E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
राम गावा राम ध्यावा
Wrutuja pandharpure
29 Mar 2026
येते मनात काही , प्रतिभा कणेकर
सहज कॅलेंडर बघत होते. यंदा रामनवमी 26 मार्चला आहे, मनानं नोंद घेतली, अन नकळत मन भूतकाळात गेले. माझ्या माहेरी रोज रात्री निजण्यापूर्वी सर्वांनी एकत्र बसून रामरक्षा म्हणण्याची पद्धत होती. आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम आम्हाला देतो हे समर्थांचे पद बाबांच्या सुरेल आवाजात नेहमी कानावर पडायचे. ग. दि. माडगूळकर आणि बाबूजींचे ‘गीतरामायण’ आल्यावर, काटकसर करून बाबांनी रेकॉर्ड प्लेअर आणि गीतरामायणाच्या एल. पी. ध्वनिमुद्रिका आणल्याचे आठवले.
कँपातल्या देवीच्या देवळात रामपंचायतनाच्या लहानशा पितळी मूर्ती होत्या. तिथे कुणा कीर्तनकारबुवांनी ‘रामविजय’ लावला होता. आजी नुकतीच रतलामच्या काकांकडून आली होती. तिने तिथे वाचलेले ‘तुलसीरामायण’ तिच्या मनात ताजे होते. मग ‘आज रामविजयात काय सांगितले, अन मी रतलामला काय वाचले’ असे काहीतरी ती आईला सांगत असे, ते कानावर पडत असे. रामजन्म उत्सवाला भर दुपारी आम्ही मुले एकमेकांना हाका मारत देवळामध्ये जात असू. देवळाच्या गाभार्यात केवढी गर्दी उसळलेली असे! रामाचा पाळणा हलवायला मिळावा म्हणून इकडून तिकडून वाट काढत पाळण्याशी पोहोचायचे, पाळणा हलवायचा, कुणीतरी हातावर टेकवलेला चमचाभर सुंठवडा घामेजल्या मुठीत घेऊन चटचटीत उन्हातून अनवाणी पायांनी घरी पळत यायचे!
कॉलेजला गेल्यावर मात्र मित्र-मैत्रिणींमध्ये रामाविषयी वेगळी मते व्यक्त होऊ लागली. आम्हा मैत्रिणींना वाटू लागले की, सीतेला अग्निदिव्य करायला लावणार्या आणि नंतरही कुणा एकाच्या बोलण्यावरून गरोदर सीतेचा त्याग करणार्या रामाने सीतेवर अन्यायच केलाय आणि हे अजिबात योग्य नाही केले. मित्र म्हणू लागले, आणि वाली-शंबूकाचे काय? आमच्या एका मैत्रिणीच्या घरी अशाच एकदा या गोष्टी चालू असताना तिची आजी म्हणू लागली, ‘अग पोरीहो, रामाला बी दुख झालं व्हतं सीतेला शिक्षा देताना. पण त्याला वरच्या देवांनी दुष्ट रावणाला मारून टाकायचं काम दिलं व्हतं. ते त्याला करनंच पडलं. पोरीहो, राम तुमच्या-माझ्यागत साधा मानूस नव्हता. विष्णूनी दशरथाच्या पोटी जल्म घेतला व्हता. आन सीतामाई म्हंजे लक्षुमी होती. अग्नीमधे गेली ती मायावी सीता आन आगीतून बाहेर आली ती खरी सीता’. ज्यावेळी नासिक-पंचवटीच्या किंचित अंधार्या सीतागुंफेतून वाकून, सरपटत फिरले तेव्हा कुणीतरी सांगितले की, रावणाने जिचे हरण केले ती मायावी सीता होती अन खरी सीता या गुंफेत लपून राहिली होती, तेव्हा मैत्रिणीच्या आजीची आठवण आली. पुढे लक्षात यायला लागले की, मूळ वाल्मिकी रामायणातील रामकथेतल्या अनेक प्रसंगांवर लोकप्रतिभेने अनेक नवनवे साज चढवलेत.
