‘बीबीसी’चा नवा सारथी!   

चर्चेतील चेहरे , राहुल गोखले 

शंभरहून जास्त वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि जगभरात नामांकित व प्रतिष्ठित वृत्तसंस्था असा लौकिक मिळवलेल्या ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ म्हणजेच बीबीसीला अलीकडच्या काळात मात्र अनेक वादंगांनी घेरले आहे. मग ते बाल शोषण आणि अश्लील छायाचित्रे बाळगल्याचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक ह्यू एडवर्ड्स यांचे प्रकरण असो; किंवा बीबीसी थेट प्रक्षेपण करीत असताना ’ग्लास्टनबरी’ उत्सवादरम्यान बॉब वायलन या पॉप गायकाने इस्रायली लष्कराच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीचे प्रकरण असो; यांमुळे बीबीसीच्या प्रतिमेला तडा गेला यात शंका नाही. 
 
मात्र बीबीसीवर सर्वांत नामुष्कीचा प्रसंग आला तो ऑक्टोबर 2024 मध्ये प्रसारित झालेल्या ’पॅनोरमा’च्या एका भागात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 6 जानेवारी 2021 च्या भाषणातील दोन वेगळ्या क्लिप्स एकत्र जोडून करण्यात आलेल्या प्रसारणामुळे. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना थेट हिंसाचारासाठी चिथावणी दिली असा अर्थ त्यातून ध्वनित होत होता. ट्रम्प यांनी  मानहानीचा दावा केला आणि बीबीसीमधील उच्चपदस्थांना त्याची किंमत मोजावी लागली. त्या गंभीर संपादकीय चुकीमुळे बीबीसीचे महासंचालक टिम डेव्ही आणि वृत्तविभाग प्रमुख डेबोरा टर्नेस यांना नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
 
त्यानंतर डेव्ही यांच्या उत्तराधिकार्‍याचा शोध सुरु होता. अखेरीस ती माळ मॅट ब्रिटिन यांच्या गळ्यात पडली आहे. ब्रिटिन यांना विविध कार्यक्षेत्रांचा अनुभव असला तरी बीबीसीचा गाभा असणार्‍या संपादकीय व वार्तांकन क्षेत्राचा अनुभव बिलकुल नाही. तेव्हा त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. येत्या 18 मे रोजी ते प्रत्यक्षात ती धुरा स्वीकारणार असल्याने त्या शंकांतून फारसे काही निष्पन्न होणार नसले तरी ब्रिटिन यांच्यासमोरील आव्हाने पाहता त्यांच्या नेतृत्वगुणांचा कस लागणार आहे हे निःसंशय.
 
1 सप्टेंबर 1968 रोजी सरे मधील वॉल्टन-ऑन-थेम्स येथे जन्मलेले ब्रिटिन यांचे शिक्षण हॅम्पटन स्कूलमध्ये झाले; तर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या रॉबिन्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबातून विद्यापीठात जाणारे ते पहिलेच होते. 1990 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि 1997 मध्ये लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापन शाखेची पदवी संपादन केली. नौकानयन या क्रीडाप्रकाराची त्यांना प्रचंड आवड होती आणि केवळ छंद म्हणून न जोपासता त्यांनी व्यावसायिक स्पर्धांत देखील भाग घेतला. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात ’कॉनेल विल्सन’ येथे चार्टर्ड सर्व्हेअर म्हणून झाली. त्यानंतर ते ’मॅककिन्से अँड कंपनी’मध्ये सहा वर्षे सल्लागार पदी होते.  ब्रिटिन यांनी 2004 मध्ये ’ट्रिनिटी मिरर’ या प्रसिद्ध माध्यम समूहात व्यावसायिक संचालक म्हणून प्रवेश केला. हा समूह ब्रिटनमधील लोकप्रिय दैनिक ’द डेली मिरर’ चे प्रकाशन करतो. दोन वर्षे यशस्वी काम केल्यानंतर 2006 मध्ये त्यांची ’डायरेक्टर ऑफ स्ट्रॅटेजी अँड डिजिटल’ या महत्त्वाच्या पदावर पदोन्नती झाली. या काळात त्यांनी वृत्तपत्राच्या डिजिटल परिवर्तनात आणि धोरणात्मक नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कदाचित माध्यमांशी आलेला त्यांचा तो एकमात्र संबंध असावा. अर्थात त्याची तुलना बीबीसीशी करता येणार नाही हा भाग निराळा. 
 
