तैवानच्या शेअर बाजाराने टाकले भारताला मागे   

वृत्तवेध

एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) या निकषावर तैवानच्या शेअर बाजाराने भारताला मागे टाकले आहे. जगातील सर्वांत मोठी चिप उत्पादक कंपनी ‘टीएसएमसी’ (तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरींग कंपनी) च्या शेअरमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे तैवानच्या बाजारमूल्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
 
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, तैवानच्या शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य सुमारे ४.९५ ट्रिलियन डॉलर (सुमारे ४११ लाख कोटी रुपये) इतके झाले आहे, तर भारताचा बाजारमूल्यांकन आकडा ४.९२ ट्रिलियन डॉलरपर्यंत घसरला आहे. या बदलानंतर अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर तैवान हा जगातील पाचवा सर्वांत मोठा शेअर बाजार ठरला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची जागतिक मागणी झपाट्याने वाढत असल्याने ‘टीएसएमसी’ च्या शेअरमध्ये या वर्षी सुमारे ४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तैवानच्या प्रमुख निर्देशांकामध्ये या कंपनीचा वाटा जवळपास ४२ टक्के असल्याने तिच्या कामगिरीचा संपूर्ण बाजारावर मोठा प्रभाव पडतो.
 
सेमिकंडक्टर आणि ‘एआय’ चिप्सची वाढती जागतिक मागणी तैवानच्या तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला आणि शेअर बाजाराला मोठा आधार देत आहे. या वर्षी भारतीय शेअर बाजारावर विविध कारणांमुळे दबाव दिसून आला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सुमारे २४ अब्ज डॉलरची विक्री केली आहे. 
 
शेअर बाजाराच्या मूल्यांकनात तैवानने भारताला मागे टाकले असले, तरी वास्तविक अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या दृष्टीने भारत अजूनही खूप पुढे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था सुमारे ४.१५ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. तुलनेत तैवानचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीटीपी) सुमारे ९७७ अब्ज डॉलर आहे. याचा अर्थ, शेअर बाजारातील मूल्यांकनात तात्पुरता बदल झाला असला, तरी आर्थिक पाया, बाजाराचा विस्तार आणि दीर्घकालीन विकास क्षमतेच्या बाबतीत भारत अजूनही मजबूत स्थितीत आहे.
 

Related Articles