E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
‘व्यसन’ समाजमाध्यमांचे..
Wrutuja pandharpure
05 Apr 2026
मंजिरी ढेरे
डिजिटल युगात ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्स ही केवळ संवादाचे माध्यम राहिलेली नाहीत, तर किशोरांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि वर्तनावर ते खोलवर परिणाम करतात. त्यामुळे युवा पीढी समाज माध्यमांच्या ‘व्यसना’त अडकत आहे.सरकार किंवा न्यायव्यवस्था या मंचांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत ,त्याकडे सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे.
ऑस्ट्रेलियाने देशातील मुला-मुलींच्या समाज माध्यमाच्या (‘सोशल मीडिया’) वापरावर मर्यादा आणण्यासाठी निर्बंध लागू केले. ब्रिटनही सध्या एक पथदर्शक कार्यक्रम राबवत आहे. त्यात 16 वर्षांखालील मुलांसाठी ‘सोशल मीडिया’वर बंदी कितपत प्रभावी ठरू शकते, याचा अभ्यास केला जात आहे. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील न्यायालयात ’मेटा’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या कंपनीच्या दीर्घकाळ चालत आलेल्या धोरणाचा आधार घेतला. त्यात 13 वर्षांखालील वापरकर्त्यांना त्यांच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र काही अंतर्गत संशोधन आणि कागदपत्रे सादर करण्यात आली, तेव्हा त्यातून लहान मुले या प्लॅटफॉर्मचा वापर करत होती, हे स्पष्ट झाले.
‘यूट्युब’ या व्हिडीओ-शेअरिंग वेबसाइटचे मालक म्हणून ‘गूगल’देखील या प्रकरणात प्रतिवादी होते, तरीही खटल्यातील बहुतेक सुनावणी इंस्टाग्राम आणि मेटावर केंद्रित राहिली. या प्रकरणात सुरुवातीला स्नॅप इंक आणि टिकटॉकचाही समावेश होता; मात्र दोन्ही कंपन्यांनी खटल्यापूर्वीच काही अटींवर समझोता केला. मुलांवर या समाजमाध्यमांच्या दुष्परिणामांबाबत मेटा आणि इतर ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्सविरोधात आणखी एक खटला जून महिन्यात कॅलिफोर्नियामधील न्यायालयात सुरू होणार आहे.
‘सोशल मीडिया’ च्या अनियंत्रित वापरामुळे किशोरांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे हे गेल्या काही वर्षांमध्ये हे स्पष्ट झाले आहे. नैराश्य, चिंता, आत्मसन्मानात घट आणि आत्महत्येच्या प्रवृत्तींमध्ये वाढ यासारखे गंभीर प्रश्न याच्याशी संबंधित आहेत. आभासी जगात ‘लाइक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ मिळवण्याच्या स्पर्धेमुळे वास्तविक जीवनातील मूल्ये मागे पडली आहेत. किशोरवयीन मुले स्वतःच्या मूल्यांचे मोजमाप डिजिटल निकषांवर करू लागले आहेत, ही अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.
याशिवाय, सायबर छळ (सायबर बुलिंग), बनावट बातम्या (फेक न्यूज) आणि अश्लील किंवा हिंसक आशय सहज उपलब्ध असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अशा प्रकारच्या आशयाचे योग्य मूल्यांकन करण्याइतकी परिपक्वता किशोरांमध्ये नसते. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांवर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील सामग्रीचे प्रभावी नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी येते; मात्र आतापर्यंत या कंपन्यांनी नफ्याला प्राधान्य देत ही जबाबदारी गांभीर्याने पार पाडलेली दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील ज्यूरीने ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मच्या घातक परिणामांमुळे त्रस्त झालेल्या केली नावाच्या एका तरुणीच्या बाजूने दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे जगभरातील पालकांना दिलासा मिळाला आहे. मेटा, यूट्युब यांसारख्या प्लॅर्टफॉर्मवर 56 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका तरुणीने मेटा आणि यूट्यूबवर आरोप केला होता, की त्यांच्या प्लॅटफॉर्ममुळे तिला ‘सोशल मीडिया’चे घातक व्यसन लागले. तथापि, आतापर्यंत या कंपन्या स्वतःला केवळ ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म असल्याचे सांगत, सामग्रीसाठी आपण जबाबदार नसल्याचे प्रतिपादन करत आल्या होत्या; मात्र न्यायालयात वकिलांनी पीडितेच्या बाजूने युक्तिवाद करताना, वापरकर्ते ‘सोशल मीडिया’ व्यसनाचे बळी ठरतील अशा प्रकारे जाणीवपूर्वक असे प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन केले. 20 वर्षांच्या केलीच्या वकिलांचा युक्तिवाद ज्यूरीने मान्य केला, की या व्यसनामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. ज्यूरीने ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मचे दावे नाकारत मेटा आणि यूट्यूबला 60 लाख अमेरिकन डॉलर, म्हणजेच सुमारे 56 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. ज्यूरीने असेही नमूद केले, की ‘गूगल’ आणि ‘मेटा’ने आपल्या नफ्याच्या उद्देशाने या प्लॅटफॉर्मच्या संचालनात अनुचित पद्धतींचा अवलंब केला असून, ते अनैतिक आहे.