‘रामायण’ हे ‘महाकाव्य’ असले तरी लोकमानसातला राम खराखुरा होता. तो महाराष्ट्रातच नाही तर भारतात अनेक ठिकाणी वावरला होता. नाशिकच्या तपोवनात लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले. पालघर-केळव्याला एका सुंदर तळ्याच्या खडकावर बसून सीता स्नान करत असे, कारण वनवासात असताना फिरत फिरत राम-सीता इथे आले होते. काही काळ इथल्या वनात राहिले होते.आम्ही चित्रकूटला गेलो होतो. हे उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवरील ठिकाण. इथे अनसूयेच्या प्रार्थनेमुळे पाताळातून गंगा प्रकटली व मंदाकिनी झाली. तिच्या एका तीरावर उत्तरप्रदेश तर दुसर्या तीरावर मध्यप्रदेश. चित्रकूटला रामांचा वनवासातील सर्वाधिक काळ गेला. मंदाकिनीच्या मध्यप्रदेशातल्या तीरावर वनवासी राम काही काळ जिथे वास्तव्याला होते, ते ठिकाण या घाटावर दाखवतात. इथे राम-लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती वल्कले परिधान केलेल्या आहेत. आणखी एका ठिकाणी, राम-लक्ष्मण-सीता या तिघांच्या आणि भरत व त्याची पत्नी आणि शत्रुघ्न व त्याची पत्नी यांच्या लहान, सुबक मूर्ती आहेत. एरवी रामासमोर हात जोडून बसलेले हनुमान इथे नाहीत, कारण तोवर राम-हनुमान भेट झाली नव्हती. चित्रकूटाच्या उत्तरप्रदेशाच्या भागातील कामदगिरी डोंगरावर प्रथम राम-भरत भेट झाली, मात्र भरताला रामाने आपल्या पादुका दिल्या ते ठिकाण मंदाकिनीच्या एका घाटावर आहे. मंदाकिनीत रामाने पित्याला पिंडदान केले. चित्रकूटपासून जवळच एक निसर्गरम्य ठिकाण आहे. दोन बाजूंना खडकांचे किनारे अन मधून संथ वाहणारी मंदाकिनी. तिथल्या एका खडकावर राम-सीता बसत, असे सांगत, गाईडने एके ठिकाणी एक पुसट ठसा दाखवला. ते सीतेचे पाऊल! इथेच कावळ्याच्या रूपातला गंधर्व सीतेच्या अवतीभोवती करू लागला म्हणून रामाने त्याला बाण मारला व त्याला एकाक्ष केल्याची कथा घडली असे ऐकायला मिळाले.
चित्रकूटापासून काही अंतरावर मंदाकिनीच्याच तीरावर अनसूया आश्रम आहे. राम दंडकारण्याकडे निघाले असताना, अत्री-अनसूया या वृद्ध तपस्वी दांपत्याच्या आश्रमात एक रात्र थांबले होते. अनसूया व सीता यांनी रात्रभर हितगुज केले. तिथून निघताना अनसूयेने सीतेला दिव्यमाला व अलंकार देऊन ते परिधान करायला लावले. रामेश्वरलादेखील रामवनवासाच्या अखेरच्या पर्वातील कितीतरी कथा तेथील स्थळांशी निगडित आहेत, हे तिथे गेल्यावर कळले.
रामकथा अक्षरश: भारतभर गायली गेली आहे व अनेक वास्तूंमध्ये विसावली आहे. एवढेच नाही तर आग्नेय आशियातील इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया या देशांमध्येही ती विविधरूपिणी होऊन संचार करते आहे. अभिज्ञा बालीला गेली होती. तिथे रामकथेवरील एका नृत्यनाट्याच्या कार्यक्रमाला गेली असताना, तिच्या शेजारी एक मुस्लिम तरुणी बसली होती. अभिज्ञा-राजेशचे रामकथेसंदर्भात काही बोलणे चालू होते, त्यात तिनेही सहज भाग घेतला. आश्चर्याने अभिज्ञाने विचारले, तुला कशी इतकी माहिती? यावर हसून ती म्हणाली, का नसणार? इट इज अवर हिस्ट्री. मग ती रामकथेविषयी तिच्या दृष्टिकोनातून बोलत राहिली. तिकडच्या रामकथेत राम-सीता अन हनुमानाला जितके महत्त्व आहे, तितके लक्ष्मणाला नाही. तिच्या मते अयोध्या भारतात नाही. अलीकडे कळले, थायलंडच्या एका प्रमुख शहराचे नाव ‘अयुत्थया’ आहे. ते त्यांच्या ‘रामकियेन’ या राष्ट्रीय महाकाव्यातून व ‘अयोध्या’ या संस्कृत शब्दावरून आले आहे. त्यांच्या रामकथेत सीता ही रावण व मंदोदरीची कन्या आहे.
