त शिक्षणच व्यक्ती आणि समाजाचे खरे सौंदर्य. त्यामुळे शिक्षणाशी नाते जीवन उन्नतीशी आहे आणि उन्नतीचा संबंध सदाचाराशी आहे. त्यामुळे शिक्षणाशी असणारे नाते अधिक दृढ व्हावे यासाठी शिक्षणाची दिशा बदलण्याची गरज आहे. वर्तमानातील शिक्षणाची दिशा बदलल्याशिवाय आपल्याला उद्याचा समृद्ध भारत घडवता येणार नाही.
संतांनी दाखवलेला मार्ग
आपल्याकडे शिक्षण संस्था दिवसेंदिवस वाढत आहेत. वाडी-वस्तीवर शिक्षण पोहचले आहे. विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळत आहेत. शिक्षण घेतलेली माणसे वाढत आहेत. साक्षरतेचा आलेख उंचावत असताना, अभिमान बाळगावा असाच प्रवास आहे; पण वर्तमानातील शिक्षणातून आपण सदाचाराची वाट दाखवण्यात कमी पडलो आहोत यात शंका नाही. त्यामुळे माणसे शिकली, तरी अशिक्षित राहिल्यासारखीच वागत असतील, तर तो प्रवास समाजाचे परिवर्तन घडवण्यात अपयशी ठरणार आहे. आपण शिक्षणातून मानवाचा माणूसपर्यंतचा प्रवास करण्यासाठी अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे त्या दिशेने प्रवास न घडणे म्हणजे शिक्षण पराभूत होणे आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. संतांनी दाखवलेल्या मार्गाने आपण जाणे म्हणजे शिक्षण आहे. संत अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत. त्यांनी माणसाला सातत्याने एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. ती उंची गाठण्यात वर्तमानातील शिक्षण अपयशी ठरले आहे. त्यामुळे जोवर आपण सदाचाराची वाट शिक्षणातून निर्मिली जात नाही, तोवर आपल्याला प्रगत देश म्हणून प्रगती करता येणे शक्य नाही. म्हणून समर्थ रामदास जे सांगत आहेत की, सदाचारें शिक्षण| सदाचारें वर्तन| सदाचारें बोलणें| सदाचारें करणें॥ हा विचार केंद्रस्थानी ठेवून आपण शिक्षणाची वाट चालण्याची गरज आहे.
Related
Articles
कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण
10 Jun 2026
कर्णधारपदासाठी मला माझे व्यक्तिमत्व बदलण्याची गरज नाही : श्रेयस
08 Jun 2026
विरोधकांच्या विलीनीकरणाचा भाजपला फायदाच : फडणवीस
13 Jun 2026
ठार मारण्याचा प्रयत्न करणार्यास अटक
09 Jun 2026
TMC नेता जहांगीर खानला नेपाळ सीमेवरुन अटक
08 Jun 2026
महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात राही अव्वल, मनू दुसर्या स्थानी
09 Jun 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संकटाची चाहूल (अग्रलेख)
2
फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप
3
सुग्रीवाचे गैरवर्तन आणि रामाचे मार्गदर्शन
4
खत अनुदान तीन लाख कोटींपेक्षा अधिक?
5
भूगावमध्ये विजेचा लपंडाव; नागरिकांमध्ये संताप
6
तीन वर्षीय विधी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर