अपप्रचाराविरोधात समाज माध्यमांवर सक्रिय राहावे   

रवींद्र चव्हाण यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे : राज्यात पक्षाचे आज दीड कोटी सदस्य आणि अडीच लाख सक्रिय सदस्य कार्यरत आहे. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढील वर्षभराचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. फेक नरेटिव्हमुळे भाजपचे २०२४ लोकसभा निवडणुकीत प्रचंड नुकसान झाले. वार्‍यासारखा हा फेक नरेटिव्ह पसरला. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये याकरिता डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यकर्त्यांनी सक्रियपणे कार्यरत राहिले पाहिजे. सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी एक लाख सहा हजार बूथ मध्ये ५१ टक्के संघटन वाढवणे आपले लक्ष्य आहे. असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
 
भारतीय जनता पक्षाच्या ४६ वा वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे सक्रिय कार्यकर्ता संमेलन आयोजित केले होते. भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिव प्रकाश यांनी ’राष्ट्र के विकास में भाजप की भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, राज्य सरचिटणीस राजेश पांडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका सभागृहनेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते.
 
रवींद्र चव्हाण म्हणाले, पुणे शहराची देशात एक वेगळी ओळख असून ती पुढे प्रभावीपणे नेणे आपले काम आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कोणत्या दिशेने भविष्यकाळात वाटचाल करणारा हे सांगण्याचे काम माझे आहे. भाजप पक्षाचा कार्यकर्ता शिस्तप्रिय असावा तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे असू नये. पक्षाची स्थापना आणि मूळ गाभा व विचारधारा यांच्याशी कार्यकर्ता समर्पित असावा. राष्ट्रीय विचारधारा ही आपली मूळ विचारधारा आहे. भाजपची मागील ४६ वर्ष ही समर्पणाची आहे. अनेक जणांनी अपार कष्ट करून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी त्याग केला आहे. देशाला परम वैभव प्राप्त झाले पाहिजे त्यादिशेने नेण्याची जबाबदारी ही केवळ भाजपची आहे. देशात अनेक पक्ष आहे त्याच्याबाबत बोलणे उचित नाही. त्यांचा अजेंडा हा वेगवेगळा आहे.
 
धीरज घाटे म्हणाले, भाजपचे काम पुण्यात झपाट्याने वाढत गेले आहे आणि विविध निवडणुकीत चांगल्या प्रकारे यश पक्षाला मिळाले आहे. कार्यकर्त्यांचे संघटन आणि तळागाळात पोहचलेले पक्षाचे विचार यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळत आहे. कार्यकर्ता विचारधारा आधारे काम करतो. सामान्य पुणेकर यांना डोळ्यासमोर ठेवून काम आपल्याला करायचे आहे. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये काम करत आहे. बूथ यंत्रणेच्या माध्यमातून भाजपचे संघटन मजबूत करत आहेत. या कार्यकर्त्यांमधूनच अनेक नेते तयार झाले आहेत. अनेकांनी पुणे शहर, राज्याचे देशाचे नेतृत्व केले आहे, करत आहेत. अण्णा जोशी, गिरीश बापट, विश्वास गांगुर्डे, विकास मठकरी आदी पक्ष वाढीसाठी, संघटन करण्यासाठी मोठे काम केले आहे.

Related Articles