केवळ दहा वर्षांची असताना केलीला चिंता आणि नैराश्याची लक्षणे जाणवू लागली. त्यावर अनेक वर्षांनंतर उपचार करण्यात आले. तिने आपल्या दिसण्याबाबतही अतिविचार सुरू केला आणि इंस्टाग्रामवरील असे फिल्टर्स वापरू लागली, जे तिचा चेहरा बदलून दाखवत होते. हे सर्व तिने अगदी लहान वयात प्लॅटफॉर्म वापरण्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच सुरू केले होते. तिच्या वकिलांनी युक्तिवाद केला, की इंस्टाग्राममधील अखंड स्क्रोलिंग जाणीवपूर्वक व्यसनाधीन बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आले होते. ‘मेटा’ने हे प्लॅटफॉर्म अशा प्रकारे तयार केले, की तरुण वापरकर्ते त्यांचा जास्तीत जास्त वापर करतील. या निर्णयानुसार दंडाच्या रकमेपैकी 70 टक्के रक्कम ‘मेटा’ने आणि 30 टक्के रक्कम ‘गूगलने भरायची आहे.
जगभरात या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मविरोधात हजारो खटले सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यात अशा अनेक कुटुंबांचाही समावेश आहे, ज्यांच्या मुलांनी ‘सोशल मीडियाच्या व्यसनामुळे टोकाचे पाऊल उचलले आहे. ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पालक आपल्या मुलांना या व्यसनापासून वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. एवढेच नव्हे, तर अमेरिकेमध्येही विविध न्यायालयांमध्ये मुलांना ‘सोशल मीडिया’च्या दुष्परिणामांपासून संरक्षण देण्यासाठी शेकडो खटले दाखल आहेत. मात्र दोषी ठरवलेल्या ‘सोशल मीडिया’ कंपन्यांचे प्रतिनिधी या निर्णयाशी असहमती दर्शवत असून त्याविरोधात अपील करण्याची तयारी दर्शवत आहेत. ‘सोशल मीडिया’ कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या मते किशोरांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि त्यासाठी केवळ ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना जबाबदार धरणे योग्य नाही. यूट्यूबच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे की त्यांचा प्लॅटफॉर्म हा सोशल मीडिया साइट नसून फक्त व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे, तर पीडित तरुणीच्या वकिलांच्या मते मेटा आणि इतर कंपन्यांनी प्लॅटफॉर्मची रचना अशी केली आहे, की किशोरांना त्याचे व्यसन लागावे.
प्रत्यक्षात भारतासह जगभरातील कोट्यवधी किशोर या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यामुळेच काही आठवडे चाललेल्या या खटल्यादरम्यान मोठ्या संख्येने पालक न्यायालयात पीडितेच्या बाजूने उभे राहिले. या निर्णयापूर्वी न्यू मेक्सिको येथेही एका न्यायालयाने ‘मेटा’ला जबाबदार धरले होते. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रौढांसाठी असलेली सामग्री मुलांपर्यंत पोहोचत होती. भारतासह अनेक देशांमध्ये ‘सोशल मीडिया’मुळे मुलांवर होणार्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त होत आहे; मात्र भारतात यासंदर्भात नियामक कायदा नसल्याने प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला पोहोचणारे धोके पाहता पालकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळेच जगातील अनेक विकसित देशांमध्ये मुलांना ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्सपासून दूर ठेवण्यासाठी कायदे केले जात आहेत. ऑस्ट्रेलियानंतर फ्रान्स आणि इतर युरोपीय देशही या दिशेने पुढाकार घेत आहेत, जेणेकरून ठराविक वयानंतरच मुलांना ‘सोशल मीडिया’ वापरण्याची परवानगी मिळेल. तसेच भारतातही घडणे आवश्यक आहे.
Related
Articles
महिलांच्या सुरक्षेसाठी ‘वन स्टॉप सेंटर’ ठरतेय आधार, 1 हजार 411 महिलांना मिळाली मदत
14 Apr 2026
अप्रत्यक्ष वरदहस्त...
13 Apr 2026
विकास दर ६.९ टक्के राहील
11 Apr 2026
पुणे पालिकेच्या बायोगॅस प्रकल्पासाठी एजंटांची चढाओढ
14 Apr 2026
संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर पुन्हा कारवाई; ९५० किलो गोमांस जप्त
15 Apr 2026
भोसरी एमआयडीसीत अंतर्गत बस सेवेची मागणी
13 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
शेअर बाजाराची उसळी; निर्देशांक दोन हजारांनी वाढला
4
कैलाश सत्यार्थी यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’
5
चाळीस दिवसांनंतर इराकचे आकाश पुन्हा खुले
6
सावध पवित्रा (अग्रलेख)