एक प्रश्न मात्र मनात अधूनमधून पण सतत येत राहतो, रामकथेत असं काय आहे की, रामाने सीतात्याग केल्याबद्दल त्याला लोक, विशेषत: स्त्रिया दोष देतात, तरीही शेकडो-हजार वर्षं लोकमानसात रामाला अढळ स्थान मिळालं आहे? अलीकडे रामकथेसंदर्भात दोन अतिशय चिंतनप्रवृत्त करणारी पुस्तके वाचनात आली. एक डॉ. तारा भवाळकरांचे ‘सीतायन’. त्यात ताराताईंनी लोकपरंपरेतील रामकथांमधून सीतेचा शोध घेतला आहे आणि दुसरे डॉ. अरुणा ढेरे संपादित ‘बहुरूपी रामकथा’. आजवर विविध काळांत, विविध प्रदेशांत व विविध भाषांत लिहिल्या गेलेल्या रामकथांचा परिचय करून देणारे विद्वत्तापूर्ण लेख आणि अरुणाताईंची समालोचक प्रस्तावना असलेल्या या पुस्तकातून कळते, की विविध प्रतिभावंतांनी रामकथेला किती नवनवे आयाम दिले आहेत ते!
मी ज्यावेळी महात्मा गांधींची आत्मकथा वाचत होते तेव्हा गांधीजींच्या मुखी एक वाक्य आले, ‘बा (कस्तुरबा) सीता होती पण मी राम होऊ शकलो नाही’ या वाक्याचा मी आजही पुन्हापुन्हा विचार करतेय. काय व्यक्त करायचेय यातून गांधीजींना? त्यांना भारतात ‘रामराज्य’ यायला हवे होते. भरत जेव्हा वनवासात रामाच्या भेटीला आले तेव्हा, अयोध्येत सगळे कुशल आहे ना, हे जाणून घेण्यासाठी रामाने त्याला विचारलेले असंख्य प्रश्न वाल्मिकी रामायणात आहेत. त्यांतून मात्र ‘रामराज्या’ची कल्पना व्यक्त होते. वाल्मिकी रामायणातील राम आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू आहे. तो आधी मनुष्य आहे नंतर ईश्वरावतार होत जातो. कालौघात ज्या रामकथा लिहिल्या गेल्या किंवा मौखिक परंपरेत रचल्या गेल्या त्या रामाचे मानवीकरण आणि दैवतीकरण या हिंदोळ्यावर झुलत राहिल्या व कदाचित म्हणूनच लोकमानसाला अधिक आपल्या वाटल्या.
Related
Articles
आसाममध्ये बहुतेक ९० टक्यांवर टक्के मतदान ?
09 Apr 2026
काँग्रेसकडून कस्तुरबा गांधी यांना अभिवादन
12 Apr 2026
‘लताआशा मंगेशकर’ नावाने रुग्णालय
14 Apr 2026
पायाभूत प्रकल्पांची कामे ठेकेदारांनी वेळेत पूर्ण करावीत
11 Apr 2026
महाराष्ट्राची तरुण पिढी अमली पदार्थाच्या विळख्यात
15 Apr 2026
मोहरी प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार
13 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
चाळीस दिवसांनंतर इराकचे आकाश पुन्हा खुले
4
सावध पवित्रा (अग्रलेख)
5
अवकाळीचा असह्य फटका
6
महागाई उंबरठ्यावर!