गरिबांची भाकरी झाली स्वस्त   

आवक वाढल्याने क्विंटलच्या दरात ३०० रुपयांनी घट 

पुणे : बाजारात दिवसेंदिवस ज्वारीची आवक वाढत आहे. आवक वाढल्यामुळे गरिबांची भाकरी स्वस्त झाली आहे. क्विंटलच्या दरात ३०० रुपयांनी घट झाली आहे. वाढलेली आवक आणखी काही काळ कायम राहणार असल्याने दरही स्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यापारी सचिन रायसोनी यांनी व्यक्त केला. 
 
मार्चपासून नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. मात्र यंदा तीन टप्प्यांत ज्वारीची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बाजारात आवक सुरू झाली. तीनही टप्प्यांतील आवक बाजारात दाखल होत असल्यामुळे मागणी वाढली आहे. परिणामी दरात घट झाली आहे. हंगामाच्या प्रारंभी ज्वारीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र आता दरात घसरण झाल्याने ज्वारीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. पुढील काही महिने दरात वाढ होणार नसल्याचे संकेतही रायसोनी यांनी दिले. 
 
मार्केटयार्डातील भुसार विभागात रोज ८ ते १० ट्रकची आवक होत आहे. ही आवक बार्शी करमाळा, जळगाव येथून होत आहे. वाढलेली आवक मे अखेरपर्यंत कायम असणार आहे. बाजारात एकीकडे आवक वाढली, तर दुसरीकडे मार्च अखेरमुळे ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली. त्यातच युद्धामुळे लॉकडाऊनची चर्चा सुरू होती. त्याचाही परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर झाला. त्यामुळे ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली एाहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे शेतकर्‍यांनी तीन टप्प्यांत पेरण्या केल्या होत्या. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आवक होत आहे. यंदा ज्वारीच्या पिकाला हवामान पोषक होते. त्यामुळे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे येत्या काळातही दरात मोठी वाढ होणार नसल्याचा अंदाज आहे. 
 
मागणीच्या तुलनेत आवक अधिक 
 
सद्य:स्थितीत बाजारात ग्राहकांच्या मागणीच्या तुलनेत ज्वारीची आवक अधिक आहे. नुकताच नवीन ज्वारीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे आवक लगेच कमी होणार नाही. याचाच परिणाम म्हणून दरातही लवकर वाढ होणार नाही. यंदा ज्वारीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. 
 
- सचिन रायसोनी, व्यापारी, मार्केटयार्ड. 
 
घाऊक बाजारातील ज्वारीचे क्विंटलचे दर 
 
ज्वारी                                   प्रकार 
गावरान (मध्यम प्रकार)      ४२०० ते ४४००
गावरान (उच्च प्रकार) ६००० ते ६३००
दुरई (मध्यम प्रकार) ३३०० ते ३६००
दुरई (उच्च प्रकार) ३६०० ते ३८००

Related Articles