ब्रिटिन यांची खरी ओळख निर्माण झाली ती गुगलमधील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे. 2007 मध्ये गुगलमध्ये प्रवेश केल्यापासून ते नेतृत्वाच्या अनेक पायर्‍या चढले.  2009 मध्ये ते ’गुगल’च्या ब्रिटन क्षेत्रासाठीचे व्यवस्थापकीय संचालक बनले आणि 2014 मध्ये त्यांच्याकडे युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका या अवाढव्य प्रदेशाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. गुगलला युरोपीय बाजारपेठेत मजबूत करण्यात आणि ’ग्रो विथ गुगल’ सारख्या उपक्रमांद्वारे लाखो लोकांना डिजिटल साक्षर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
 
ब्रिटिन यांच्या कारकिर्दीतील सर्वात वादग्रस्त प्रसंग 2012-13 दरम्यानच्या कर प्रकरणाशी संबंधित आहे. 2016 मध्ये गुगलने ब्रिटनमधील दहा वर्षांच्या थकीत करापोटी 13 कोटी पाउंड भरण्याची तयारी दर्शविली होती; परंतु कंपनीचा अफाट नफा पाहता ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप झाला. या पार्श्वभूमीवर ब्रिटिन यांना संसदेच्या लोकलेखा समितीसमोर चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. सुनावणी दरम्यान समितीच्या अध्यक्षा मेग हिलियर यांनी जेव्हा त्यांना त्यांचा वैयक्तिक पगार विचारला तेव्हा ब्रिटिन यांनी प्रथम हा प्रश्न चौकशीशी संबंधित नसल्याचा पवित्रा घेतला, मात्र अध्यक्षांनी आपला आग्रह कायम ठेवला; तेंव्हा निरुत्तर झालेले ब्रिटिन यांनी ‘माझ्याकडे सध्या तो आकडा उपलब्ध नाही’ असे अजब उत्तर दिले. त्यावर समितीच्या बैठकीत जरी हशा पिकला तरी बाहेर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या संपूर्ण वादामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या कशा चलाखपणे कर टाळतात यावर ब्रिटनमध्ये मोठा खल झाला आणि त्यातूनच ’गुगल टॅक्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवीन कर संरचनेचा जन्म झाला. जवळपास दोन दशके गुगलमध्ये महत्त्वाची पदे भूषवल्यानंतर मॅट ब्रिटिन यांनी गेल्या वर्षी (2025) कंपनीतून निवृत्ती घेतली आणि एका छोट्या विश्रांतीचा आनंद लुटला. या मोकळ्या वेळेत आपण दाढी वाढवली; स्वतःसाठी एक ’स्कलिंग बोट’ खरेदी केली आहे; तसेच आपला मुलगा जेव्हा प्रशिक्षक म्हणून पात्र होईल, तेव्हा त्याच्याकडून ’स्कूबा डायव्हिंग’ शिकण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी म्हटले होते. व्यावसायिक आघाडीवर ते गेल्या वर्षी ’गार्डियन मीडिया ग्रुप’चे कार्यकारी संचालक नियुक्त झाले; अर्थात आता त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आहे.  ते ’मीडिया ट्रस्ट’ आणि ’द क्लायमेट ग्रुप’मध्ये विश्वस्त होते तसेच ’सॅलिसबरी’ या सुपरमार्केट साखळीचे बिगर-कार्यकारी संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. आता 57 वर्षांच्या मॅट ब्रिटिन यांच्या खांद्यावर बीबीसीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी येऊन पडली आहे; आणि तीही अशावेळी जेंव्हा बीबीसीसमोर अनेक आव्हाने आहेत. तेंव्हा ब्रिटिन यांना उसंत न घेता लगेच कामाला हात घालावा लागेल. त्यांना सर्वाधिक अनुभव आहे तो तंत्रज्ञान क्षेत्राचा. बीबीसीच्या प्रमुखपदाला ते न्याय देऊ शकतील हा प्रश्न उपस्थित होतो तो त्यामुळेच.
 
