E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
शिक्षणाच्या बाजारीकरणात गुरुपरंपरा हरवली
Wrutuja pandharpure
08 Apr 2026
शिक्षणबोध, संदीप वाकचौरे
शिक्षणात गुरू आणि शिष्य नाते कायमच महत्त्वाचे मानले गेले आहे. वैदिक काळात या नात्याचा अत्यंत गंभीरपणे विचार केला जात होता. गुरूचे स्थान हे राजसत्तेपेक्षा अधिक होते. राजसिंहासनावर बसलेला राजाही गुरूला नमस्कार करत असे. अनेक राजपुत्र शिक्षणासाठी गुरूगृही पाठवले गेल्याचा इतिहास आहे. साधारण ज्ञानादानाचे कार्य करणार्या व्यक्तीला गुरू म्हटले जात असे. जो शिकवतो तो गुरू असे मानले जाते. भूतकाळात गुरूकुल पद्धतीचा शिक्षणाचा विचार रूढ झालेला होता. शिष्याने ज्ञानार्जनासाठी गुरूगृही जायचे आणि तेथे शिक्षण घ्यायचे. गुरू जे शिकवतील ते शिक्षण घेऊन, गुरूच्या आज्ञेने गुरूचा आश्रम सोडायचा. गुरूच्या आज्ञेशिवाय कोणीही शिष्य आश्रम सोडत नसायचे. त्याकाळी आजच्या सारख्या लेखी परीक्षा नव्हत्या आणि आजच्यासारख्या परीक्षेच्या मार्कांच्या आधारे उत्तीर्ण-अनुत्तीर्ण ठरवले जात नव्हते. आश्रमात शिकलेल्या शिष्याच्या जगण्यात जीवन समृद्ध करण्याची पात्रता आली, की नाही याची पडताळणी केली जात असे. शिष्यामध्ये झालेला वर्तनबदल, त्याच्यावर झालेले संस्कार, जीवनविषयक निर्माण झालेला दृष्टीकोन याचा विचार केला जात असे. गुरूचा आश्रम सोडताना प्रत्येक गुरू आपल्या शिष्याला निश्चित असा संदेश देत असे. त्या संदेशावर जीवन व्यवहार पुढे सुरू ठेवणे अपेक्षित असे.
मुळात येथे गुरू काय शिकवत होते हेही महत्त्वाचे होते, पण गुरूचे शिकवणे म्हणजे काय? आजच्यासारखी केवळ माहितीने युक्त पुस्तके शिकवली जात नव्हती. गुरूचे जीवन, त्याचे प्रत्यक्ष वर्तन हेच शिष्यांसाठी जीवन शिक्षणाचा वस्तूपाठ असे. गुरू हे जीवन जगण्याच्या अनुभवाने शिष्याला शिक्षण देत होते. त्यामुळे जगणे आणि शिकणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जात होत्या. त्याकाळी गुरू जे काही शिकवत होते, ते पुस्तकी फारसे नव्हते. जीवन उन्नतीचा विचार, शिष्याच्या जीवनातील अंधकार नष्ट व्हावा, त्याचे जीवन समृद्ध व्हावे म्हणून हा जगण्याचा वस्तूपाठ देण्याचा प्रयत्न केला जात होता. जीवन परिवर्तन हाच शिक्षणाचा पाठ होता. ते परिवर्तन झाल्याशिवाय शिक्षण पूर्ण झाले असे मानले जात नव्हते; मात्र अलिकडच्या काळात गुरूकुल शिक्षणाचा विचार जवळजवळ संपुष्टात आला आहे. पूर्वीसारखी आश्रम व्यवस्था आता दिसत नाही. जेथे गुरूच्या सहवासातील शिक्षणाने जीवनात परिवर्तन घडायला हवे असते. गुरूकुल व्यवस्थेत गुरूचे जगणे हेच शिक्षण असते. आज ज्याला शिक्षण म्हणतात, ते शिक्षण तेव्हा नव्हते. त्यावेळी शिक्षणाचा अर्थ जीवन शिक्षण असा होता. जीवन शिक्षणाचा विचार हा केवळ माहितीने युक्त नव्हता, तर प्रत्यक्ष अनुभवाने युक्त शिक्षणावर भर दिला जात होता.
