युक्रेनवर रशियाचा जोरदार हल्ला   

 

क्षेपणास्त्रे, ड्रोनचा स्वैर वापर, इमारतींची पडझड; १६ ठार
 
किव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने जोरदार हल्ला चढविला. त्यात अनेक इमारतींची पडझड झाली. १६ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगार्‍याखाली अडकले आहेत. मदत कार्य वेगाने राबविले जात आहे. 
 
राजधानी किव्हमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून ५८ जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन मुलांचा समावेश आहे. आपत्ती सेवा विभागाने सांगितले की, किव्ह जिल्ह्यातील रहिवासी इमारती आणि आठ नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.   
 
मध्य द्निप्रोपेत्रोव्स्क परिसरात सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून निप्रो परिसरातील हल्ल्यात ३६ जखमी झाले आहेत. प्रति हल्ल्यात एक मदतनीस ठार झाला. एक दुमजली आणि एका चार मजली इमारतीचे नुकसान झाले. मोठ्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री आणि पहाटे स्फोटांचे आवाज परिसरात ऐकू येत होते. रशियाकडून आणखी हल्ले होण्याचा इशारा अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिला.
 
पाडिलस्की जिल्ह्यात नऊ मजली इमारतीच्या वरच्या मजल्याचे नुकसान झाले. ढिगार्‍याखाली नागरिक अडकले असल्याचे सांगण्यात आले. मदतकार्य सकाळपासून सुरू झाले. सोलामिआस्की जिल्ह्यात २० मजली आणि २४ मजली इमारतीचे नुकसान झाले. 
 
शस्त्रे द्या, युक्रेनची मागणी 
 
रशियाचे वाढते हल्ले पाहता अमेरिकेसह मित्र देशांनी हवाई संरक्षण यंत्रणा पुरवावी, अशी मागणी युक्रेनने केली आहे. तसा दबाव वाढविला आहे. अनेक ड्रोन, क्षेपणास्त्रांना रोखण्यात यश आल्याचा दावाही केला आहे.

Related Articles