E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
दुहेरी संकटाच्या चक्रव्यूहात जग
Samruddhi Dhayagude
24 May 2026
मिलिंद बेंडाळे
तीव्र उष्णता आणि दुष्काळ या दोन वेगळ्या आपत्ती राहिल्या नसून एकत्रितपणे मानवी जीवनावर घातक परिणाम करत आहेत. एका नवीन अभ्यासानुसार हवामान धोरणांमध्ये ठाम बदल न झाल्यास या शतकाच्या अखेरीस पृथ्वीवरील सुमारे २८ टक्के म्हणजेच सुमारे २६० कोटी नागरिक उष्णता आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटाचा सामना करत असतील.
जगात तीव्र उष्णता आणि दुष्काळाचा धोका आजच्या तुलनेत पाचपटींनी वाढणार आहे. हे केवळ हवामानाशी संबंधित संकट नाही, तर जीवन, उपजीविका आणि भविष्यावर एकाच वेळी झालेला हा हल्ला आहे. २००१ ते २०२० दरम्यान, जगाने दर वर्षी सरासरी चार वेळा अशी परिस्थिती अनुभवली आहे, जेव्हा भीषण उष्णता आणि दुष्काळाच्या संकटाशी एकाच वेळी सामना करावा लागला. ही आकडेवारी औद्योगिक कालखंडापूर्वीच्या (१८५० ते १९००) काळाच्या तुलनेत दुप्पट आहे. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी अशी भीती व्यक्त केली आहे, की परिस्थिती अशीच राहिली, तर या शतकाच्या अखेरीस दर वर्षी अशा घटना सुमारे दहा वेळा घडू शकतात आणि प्रत्येक घटना दोन आठवड्यांपर्यंत लोकांना होरपळून टाकू शकते.
शास्त्रज्ञांच्या मते, उष्णता आणि दुष्काळ एकमेकांना वाढवतात आणि ते दोन्ही एकत्र येतात, तेव्हा त्यांचा फटका अनेक पटींनी वाढतो. शेतातील उभी पिके सुकतात, पाण्याचे स्रोत आटतात, जंगले पेटू लागतात आणि बाजारपेठेत अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढतात. उष्णता आणि उष्माघात यमदूतांप्रमाणे काम करू लागतात. याचा सर्वाधिक फटका उघड्यावर काम करणार्यांना बसतो. त्यात मजूर, शेतकरी आणि बांधकामक्षेत्राशी संबंधित लोकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी ही केवळ गैरसोय नसून जीवन-मरणाचा प्रश्न बनतो.
या शतकाच्या अखेरीस परिस्थिती कशी बदलू शकते, हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी आठ हवामान मॉडेल्सवर आधारित १५२ सिम्युलेशनचे विश्लेषण केले आहे. यामध्ये लोकसंख्येतील वाढ आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या विविध परिस्थितींचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा तपशील ‘आयपीसीसी’च्या सहाव्या मूल्यांकन अहवालात नमूद केला आहे. या अभ्यासात ‘उष्णता-दुष्काळ’च्या घटनांची व्याख्या अशा दिवसांच्या रूपात केली आहे, जेव्हा तपमान त्याच्या सामान्य पातळीच्या वरच्या दहा टक्कयांमध्ये असते आणि सोबतच किमान मध्यम स्तराचा दुष्काळही असतो. ही तुलना १९६१ ते १९९० च्या आधारभूत कालावधीच्या आकडेवारीशी केली गेली आहे. या संकटाचे सर्वात भयावह सत्य म्हणजे त्यातील विषमता. ज्या देशांनी हरितगृह वायूंचे सर्वात कमी उत्सर्जन केले, म्हणजेच जे हवामान संकटासाठी सर्वात कमी जबाबदार आहेत, त्यांनाच या दुहेरी हल्ल्याचा सर्वाधिक सामना करावा लागणार आहे. यात विशेषतः कमकुवत आणि उष्णकटिबंधीय क्षेत्रात राहणार्या लोकांचा समावेश आहे.
वातानुकूलन यंत्रांसारखी (एसी-कूलर)साधने उपलब्ध नसलेल्या तसेच आरोग्यसेवाही मजबूत नसलेल्या लहान देशांमधील आर्थिकदृष्टया दुर्बल समाजात हे संकट दैनंदिन जीवन अधिक कठीण करेल. पाणी संपल्यानंतर दुसरा कोणताही पर्याय नसणे, हा या धोक्याचा सर्वात भयानक पैलू आहे. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, की २०३० मध्ये ६.६ टक्के लोकसंख्या या धोक्याच्या छायेत असेल, तर २०९० पर्यंत हा आकडा २८ टक्कयांवर पोहोचेल. म्हणजेच येणार्या वर्षांमध्ये हे संकट वेगाने वाढणार असून कोट्यवधी लोकांना कचाट्यात घेणार आहे. एका सरासरी श्रीमंत देशातील नागरिकाचे आयुष्यभराचे कार्बन उत्सर्जन दुसर्या एखाद्या व्यक्तीला या धोकादायक ‘उष्ण-कोरड्या’ परिस्थितीमध्ये ढकलू शकते. ही आकडेवारी जागतिक विषमता अधिक स्पष्ट करते.
