रस्त्याखालच्या वाहिन्यांचे नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञान वापरा   

महापालिकेच्या ठेकेदारांना सूचना 

पुणे : रस्ते विकास, देखभाल दुरूस्तीची कामे करताना रस्त्याखालील सेवा वाहिन्यांचे संबधित ठेकेदारांनी ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार या प्रगत तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांचा वापर करून अगोदर पाहणी करणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. यामुळे रस्त्यांची खोदाई करताना सेवा वाहिन्यांचे नुकसान आणि संभाव्य अपघातही टाळण्यास मदत होणार असल्याचा दावा पथ विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.
 
शहरातील रस्त्यांखालून पाणी पुरवठा, ड्रेनेज, पावसाळी गटारे, एमएनजीएलच्या गॅस वाहीन्या, एमएसडीएसएलच्या वीज वाहीन्या, विविध इंटरनेट कंपन्यांच्या केबल्सचे जाळे पसरले आहे.रस्त्यांचा विकास अथवा देखभाल दुरूस्तीची कामे करताना अनेकदा पाण्याचे व्हॉल्व्स तुटण्याच्या, गॅस लाईन फुटण्याच्या, वीज वाहीन्या तुटण्याच्या अथवा चेंबर्स दबले जाण्याच्या घटना घडतात. यामुळे सेवा तर खंडीत होतेच मात्र मोठे अपघात होण्याची देखील शक्यता आहे.
 
गेल्या अनेक वर्षात रस्त्यांखालून टाकण्यात आलेल्या सेवा वाहीन्यांचे एकत्रित नकाशे महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रस्त्यांचे काम करत असताना अंदाजे खोदाई करण्यात येते आणि सेवा वाहीन्या खंडीत होउन त्याचा परिणाम सेवांवर होतो. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पथ विभागाने महापालिकेचे व विविध शासकीय व खाजगी संस्थांकडून रस्ते खोदाईची परवानगी मागितल्यास त्या रस्त्याखालील सेवा वाहीन्यांची माहिती करून घेण्यासाठी ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार या प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत उपकरणाचा वापर करून अगोदर पाहणी करावी. रस्त्याखाली असलेल्या सेवा वाहीन्यांची माहिती परवानगी मागणार्या संबधित विभागांना देण्यात येणार आहे. 
 
यामुळे रस्ते खोदाईचे नियोजन करून सेवा वाहीन्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. रडारच्या माध्यमातून करण्यात येणार्या पाहणीचा खर्चाचा अंतर्भाव कामाच्या पूर्वगणनपत्रामध्येच करण्यात यावा, असे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.

Related Articles