बेकायदा बोअरवेलमुळे भूमिगत मेट्रोच्या बोगद्यात भगदाड   

पुणे : बेकायदा बोअरवेलमुळे भूमिगत मेट्रोच्या बोगद्यात भगदाड पडले. या प्रकरणी खडक पोलिसांनी वाडामालकासह संबंधित ठेकेदाराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. वाड्याखालून भूमिगत मेट्रो मार्गिका गेली असल्याची माहिती असतानाही एका वाडामालकाने कूपनलिका (बोअरवेल) घेतल्याने शिवाजीनगर ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेतील शुक्रवार पेठ भागात पाणी गळतीचा गंभीर प्रकार उघडकीस आला. 
 
याबाबत पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक (स्थापत्य अभियांत्रिकी) शंतून गोरात्रा यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजीनगर ते स्वारगेटदरम्यान धावणार्‍या भूमिगत मेट्रोच्या मार्गिकेत शिवाजीनगर एसटी स्थानक, मंडई, कसबा पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजीनगर न्यायालय ही स्थानके आहेत. शुक्रवार पेठेतील घर क्रमांक ४१५ येथील एका वाडामालकाला भूमिगत मार्गीका जाते, याची माहिती होती. तरीही त्यांनी १४ मार्च रोजी कुपनलिका (बोअरवेल) घेतली. चुकीच्या ठिकाणी कुपनलिका घेतल्याने बोगद्याच्या एका भागाला सहा इंचाचे भगदाड पडले. त्यामुळे भागातून पाणी गळती सुरू झाली. याबाबतची माहिती मिळताच मेट्रो प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. यात मेट्रो प्रशासनाच्या मालमत्तेचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. वाडामालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
 
खडक पोलिस स्टेशनसमोरील एका वाड्यात बोअरवेल घेण्यात आली होती. बोअरवेलमुळे मेट्रो मार्गिकेत पाणी गळती झाल्याने महामेट्रो प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील करवाई सुरू आहे. 
 
- शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (खडक पोलिस स्टेशन) 
 

 

Related Articles