ब्रिटिन यांच्या नियुक्तीमुळे बीबीसीच्या वर्तुळात संमिश्र भावना आहेत. 20000 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांचे नेतृत्व करताना ब्रिटिन यांना केवळ तांत्रिक प्रगतीवर भर देऊन चालणार नाही’ तर बीबीसीच्या सार्वजनिक सेवा प्रसारक संस्था (पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग) या मूळ गाभ्याशी प्रतारणा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. बीबीसी ही मुळात एक पत्रकारिता प्रधान संस्था आहे. ब्रिटिन यांच्याकडे पत्रकारितेचा कोणताही अनुभव नाही. बीबीसीचा महासंचालक हा केवळ प्रशासकीय प्रमुख असून चालत नाही. तेंव्हा ते ही जबाबदारी कशी पार पडतात याकडे सर्वांचे व विशेषतः बीबीसीमधील पत्रकारांचे लक्ष असेल. कदाचित त्यामुळेच संपादकीय अनुभवाची ही पोकळी भरून काढण्यासाठी ब्रिटिन तातडीने एका अनुभवी ’उपमहासंचालकाची’ नियुक्ती करतील अशी अपेक्षा आहे. ते या पदावर पत्रकारितेतील दांडगा अनुभव एखाद्या महिलेची नियुक्ती करू शकतात अशीही चर्चा आहे. त्याचे एक कारण असेही आहे की डेव्ही यांच्या राजीनाम्यानंतर बीबीसीच्या शतकभराच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला महासंचालक पदाचा मान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. या सर्वोच्च पदासाठी प्रामुख्याने लेक्स महोन (चॅनेल 4 च्या माजी सीईओ) आणि बीबीसीच्या शार्लोट मूर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. तेंव्हा संपादकीय बाजू भक्कम करण्याबरोबरच महासंचालक निवडीत झालेल्या लिंगभाव असमानतेच्या टीकेलाही चोख उत्तर देणारा निर्णय ब्रिटिन घेऊ शकतात.
 
त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल ते म्हणजे फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांनी दाख्खल केलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या मानहानीच्या दाव्याला कायदेशीर प्रत्युत्तर देण्याचे. त्यांच्यासमोरील दुसरे आव्हान आहे ते 2027 मध्ये बीबीसीच्या ’रॉयल चार्टर’ नूतनीकरणाचे. हे ‘चार्टर’ म्हणजे बीबीसीची ’घटना’च. सरकारशी या वाटाघाटी आणि परवाना शुल्क यावर उभयपक्षी मान्य असणारा तोडगा काढणे हे त्यांच्यासाठी कठीण आव्हान असेल. एकट्या ब्रिटनमध्ये 2 कोटींहून अधिक लोक नियमितपणे बीबीसी पाहतात. मात्र तरुण पिढी आता नेटफ्लिक्स आणि यूट्यूबकडे वळत आहे. तेंव्हा डिजिटल स्पर्धा आणि प्रेक्षक टिकवणे हेही मोठे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. संस्थेची गुणवत्ता आणि नैतिक विश्वासार्हता यांच्याशी कोणतीही तडजोड न करता बीबीसीला आर्थिक टंचाईतून बाहेर काढणे ही त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरेल.
 
दूरचित्रवाणीच्या मूल्यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवल्याचा दावा ब्रिटिन करत असले तरी बीबीसीच्या महासंचालकपदाच्या खुर्चीवर बसून ती मूल्ये टिकवणे ही त्यांची खरी अग्निपरीक्षा असेल. मॅथ्यू वॉकर यांच्या ’व्हाय वुई स्लीप’ या पुस्तकावर त्यांची नितांत श्रद्धा असली आणि झोपेच्या उपचारात्मक सामर्थ्यावर त्यांचा विश्वास असला तरी बीबीसीच्या या वादळी प्रवासात आता त्यांना आपली ’झोप’ विसरावी लागेल. बीबीसीसमोरील आव्हानांच्या लाटा पाहता मॅट ब्रिटिन यांना केवळ प्रशासकीय चातुर्यच नव्हे; तर त्यांच्या अंगी असलेले नौकानयनाचे व्यावसायिक कसब आणि जिद्द पणाला लावावी लागेल.

Related Articles