अलीकडे शिक्षणासाठी पारंपरिक स्वरूपाचे गुरूंचे आश्रम थांबले आहेत. त्याऐवजी शाळा, महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली. तेथेही शिक्षण दिले जात असले, तरी ते शिक्षण औपचारिक स्वरूपाचे आहे. तेथे जीवन-शिक्षणाचा विचार केला जात नाही, हे वास्तवही स्वीकारायला हवे. मात्र वर्तमानात त्यादृष्टीने पुरेशा स्वरूपात पेरणी होत नाही. अलीकडे शाळा-महाविद्यालयात विविध विषयांची पाठ्यपुस्तके शिकवली जात आहेत. ती पुस्तके शिकवणे म्हणजे तरी काय आहे, तर फक्त पुस्तकातील माहिती शिकवली जात आहे. माहिती शिकवणे म्हणजे काय? तर फक्त शब्द आणि त्याचे अर्थ सांगितले जात आहेत. अर्थात अर्थ सांगणे म्हणजे केवळ पर्यायी शब्द सांगणे घडते आहे. त्यामुळे त्या कथनाचा, अध्यापनाचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे शिकवणे पुढे जाते आणि शिकणे मागे राहत जाते. मुळात कोणत्याही शिकण्याचा परिणाम करायचा असेल, तर त्याकरिता शिकण्याचा अर्थ अनुभवाद्वारे शिकवण्याची गरज आहे. तसे शिकणे झाले, तर जीवनाला आकार मिळण्याची शक्यता अधिक. त्याकाळी शिक्षक हा सरकारी कर्मचारी नव्हता. किंबहुना त्याच्याकडे कर्मचारी म्हणून पाहिले जात नव्हते. शिक्षक हा समाज व राष्ट्र निर्माता म्हणून पाहिले जात होते. त्याचे कारण शिक्षकाकडे केवळ शब्दांची संपत्ती नव्हती, तर त्याच्याकडे असलेल्या शब्दाच्या संपत्तीला अनुभवाचा अर्थ होता. त्यामुळे तो जो मार्ग निवडेल, तो मार्ग निश्चित उद्धाराचा असेल यात शंका नाही. त्यामुळे गुरूवर भरवसा होता आणि विश्वास, श्रद्धादेखील होती. कारण त्या गुरूकडे ज्ञान असणार याची खात्री होती.
शिक्षणाचे बाजारीकरण
अलीकडे शाळेत शिकवणार्या शिक्षकांप्रति प्रेम, स्नेह, आदर हा काहीसा कमी झालेला दिसतो. जसा जसा शिक्षणाचा विचार बदलत गेला, त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थी यांच्या नात्यातही बदल होत गेला. खरेतर शिक्षणाचे क्षेत्र पवित्र मानले जात होते; मात्र जागतिकीकरण, उदारीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आली. त्यानंतर त्याचा परिणाम जगातील सर्वच क्षेत्रांवर झाला. त्याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद नाही. शिक्षणाचे बाजारीकरण झाले. शिक्षण हा काही लोकांसाठी नफा कमवण्याचे क्षेत्र बनले. त्याचा परिणाम म्हणून शिक्षणाचा धंदा बनला आहे. त्यामुळे शिक्षणात नोकरी करताना तेथे काम करणारी माणसे गुरू नाही, तर कर्मचारी ठरले. शेवटी गुरू आणि कर्मचारी यात निश्चित अंतर आहे. शिक्षणाचे व्यावसायिकीकरण झाले, शिक्षणातून समाजाची उन्नती करण्याऐवजी केवळ पैसा कमवण्यासाठी शिक्षणाचा विचार केला जाऊ लागला की, तेथे काम करणारी व्यक्ती मग शिक्षक गुरू राहत नाही, तो शेवटी कर्मचारीच ठरतो. शिक्षक हा जेव्हा कर्मचारी ठरतो, तेव्हा परिवर्तन आणि समाजाची उन्नतीची शक्यता उरत नाही.