जगातील देशांनी आपली हवामानविषयक आश्वासने गांभीर्याने पाळल्यास हा धोका मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. अशा स्थितीत शतकाच्या अखेरीस प्रभावित लोकसंख्या कमी होऊन सुमारे १८ टक्के राहू शकते. म्हणजेच १७० कोटी लोकांना या दुहेरी संकटाचा सामना करावा लागेल.हवामानबदलाच्या वेगाने वाढणार्या परिणामांमुळे आज उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ या दोन स्वतंत्र आपत्ती राहिलेल्या नाहीत; त्या एकमेकांना पूरक ठरत अधिक तीव्र, व्यापक आणि घातक स्वरूप धारण करत आहेत. या दुहेरी संकटव्यूहाचा वेध घेताना केवळ पर्यावरणाचा नव्हे, तर अर्थव्यवस्था, अन्नसुरक्षा आणि सामाजिक न्याय यांचा विचार अपरिहार्य ठरतो. जगभरातउष्णतेच्या लाटा आता अपवाद राहिलेल्या नाहीत, तर नियमित होत चालल्या आहेत. त्याच वेळी पर्जन्यमानातील अनियमितता आणि पाण्याच्या स्रोतांवरील ताण वाढल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे.
उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता वेगाने कमी होते, तर दुष्काळामुळे पाण्याची उपलब्धता घटते. परिणामी, तपमान आणखी वाढते आणि दुष्काळ अधिक तीव्र बनतो, असे एक दुष्टचक्र निर्माण होते. या दुहेरी संकटाचा सर्वात पहिला आणि तीव्र फटका शेतीला बसतो. भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या शेतीवर अवलंबून असताना उष्णता आणि दुष्काळाचा एकत्रित परिणाम अत्यंत गंभीर ठरतो. पिकांची वाढ खुंटते, उत्पादन घटते आणि शेतकर्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो. अन्नधान्याची उपलब्धता कमी झाल्याने बाजारात किमती वाढतात. त्याचा परिणाम शहरातील ग्राहकांवरही होतो. अशा परिस्थितीत अन्नसुरक्षेचा प्रश्न अधिक तीव्र बनतो.
नद्या, तलाव आणि भूजलस्तर यांवर आधीच ताण आहे. उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा दर वाढतो, तर दुष्काळामुळे पाण्याची भर पडत नाही. परिणामी, पाण्याचा तुटवडा अधिक तीव्र होतो. शहरी भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, तर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष वाढतो. भविष्यात ‘पाणी युद्धां’ची भीती व्यक्त केली जाते, ती या पार्श्वभूमीवर निराधार नाही. या संकटाचा सर्वाधिक फटका समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना बसतो. उघड्यावर काम करणारे मजूर, शेतकरी, बांधकाम कामगार यांच्यासाठी उष्णतेच्या लाटा आरोग्यासाठी घातक ठरतात. दुष्काळामुळे रोजगाराच्या संधी कमी होतात, स्थलांतर वाढते आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण होते.
या दुहेरी संकटाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे जागतिक असमानता. हवामानबदलासाठी सर्वाधिक जबाबदार असलेले विकसित देश आणि त्याचा सर्वाधिक फटका सहन करणारे विकसनशील देश यांच्यातील दरी अधिकच वाढत आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशातील गरीब देशांकडे ना पुरेशी साधने आहेत, ना तांत्रिक क्षमता. त्यामुळे ते या संकटाला सामोरे जाण्यात अधिक असुरक्षित ठरतात. ही परिस्थिती केवळ पर्यावरणीय नव्हे, तर नैतिक आणि राजकीय प्रश्नही निर्माण करते.
तथापि, हवामानबदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक स्तरावर विविध करार आणि उपक्रम राबवले जात आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करणे, नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे आणि टिकाऊ विकासाच्या संकल्पनांचा स्वीकार करणे या उपाययोजनांमुळे या संकटाची तीव्रता कमी करता येऊ शकते; मात्र उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत गरजेची आहे. स्थानिक पातळीवर जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, पिकांच्या पद्धतींमध्ये बदल आणि हवामानस्नेही शेती उपाययोजनांमुळे दुष्काळाचा परिणाम कमी करता येतो. शहरी भागात हरित क्षेत्र वाढवणे, उष्णता कमी करणारी पायाभूत सुविधा उभारणे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करणे यावर भर देणे आवश्यक आहे. तसेच, सर्वात असुरक्षित घटकांसाठी विशेष योजना राबवणे आवश्यक आहे. उष्णता आणि दुष्काळाचा हा दुहेरी संकटव्यूह आपल्याला एक स्पष्ट संदेश देतो, तो म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलन ढासळले आहे. या संतुलनाची पुनर्स्थापना करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा, येणार्या पिढ्यांसाठी आपण अधिक कठीण आणि अस्थिर जग सोडून जाऊ.
Related
Articles
सिंधू आणि तन्वी उपांत्यपूर्व फेरीत
12 Jun 2026
डिझेल खरेदीवर निर्बंध...!
13 Jun 2026
विकासाच्या नकाशावर हवी अहिल्यानगरला नवी दिशा
08 Jun 2026
कोट्यावधी शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार?
09 Jun 2026
पावसामुळे भारताचा पराभव
12 Jun 2026
नदी प्रदूषणास जबाबदार कंपन्या व अधिकार्यांवर कारवाई करा
13 Jun 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संकटाची चाहूल (अग्रलेख)
2
फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप
3
सुग्रीवाचे गैरवर्तन आणि रामाचे मार्गदर्शन
4
खत अनुदान तीन लाख कोटींपेक्षा अधिक?
5
भूगावमध्ये विजेचा लपंडाव; नागरिकांमध्ये संताप
6
तीन वर्षीय विधी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर