तामिळनाडूची निवडणूक नव्या मानसिकतेची   

राज्यरंग , राही भिडे 

तामिळनाडूची निवडणूक एकाच वेळी अनेक स्तरांवर लक्षात घ्यावी लागते. हे स्तर म्हणजे सामाजिक, भावनिक, तांत्रिक आणि संघटनात्मक. या सर्व स्तरांवर संतुलन साधणारा पक्षच अंतिम विजयाच्या जवळ जाईल. सध्या द्रमुक आघाडी या संतुलनात पुढे दिसत असली, तरी अण्णाद्रमुक-भाजप युतीचे प्रयत्न आणि ‘तमिळगा वेट्री कळघम’चा उदय हे चित्र शेवटच्या टप्प्यात बदलू शकतात.
 
तामिळनाडूच्या राजकारणात निवडणुकीपूर्वी दिसणारी एक वेगळीच हालचाल लक्षवेधी ठरत आहे. ती म्हणजे उघड संघर्षाच्या आड दडलेली ‘व्यूहात्मक एकजूट’. वरकरणी पक्ष परस्परांविरुद्ध उभे असले, तरी त्यांच्या राजकीय हालचालींमध्ये एक प्रकारचा समन्वय किंवा किमान परस्परसमज दिसून येतो. यामुळेच तामिळनाडूचे राजकारण इतर राज्यांप्रमाणे निवडणुकीनंतरच्या आघाड्यांवर आधारित नसून निवडणुकीपूर्वी ठरलेल्या समीकरणांवर चालते, हे पुन्हा अधोरेखित होते.
 
येथे निवडणुकीपूर्वीच बहुमताची पायाभरणी होते; मात्र गेल्या दशकात भाजपच्या राष्ट्रीय उदयानंतर या पारंपरिक चौकटीत तडे पडू लागले आहेत. भाजप या राज्यामध्ये केवळ एक सहयोगी पक्ष म्हणून मर्यादित राहण्याऐवजी, स्वतःला द्रविडीयन पक्षांना पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची व्यूहरचना बहुपदरी आहे. ती म्हणजे एका बाजूला अण्णाद्रमुकशी युती करून सत्ताविरोधी मतांचे एकत्रीकरण तर दुसर्‍या बाजूला त्या पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर प्रभाव टाकत स्वतःची जागा निर्माण करणे. ही भूमिका पारंपरिक आघाडी राजकारणापेक्षा वेगळी आणि अधिक हस्तक्षेप करणारी आहे. 
 
या पार्श्‍वभूमीवर अभिनेते विजय यांच्या ‘तमिळगा वेट्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाचा झालेला उदय हा केवळ एक नवीन पर्याय नसून, संपूर्ण राजकीय समीकरणात ‘अनिश्‍चिततेचा घटक’ म्हणून समोर येतो. विजय यांनी स्वतःची द्रमुकविरोधी प्रतिमा तयार केली आहे; पण त्याच वेळी त्यांनी अण्णाद्रमुकपासूनही अंतर राखले आहे. ही भूमिका वरकरणी स्वतंत्र वाटत असली, तरी व्यापक ‘सामयिक शत्रू’ या रणनीतीशी सुसंगत दिसते. भाजप, अण्णाद्रमुक, टीव्हीके, अम्मा मक्कल मुनेत्र कळघम या पक्षांना एकत्र आणणारा धागा म्हणजे द्रमुकविरोध. या सर्व घटकांची वैचारिक किंवा राजकीय भूमिका वेगळी असली, तरी द्रमुकला रोखणे हा एक समान उद्देश त्यांना जवळ आणतो; मात्र ही एकजूट दीर्घकालीन आहे की निवडणुकीपुरती मर्यादित, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. द्रमुकनेही वेगळ्या पद्धतीने याच तत्त्वाचा वापर केला आहे. भाजपविरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी त्यांनी ‘सांस्कृतिक आणि वैचारिक संघर्षा’चा मुद्दा पुढे केला आहे. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक स्वतःला तामिळ अस्मितेचा, सामाजिक न्यायाचा आणि संघराज्यीय अधिकारांचा रक्षक म्हणून सादर करतो. काँग्रेस, व्हीसीके, भाकप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट  अशा पक्षांना सोबत घेऊन त्यांनी एक व्यापक ‘धर्मनिरपेक्ष प्रगतिशील आघाडी’ उभी केली आहे. या आघाडीचा गाभा केवळ राजकीय नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडलेला आहे. यामध्ये एक विरोधाभासही दिसून येतो. 
 
आज भाजप द्रमुकविरोधी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी तिच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल सहयोगी पक्षांमध्ये शंका आहे. अण्णाद्रमुक, एएमएमके किंवा टीव्हीके हे द्रमुकविरोधी भूमिकेत एकत्र येऊ शकतात; पण भाजपच्या व्यापक सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमाबद्दल ते पूर्णपणे आश्‍वस्त नाहीत. त्यामुळे ‘सामायिक शत्रू’ आणि ‘राजकीय मित्र’ यांच्यातील सीमारेषा सतत बदलत राहते.या संपूर्ण प्रक्रियेत मतदार हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो.‘कोण कोणाच्या विरोधात आहे’ यापेक्षा ‘कोण कोणासोबत का आहे’ हा प्रश्‍न त्याच्या निर्णयात अधिक महत्त्वाचा ठरतो. 
 
तामिळनाडूचे राजकारण वरकरणी द्रविडी विचारसरणीवर आधारित असले, तरी त्याच्या पायाभूत रचनेत सामाजिक गणित खोलवर रुजलेले आहे. वन्नियार, थेवर, गौंडर, दलित असे समाजघटक केवळ सांख्यिकदृष्ट्या महत्त्वाचे नाहीत, तर त्यांची भौगोलिक मांडणीही निवडणुकीचे चित्र ठरवते. त्यामुळे द्रमुक असो किंवा अण्णाद्रमुक; प्रत्येक पक्ष उमेदवार निवडताना, आघाड्या करताना आणि प्रचार करताना या सामाजिक संरचनेचा बारकाईने विचार करतो. ‘पट्टली मक्कल कच्ची’ सारख्या पक्षांची भूमिका इथे निर्णायक ठरते, कारण ते विशिष्ट समाजघटकांना एकत्र करून मोठ्या आघाड्यांच्या गणिताला दिशा देतात. अशा परिस्थितीत ‘मतदार’ हा एकसंध घटक नसून अनेक ओळखींचा समूह बनतो आणि राजकारण त्या प्रत्येक ओळखीशी स्वतंत्र संवाद साधू लागते. या पारंपरिक सामाजिक समीकरणांमध्ये जोडला गेलेला एक नवा स्तर म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव. विजय आणि कमल हसनसारख्या कलाकारांनी राजकारणात प्रवेश करून ‘फॅनबेस’ला थेट राजकीय भांडवलात रूपांतरित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांनी याच मार्गाने सत्ता मिळवली होती; मात्र आज सर्वच नेत्यांचा प्रभाव केवळ सभांपुरता मर्यादित नाही, तर ‘सोशल मीडिया’वर, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि युवकांच्या मानसिकतेत खोलवर पोहोचला आहे. त्यामुळे मतांच्या थेट गणितात त्यांचा किती परिणाम होईल, हे सांगणे कठीण असले, तरी निवडणुकीचे ‘नॅरेटिव्ह’ बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे. 
 
द्रमुकसारखे पक्ष ‘नॅनो-इन्फ्लुएन्सर’ वापरून अशा मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. ते पारंपरिक राजकीय चर्चेत सहभागी होत नाहीत. कॉलेज जीवन, स्थानिक समस्या, विनोद किंवा मीम्स यांच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश अधिक विश्‍वासार्ह वाटतो, कारण तो प्रचारासारखा वाटत नाही. ही पद्धत विशेषतः युवा मतदारांमध्ये प्रभावी ठरते आणि त्यामुळे निवडणूक केवळ मैदानावरच नव्हे, तर मोबाईल स्क्रीनवरही लढली जात आहे; मात्र  द्रमुक सरकारविरुद्ध काही प्रमाणात नाराजी आहे. अण्णाद्रमुक-भाजप युती हीच नाराजी एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे; पण ही नाराजी ‘लाट’ बनते का, हा निर्णायक प्रश्‍न आहे. कारण राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे द्रमुकचे मतदारांशी थेट लाभाचे नाते तयार झाले आहे. मोफत बसप्रवास, आर्थिक सहाय्य या योजनांमुळे मतदारांच्या दैनंदिन जीवनात बदल झाला आहे आणि त्यामुळे नाराजी असूनही मतदार निर्णय घेताना अधिक सावध बनतो. तमिळनाडूमध्ये भाषा हा केवळ संवादाचा विषय नाही, तर ओळखीचा केंद्रबिंदू आहे. स्टॅलिन यांनी हिंदीविरोधी भूमिकेला ‘तामिळ अस्मिते’शी जोडले. हा मुद्दा केवळ राजकीय नसून भावनिक आहे आणि मतदारांना एकत्र आणण्याची क्षमता ठेवतो. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात प्रादेशिक अभिमान उभा करण्याची ही रणनीती द्रमुकसाठी दीर्घकाळापासून प्रभावी ठरली आहे. 
 
काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट , व्हीसीके यांसारख्या पक्षांसोबत द्रमुकने मजबूत आघाडी उभी केली आहे, तर अण्णाद्रमुकने भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. जागावाटप हे फक्त आकड्यांचे गणित नसून स्थानिक प्रभाव, जातीय समीकरणे आणि उमेदवारांची ताकद यावर आधारित असते. चुकीचे वाटप झाले, तर मतांचे विभाजन होऊन पराभव ओढवू शकतो. योग्य वाटप झाले, तर कमी मतांनीही विजय मिळवता येतो. अर्थात पारंपरिक प्रचाराची ताकद अजूनही कमी झालेली नाही. ई. पलानीस्वामींसारखे नेते राज्यभर दौरे करत आहेत, कारण शेवटी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क निर्णायक ठरतो. कार्यकर्त्यांचे जाळे, स्थानिक पातळीवरील संघटन आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढण्याची क्षमता या बाबी अजूनही निवडणुकीचा कणा आहेत. त्यात जो यशस्वी होईल, त्याची सत्ता येईल.                        

Related Articles