विनोबांना देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांच्या समोर बोलण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी निमंत्रित केले होते. तेव्हा त्यांना देशाची तत्कालीन परिस्थिती जी आहे, त्याला नेमके काय कारण आहे? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा विनोबादेखील म्हणाले होते की, या देशाची वर्तमानात जी अवस्था आहे, त्याला या देशातील शिक्षक कारणीभूत आहेत. हे ऐकल्यावर उपस्थितींना धक्का बसला. आज देखील कोणालाही धक्का बसेल यात शंका नाही; मात्र विनोबाजी सांगतात की, जोवर या देशातील शिक्षक आचार्य होण्याच्या दिशेने प्रवास करत नाही, तोवर आपल्याला देशाच्या प्रगतीला दिशा मिळणार नाही. त्यामुळे प्रगती करायची असेल, तर तो प्रवास आचायार्र्ंच्या दिशेने करावा लागणार आहे. तो प्रवास वर्गात केवळ माहिती शिकवली म्हणजे साध्य होईल अशी शक्यता नाही. आपल्याला आचार्यांच्या दिशेने प्रवास करायचा आहे, म्हणजे केवळ पदवी नाही, तर त्यापलिकडे ज्ञान साधनेची वाट चालणार्या शिक्षकांची गरज आहे. ज्ञान साधनेची वाट आपल्याला चालायची असेल, तर त्यासाठी जीवन जगण्याची आणि जीवन समृद्धतेची वाट चालण्याची गरज आहे.
मुळात इतिहासात शिक्षणाच्या मूलभूत दिशेने जी माणसे चालण्याचा प्रयत्न करत होती, त्यांच्याप्रति समाजमनातील स्थान अत्यंत आदराचे आणि स्नेहाचे होते. इतिहासाच्या पानावर गुरूचे स्थान अनन्यसाधारण असल्याचा इतिहास आहे. जीवनाची उन्नती दर्शवणारा जो कोणी असेल, तो गुरू असतो. जीवनातील अंधकाराची वाट नष्ट करतो त्याला गुरू म्हणतात. जीवनात जो समृद्धतेची वाट दाखवतो त्याला गुरू म्हणतात. अलीकडे शिक्षकाला गुरू म्हणण्याची परंपरा लोप पावत चालली आहे. तसे का घडते आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. गुरूजी या शब्दातील भाव आणि त्यातील अर्थ हरवत चालला आहे. तसेच जी माणसे त्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्यांना तरी आपल्याला गुरूजी म्हणावे असे कोणाला खरच वाटते का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. गुरूजी हा शब्दाला खोलवर अर्थ आहे. गुरूजी होण्यासाठी आपल्याकडे काय हवे? तर त्यासाठी अनुभवाची समृद्धता हवी. ज्ञानाची साधना हवी. स्वतःच्या कामाबद्दल नितांत प्रेम हवे. एकदा एक व्यक्ती विनोबांकडे गेली आणि ती व्यक्ती विनोबांना म्हणाली की, मला शिक्षक व्हायचे आहे. त्याची ही इच्छा ऐकल्यावर विनोबांनी त्याला विचारले की, तुला स्वयंपाक करता येतो का? तुला शर्टला बटन लावता येते का? तुला शेती करता येते का? मात्र यातील काहीच येत नव्हते. कारण शिक्षक होण्यासाठी ज्या गोष्टी हव्या असतात, त्यात पदवी हवी असते. अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनाची प्रक्रिया यायला हवी असते. बोलता यायला हवे. हे त्या विद्यार्थ्याला माहित होते; पण विनोबांनी जे काही विचारले ते शिक्षक होण्यासाठी आवश्यक आहे हे त्या विद्यार्थ्यांला गरजेचे आहे असे त्याला वाटले नाही. शिक्षक होण्यासाठी केवळ पदवी उपयोगाची नसते, तर त्या बरोबर जीवन अनुभवाची गरज असते. तो अनुभव तर प्रत्यक्ष कृती केल्यानेच मिळतो. त्यामुळे विनोबांनी जीवनासाठी ज्या गोष्टी यायला हव्यात त्या दृष्टीने प्रश्न विचारले होते; मात्र त्या अनुभवाची वाट चालण्याची गरज विनोबा अधोरेखित करत होते. अनुभवाशिवाय आपल्याला शिक्षक होता येत नाही, हे सतत लक्षात ठेवायला हवे.समर्थ रामदास स्वामीदेखील आपल्या दासबोधात तोच विचार प्रतिपादन करत आहेत. ते त्या संदर्भाने लिहितात...
प्रचितवीण वैद्य म्हणवी। उगीच करी उठाठेवी ।
तया मुर्खाला गोवी । प्राणीमात्र
समाजात एखादी व्यक्ती असते आणि ती वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही, ज्याला त्या संदर्भातील कोणताही अनुभव नाही आणि उगीच स्वतःला वैद्य म्हणवून घेतो आणि नको ती उठाठेव करतो, असा माणूस एकतर मूर्ख असतो आणि मग अशा मूर्खाला इतर लोक संकटात गोवतात. याचे कारण केवळ आपण वैद्य आहोत असे म्हणून त्याला कोणी वैद्य म्हणत नाही. त्यासाठी त्याच्याकडे वैद्याचे ज्ञान हवेच, त्याप्रमाणे त्यासंदर्भातील अनुभव देखील हवा असतो. वैद्यकीय पदव्या घेतलेली माणसे जितकी महत्त्वाची असतात, तितकेच महत्त्व त्या क्षेत्रातील अनुभव किती आहे हे देखील महत्त्वाचे मानले जाते.
अनुभवाशिवाय शिक्षण
शिक्षणात माणसाला पदव्या घेऊन जितके शिक्षण कळणार नाही, त्यापेक्षा अधिक शिक्षण हे त्या क्षेत्रात कार्यरत राहिल्यानंतर जे अनुभव येतात त्या अनुभवाने शिक्षक अधिक समृद्ध होत असतो. मुलांचे मानसशास्त्र पुस्तकातून तुम्ही जे शिकतात, त्या माहितीने फार काही हाती लागत नाही, त्याने तुम्हाला फारतर माहिती मिळेल; पण प्रत्यक्षात त्या माहितीचा परिणाम शिकण्यावर आणि शिकवण्यावर कसा होतो हे समजून घ्यायचे असेल, तर शाळा-महाविद्यालयातील अध्ययन-अध्यापनातील अनुभवांची अधिक गरज आहे. अन्यथा आपला प्रवास शिक्षक म्हणून घडत गेला, तरी ती वाट समृद्धतेची असणार नाही. त्या पदवीमुळे आपण फारतर शिक्षक होऊ; पण आदर पात्र शिक्षक होण्याची शक्यता कमी आहे. तेथे अनुभवाशिवाय काही चालत नाही आणि चालण्याचा प्रयत्न केला, तर माहितीने केलेल्या उपचाराचा परिणाम रुग्णावर फारसा होणार नाही. माहिती पुस्तकात असते आणि अर्थ अनुभवाच्या प्रक्रियेत दडलेला असतो. अनुभवाशिवाय असलेल्या माहितीने युक्ताला लोक त्याला मूर्ख म्हणतील. त्याप्रमाणे शिक्षणातही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुभवाचा विचार जीवनातील प्रत्येक क्षेत्रात माहितीसोबत अधिक महत्त्वाची गरज असते ती अनुभवाची. तो विचार समर्थांचा आपण समजून घेत प्रवास केला, तर आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची वाट अधिक समृद्ध होत जाईल.
साच हाहि विचार । प्रत्यये करावा निर्धार
प्रत्ययें नस्तां अंधकार । गुरुशिष्यांसी
जीवनातील कोणत्याही क्षेत्राविषयी अनुभव याबाबतही असाच प्रकार असतो. अनुभव घेऊन काही निर्णय घ्यावा लागतो. अनुभव नसेल तर गुरू आणि शिष्य दोघेही अज्ञानरूपी अंधारात चाचपडत राहतात. त्यामुळे गुरू जितका अनुभवसंपन्न असेल, तितका शिष्यही उत्तम निपजण्याची शक्यता अधिक आहे. गुरू अनुभवसंपन्न असेल, तर शिष्याची साधनेची वाट अधिक सुलभ होण्याची शक्यता अधिक आहे.
Related
Articles
किरकोळ महागाई दर ३.४ टक्क्यांवर
14 Apr 2026
ममतांच्या दहशतीला नागरिक मतांनी उत्तर देतील : शहा
14 Apr 2026
आशा भोसले यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन होणार
14 Apr 2026
आंबा उत्पादक शेतकर्यांना मदत करा
10 Apr 2026
आपच्या खासदारावर ईडीचे छापे
15 Apr 2026
डोनाल्ड ट्रम्प, व्हान्स आणि हेगसेथ हे तर समुद्री चाचे...
15 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
चाळीस दिवसांनंतर इराकचे आकाश पुन्हा खुले
4
सावध पवित्रा (अग्रलेख)
5
अवकाळीचा असह्य फटका
6
महागाई उंबरठ्यावर!